No fear of failure! thats the one of the secret of ISRO's success & work culture. | अपयशाची भीती नाही! .. कारण तेच आहे इसरोच्या यशाचं रहस्य!
अपयशाची भीती नाही! .. कारण तेच आहे इसरोच्या यशाचं रहस्य!

ठळक मुद्देइसरोच्या ‘यशा’चं रहस्य शोधण्याचा प्रयत्न ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकाने गेल्यावर्षी केला होता. त्या प्रदीर्घ रिपोर्ताजमधला हा संपादित सं़क्षिप्त भाग या ताज्या ‘अपयशा’च्या पाश्र्वभूमीवर महत्त्वाचा!

- मेघना ढोके 

इसरो म्हटलं की, उपग्रह मोहिमा, चंद्रावर जाणं, मंगळावर जाणं, सूर्यावर जाणं, अंतराळात वस्ती असेच विषय नेहमी बातम्यांमधून भेटीला येतात. मोहीम फत्ते झाली की अपयशी ठरली यापलीकडे फारसं कळत नाही आणि आजही काही टीकेचे सूर, प्रश्न विचारतातच की, ज्या देशात लोकांना जेवायला अन्न आणि परसाकडेला शौचालयं नाहीत तिथं ही अंतराळ उड्डाणांची उधळपट्टी, एवढा सोस, कशासाठी?
खरंच अवकाश मोहिमांपलीकडे इसरोचं भारतीय माणसांच्या रोजच्या जगण्यात काही योगदान आहे, आणि असलंच तर ते नक्की काय हेच शोधायला बंगळुरूचं इसरो सॅटेलाइट सेंटर गाठलं होतं.
काही शे माणसं अवतीभोवती काम करताना दिसत होती; पण पिन्ड्रॉप सायलेन्स. दुसर्‍या दिवशी असलेल्या गणेश चतुर्थीनिमित्त डेकोरेशन सुरू होतं. एकीकडे उपग्रह बांधले जात आहेत, दुसरीकडे गणपती डेकोरेशन. एकीकडे यूएनची मीटिंग, अंतराळ मोहिमांची चर्चा, दुसरीकडे गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी, पलीकडे नासाच्या टीमबरोबर रिव्ह्यू मीटिंग, अलीकडे गजरा-साडय़ावाल्या वैज्ञानिक महिलांची कामाची लगबग. चित्र मोठं विलोभनीय होतं.
 वैज्ञानिक वनिता यांच्यासोबत मी क्लीन रूमकडे निघाले. स्वच्छ खोली नावाची ही भानगड पहिल्या झटक्यात आपल्याला कळत नाही, आणि त्या खोलीत आपल्याला जाताही येत नाही. काचा लावलेल्या एका खोलीतून उंचावरून या क्लीन रूममध्ये डोकावलं तर दिसतो एक मोठ्ठा ऐसपैस वर्‍हांडा, मोठी लांबच लांब आयताकृती खोली. आणि डोक्यावरच्या केसापासून पायार्पयत विशिष्ट पोशाख घातलेली काही माणसं. हे शास्रज्ञ  उपग्रहाची बांधणी-जुळणी करताना दिसतात.
वनितांना विचारलं तर त्या म्हणाल्या, ‘आत्ता या क्षणी इथं तीन उपग्रह असेम्बल होताना दिसताहेत.’ दूर पलीकडे एक मोठ्ठं धूड दिसत होतं, वायरींचं जंजाळ. सोनेरी कागदाच्या वेष्टणात गुंडाळलेला काही भाग. ते काय असं विचारलं तर वनिता म्हणाल्या, ‘हेच तर चांद्रयान-2. त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे, पुढच्या वर्षी ही चांद्रयान-2 मोहीम नियोजित आहे, आणि म्हणून आत्ता काम वेगात सुरू आहे. ते सोनेरी कागद म्हणजे हिटशिल्ड, रॉकेटच्या उष्णतेनं उपग्रहाला अपाय होऊ नये म्हणून हे उष्णतारोधक कागद लावले जातात.’ चंद्रावर जाण्यासाठी भारताची पुढची मोहीम सज्ज होत होती. याशिवाय दोन रिमोट सेन्सिंग उपग्रहही बांधले जात होते. आणि पलीकडे गणपतीच्या स्वागताची तयारीही सुरू होती.
‘शास्रज्ञ सोडून कुणीही या खोलीत जाऊ शकत नाही, कारण एक बारकुसा केस, धुळीचा कण जरी या उपग्रहात गेला तरी तो घातक ठरू शकतो. अत्यंत बारकाईनं काम होतं, त्यामुळे विशिष्ट पोशाख घातल्याशिवाय शास्रज्ञही तिथं जात नाहीत. एका बारक्या स्क्रूपासून अत्यंत लहानसहान उपकरणांचीही चोख तपासणी होते. वातावरणाबाहेर ही उपकरणं, यंत्रणा कशी काम करेल याची अंतराळातलं वातावरण तयार करून तपासणी होते. त्यासाठी थर्मल लॅब, एअर लॅब तयार केलेल्या असतात. उपग्रहातला प्रत्येक स्क्रू, प्रत्येक पार्ट यासार्‍या चाचण्यांमधून जातो. कारण एकदा यान उडालं, उपग्रह अवकाशात गेला की तिथं जाऊन तपासणी, दुरुस्तीला काही संधीच नाही. त्यामुळे उत्तम, अचूक, पूर्ण क्षमतेनं वेळेत काम करणं हे आमचं आव्हान असतं. एक लहानशी चूक मिशन गोत्यात आणू शकते.’ क्लीन रूम पाहता पाहता वनिता सांगत होत्या.

इसरोत भेटणार्‍या प्रत्येकाला विचारलं, किती वर्षे इथं काम करताय?- तर 10, 12, 20 वर्षे अशी उत्तरं आली. आता तर आयटी इंजिनिअर कमी पगारात इसरोत काम करण्यास इच्छुक आहेत, मुलाखतीला येत आहेत. हे कसं? दर दोन वर्षानी नोकरी बदलणार्‍या या काळात अनेक हुशार माणसं इसरोत इतकी वर्षे कशी टिकतात? त्याचं रहस्य आहे ते इसरोच्या कार्यसंस्कृतीत! इसरोतली रिव्ह्यू सिस्टीम ही एक अत्यंत वेगळी गोष्ट आहे. संस्थेचे धोरणात्मक प्रकल्प असतातच. प्रत्येक विभाग आपापलं काम करतो.  त्या विभागाचे सहकारीच अनेकदा एकमेकांचा प्रोजेक्ट रिव्ह्यू करतात. चुका सांगतात, धोके सांगतात. अनेकदा निवृत्त शास्रज्ञ मार्गदर्शनाला, रिव्ह्यूला येतात. तो टप्पा पार केला की पुढे अन्य विभागांसमोर प्रोजेक्ट ठेवला जातो. तिथं त्यावर चर्चा होते. एकमेकांचे मुद्दे खोडून काढले जातात. आपले मुद्दे मांडले जातात. पुराव्यानुसार हे खरं खोटं असं सिद्ध केलं जातं. प्रोजेक्ट मंजूर झाला की मग तो फायनल रिव्ह्यू कमिटीसमोर जातो. तिथं बारीकसारीक गोष्टी तपासल्या जातात. मग नंतर सर्व विभाग प्रमुख, इसरो अध्यक्ष त्या सार्‍याचा रिव्ह्यू करतात. आणि फायनल लॉचच्या वेळी पुन्हा एकदा रिव्ह्यू होतो तो वेगळाच. म्हणून तर इथं जो तो रिव्ह्यू या शब्दाविषयी फार आदरानं बोलतो, आणि चेष्टेनं सांगतो की, ‘रिव्ह्यू मीटिंग इज लाइक अ वॉर!’
विशेष म्हणजे इथं ‘येस सर’ संस्कृतीला थारा नाही. रिव्ह्यू मीटिंगमध्ये ज्युनिअर मोस्ट इंजिनिअर थेट अध्यक्षाला प्रकल्पातील चुका सांगू शकतो. त्या सांगण्याला प्रोत्साहन दिलं जातं. चुकांविषयी मोकळेपणानं बोललं जातं. चुका शेअर करायच्या कारण त्याच टप्प्यात काम करणारी अन्य माणसं मग त्या करत नाहीत. ‘शेअर द मिस्टेक, गेट रीड ऑफ इट’ हे इथलं सूत्र. 
विशेष म्हणजे वाद घालायचं, मोकळेपणानं बोलण्याचं स्वातंत्र्य भेटलेला प्रत्येक इंजिनिअर, प्रत्येक माणूस अप्रूपानं सांगतो. पण माणसांच्या वृत्तीत कामाप्रति इतकी एकजिनसी निष्ठा आणतात कुठून?
इसरोचे नियोजन आणि अंमलबजावणी समूह संचालक जी.एन.व्ही. प्रसाद सांगतात, ‘आमच्याकडे काही आयआयटी-आयआयएमचे पासआउट येत नाहीत. येतात ते साधे कुठल्याही शाखेचे इंजिनिअर, बीटेक, एमटेक. प्युअर सायन्सवाले पदवीधर. पण निवड करतानाच आम्ही पाहतो की, या मुलांमध्ये काही तरी पॅशन असेल. काहीतरी करण्याची जिद्द असेल. पगारापलीकडे कामाचं झपाटलेपण असेल. बाकी इतरांचं पॅशन पाहून आपोआप संगत गुण लागतो, तो वेगळाच.’
 इसरोच्या कार्यपद्धतीचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते टार्गेट ठरवतानापण प्रॅक्टिकल असतात. अत्यंत वास्तववादी विचार करतात. साध्य करता येईल असं ध्येय ठरवायचं, तेच गाठायचं, पुढच्या वेळी त्यापुढचं ध्येय ठेवायचं ही इथली कामाची पद्धत. आततायीपणा, ग्लॅमर, सनसनाटी वृत्ती किंवा ज्याला प्लेइंग फॉर पब्लिक गॅलरी असं इंग्रजीत म्हणतात ते इसरो करत नाही.
तिथून निघताना म्हणूनच आठवत राहिला इसरोचे जनसंपर्क अधिकारी देवीप्रसाद कर्णिक यांच्या दालनातला एक बोर्ड.
त्यावर लिहिलं होतं,
‘युअर सर्च फॉर एक्सलन्स एण्डस हिअर!’

*********************************

अपयश हाताळणीची गोष्ट - जीएनव्ही प्रसाद (इसरोचे नियोजन आणि अंमलबजावणी समूह संचालक, बंगळुरू)
 ‘इसरोमध्ये अत्युच्च पदापासून प्रकल्पावर काम करणार्‍यांर्पयत सारे वैज्ञानिक, शास्रज्ञच असतात. आणि प्रत्येक कामाचा, प्रकल्पाचा एक रिव्ह्यू मॅकेनिझम इसरोनं बनवलेला आहे. आमचा आजवरचा प्रत्येक प्रकल्प, त्यातल्या चुका, त्यातलं अपयश, कुठल्या टप्प्यावर काय चुकलं, कसं चुकलं, यश कशात होतं या सार्‍याची नोंद ठेवली जाते. यात कोण चुकलं, चूक कुणाची हे आम्ही शोधत नाही, काय चुकलं याचं हे डॉक्युमेण्टेशन आहे. आणि ज्या चुका झाल्या, त्या इसरोनं लपवल्या नाहीत. इसरोनं आजवर कधीच आपलं अपयश अमान्य केलं नाही. उलट आम्हीच जगजाहीर सांगतो की, आमचं हे चुकलं, अमुक टप्प्यावर चुकलं. 
इसरोच्या अध्यक्षांपासून इथं काम करणार्‍या अत्यंत ज्युनिअर इंजिनिअर्पयत हे रेकॉर्ड सार्‍यांना उपलब्ध असतं. आम्ही चुकतच शिकलो, त्या चुका टाळून इतर चुका कुणी केल्या तर त्यातून नवीन धडे शिकायला मिळतात. त्यामुळे चुकांची लाज आमच्याकडे कुणी बाळगत नाही, उलट आपल्या प्रोजेक्टमध्ये कुणी चुका काढल्या आणि त्या दुरुस्त झाल्या तर यशाची खात्री वाढते हे आमचं तत्त्व! ते साराभाईंनी या संस्थेची पायाभरणी करतानाच दिलं, आपल्याला नक्की काय करायचं आहे याची दिशा तेव्हापासून पक्की आहे.’


**************

मोहीम अपयशी झाल्यावर.. - तपन मिश्रा (अहमदाबादच्या स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे अध्यक्ष)
‘वी ट्रीट फेल्युअर अ‍ॅज अ‍ॅन एज्युकेशन. इसरोमध्ये अपयशाची भीती नाही. चुकलं म्हणून कुणी शिक्षा करणार नसेल तरच लोक नवीन गोष्टी करून पाहतात. शिक्षा मिळणार असेल तर त्याच त्या कामाच्या जिलब्याच पाडत बसतात. इथं नवीन काही करायला संधी द्यायची म्हणजे चुका होणार हे गृहीत धरलं जातं. चुकांना प्रोत्साहन दिलं जातं. ते साराभाईंनी आम्हाला शिकवलं, जे आम्ही आजवर जपलं आहे, आमच्या नेतृत्वानं सर्व काळात राखलं आहे.
मोहीम अपयशी झाली तरी आम्ही काय चुकलं हे शोधतो, कोणी चूक केली, कोण जबाबदार हे शोधत नाही. कारण कामावर प्रेम करणारी माणसं आपल्या चुकांनी आधीच घायाळ झालेली असतात. त्यातून स्वतर्‍च शिकतात, त्यांना फैलावर घ्यायची गरज नसते. प्रोजेक्टपूर्वी आमच्या रिव्ह्यू कमिटीत भयंकर वाद होतात. त्यातून त्या प्रोजेक्टविषयी अंतिम निर्णय होतो. एकदा निर्णय झाला की मग मात्र वाद घालायचे नाहीत ही इथली खरी संस्कृती आहे !’

************

 

(या लेखातील व्यक्तींची पदनामं ही ऑगस्ट 2017 मध्ये इसरोच्या केलेल्या अभ्यासानुसार आहेत. लोकमत दीपोत्सव 2017 मध्ये इसरोच्या कार्यपद्धतीविषयी विशेष लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यातला हा संपादित अंश)

(लेखिका लोकमत वृत्तपत्र समूहात मुख्य उपसंपादक आहेत.) 
meghana.dhoke@lokmat.com


Web Title: No fear of failure! thats the one of the secret of ISRO's success & work culture.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.