‘ऋषितुल्य धन्वंतरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 11:04 AM2020-03-29T11:04:14+5:302020-03-29T11:04:24+5:30

डॉ. ह. वि. सरदेसाई. अत्युच्च वैद्यकीय कौशल्य, रुग्णांविषयी अपार जिव्हाळा आणि  त्यांच्याशी प्रेमळ संवाद साधण्याची हातोटी. रुग्णाशी केवळ बोलून त्याचा निम्मा आजार  दूर करणारा डॉक्टर अशी त्यांची ख्याती. त्यामुळे लोकांनीच त्यांना ‘धन्वंतरी’ ही उपाधी दिली होती. त्यांचे हजारो रुग्ण, चाहते, वाचकांच्या हृदयात त्यांच्याविषयीच्या आदराचा कप्पा आजही व्यापलेला आहे.

The memories of renowned medical practitioner Dr H. V. Sardesai by Sateesh Paknikar | ‘ऋषितुल्य धन्वंतरी’

‘ऋषितुल्य धन्वंतरी’

Next
ठळक मुद्दे‘आपण सगळे आपल्या आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष देऊ या’ असं डॉ. ह. वि. सरदेसाई नेहमी सांगायचे. या ऋषितुल्य धन्वंतरींचं हे सांगणं आपण अंगीकारणं हीच त्यांना अनमोल आदरांजली असेल!

- सतीश पाकणीकर 

1991चा सप्टेंबर महिना असेल. पुण्याच्या सुभाषनगर गल्ली क्र मांक 3 मधील पाबळकर नर्सिंग होमचे आवार. वेळ संध्याकाळी चारची. माझे वडील अनंत केशव पाकणीकर म्हणजे नानांना जवळ जवळ महिन्याच्या कालावधीनंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता. अत्यंत जीवघेण्या आजारावर यशस्वी मात करून जणू त्यांचा पुनर्जन्मच झाला होता. आणि या यशाचे खरे शिल्पकार त्यांना डिस्चार्ज देण्याकरिता मुद्दाम उपस्थित होते. राम-लक्ष्मण अशी जोडीच होती ती. ते होते ऋषितुल्य धन्वंतरी डॉ. ह. वि. सरदेसाई व त्यांचा उजवा हात असलेले डॉ. तळवलकर. नानांच्या आध्यात्मिक क्षेत्नातील वावरामुळे त्यांचा व डॉ. सरदेसाई यांचा जुना परिचय. त्याच्याबरोबरच आम्ही ज्या फाटक वाड्यात राहत होतो त्याचे मालक र्शी. बाळासाहेब फाटक व डॉ. सरदेसाई हे एकमेकांचे व्याही. आमचा मित्न भरत याचे सासरे. अशी सगळीच ओळख असल्याने डिस्चार्जच्या वेळी डॉक्टर स्वत: आले होते. गेला महिनाभर रोज त्यांची व्हिजिट ठरलेली. आम्ही जेव्हा नानांना अँडमिट केले तेव्हा त्यांचे हिमोग्लोबिन झाले होते पाच. बरोबरीने स्लीप डिस्क व प्रोस्टेटचा त्नास. त्यातच त्यांचा रेअर असलेला ब्लड ग्रुप एबी निगेटिव्ह. पण या सगळ्यातून त्यांना सहीसलामत बाहेर काढणारे डॉ. ह. वि. सरदेसाई निघताना नानांना म्हणत होते, ‘नाना, ज्या दिवशी तुम्हाला इथे अँडमिट केले त्या दिवशीची तुमची अवस्था बघून आम्हाला मनोमन असे वाटले होते की, तुम्ही आता फक्त दोन-तीन दिवसांचे पाहुणे आहात. पण तुमची इच्छाशक्ती आणि ईश्वरावरची तुमची र्शद्धा यांच्या जोरावर तुम्ही आता बरे होऊन घरी निघाला आहात. काळजी घ्या. फिजिओथेरपीचे व्यायाम करा. आपण लवकरच माझ्या क्लिनिकमध्ये भेटू.’ मोठय़ा ऑपरेशननंतर पायांची बोटेही हलवू न शकणार्‍या नानांच्या डोळ्यात गहिवर दाटले होते, चेहर्‍यावर होते स्मितहास्य आणि हात त्या ऋषितुल्य धन्वंतरीच्या दिशेने जोडलेले. डॉक्टरांचे उद्गार खरे ठरले. नाना स्वत:च्या पायांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये तर गेलेच; पण नंतर जवळ जवळ दहा वर्षे वारीलाही गेले.
आम्हा भावांपैकी कोणाला तरी नानांना घेऊन डॉक्टरांकडे जावे लागे. अधूनमधून मी नानांच्या बरोबर डॉक्टरांच्या कुंटे चौकातील किंवा कमला नेहरू पार्क समोरील क्लिनिकमध्ये जात असे. भरपूर वेळ काढून. कारण तेथे गर्दीच तेव्हढी असे. तरी बरे डॉक्टर स्वत: पहाटे 5 पासूनच आलेले असत. पण एवढय़ा गर्दीतही प्रत्येक रुग्णाला ते भरपूर वेळ देत असत. त्याला अगदी नि:शंक करीत असत. त्यात त्याला समजेल अशी भाषा तर असेच; पण कधी कधी अर्थासह संस्कृत श्लोकांचाही वापर असे. आम्ही आत गेलो की,–‘या नाना ! कशी आहे तब्बेत?’ अशी सुरु वात होत असे आणि मग हे बोलणे तब्बेतीच्या थांब्याला वळसा घालून कधी ‘माउलींच्या’ चरणाशी येई हे ऐकणार्‍यालाही कळत नसे.
माझ्या थीम कॅलेंडर्सची सुरुवात 2003 साली झाली. पहिलेच म्युझिकॅलेंडर नानांनी ते डॉक्टरांना भेटायला गेले असताना त्यांना दिले. डॉक्टरांनी त्यातील प्रकाशचित्नांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच त्याच्या वेगळेपणाविषयी व संगीत व आरोग्य या विषयी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी केलेल्या कौतुकाचा मला किती आनंद झाला होता. 2004 साली वेगवेगळ्या क्षेत्नातील महनीय कार्य केलेल्या व मी ज्यांची प्रकाशचित्ने टिपली होती अशा काही व्यक्तींवर आधारित ‘दिग्गज’ हे कॅलेंडर केले. ते कॅलेंडर डॉ. सरदेसाई यांना देण्यासाठी मी त्यांच्या ‘अंकुर’ या क्लिनिकमध्ये पोहोचलो. अपेक्षेप्रमाणे पेशंट्सची भरपूर गर्दी होती. मी पण हातात वेळ ठेवून गेलो होतो. मी स्वागतकक्षात ‘मला डॉक्टरांना फक्त कॅलेंडर द्यायचे आहे’ असं सांगितलं. त्यांनी मला नाव विचारून ते एका चिठ्ठीवर लिहिले व सांगितले की, ‘आज गर्दी खूप आहे. तुम्हाला बराच वेळ बसायला लागेल. अन्यथा इतर काही कामे करून यायची असतील तर ती करून या. डॉक्टर 2 वाजता घरी जायला निघतील. त्या सुमारास या.’ मी त्यांना म्हणालो  -  ‘नाही मी वाट पाहतो. तुम्ही चिठ्ठी पाठवली आणि त्यांनी बोलावले तर पंचाईत नको.’ मी निवांत बसलो. त्यांनी चिठ्ठी आत पाठवली असावी. कारण पाच-सात मिनिटातच त्यांनी मला सांगितले की, आतला पेशंट बाहेर आला की तुम्ही आत जा. 
‘या.. कलाकार !’ मी दरवाजा ढकलून आत डोकावताच डॉक्टरांचा आवाज आला. आणि पाठोपाठ त्यांचा नेहमीचा प्रसन्न असा सुहास्य चेहरा दिसला. फिकट निळसर रंगाचा शर्ट, त्यावर गडद निळ्या रंगाचा टाय आणि गडद रंगाची पॅन्ट अशा वेशातील डॉक्टर नाकावर थोड्या खाली आलेल्या बायफोकल चष्म्याच्या वरून बघत म्हणाले - ‘कसे आहेत आमचे पेशंट?’ मी नानांची खुशाली सांगत त्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांच्या हातात ‘दिग्गज’ कॅलेंडरची प्रत दिली. डॉक्टरांनी एक-एक पान पाहायला सुरु वात केली. सगळ्याच ‘दिग्गज’ व्यक्ती त्यांच्या माहितीच्या होत्या. पण मला उत्सुकता होती ती वैद्यकीय क्षेत्नातील मी निवड केलेल्या व्यक्तीबद्दल ते काय म्हणतात याची. मार्च महिन्याचे पान आले. त्यावर होते  डॉ. बानू कोयाजी यांचे हसरे प्रकाशचित्न. डॉक्टरांच्या तोंडून एकदम वाùùù असे उद्गार आले. पद्मभूषण आणि मॅगसेसे पुरस्कार मिळवणार्‍या डॉ. बानू कोयाजींचे नुकतेच पाच महिन्यांपूर्वी निधन झाले होते. मग साधारण पाच मिनिटे डॉक्टर बानूबाईंनी कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्नणासाठी केलेल्या कार्याबद्दल तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सामुदायिक आरोग्य कर्मचार्‍यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बोलत राहिले. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत स्वत:ही तितकेच मोठे जनजागृतीचे कार्य केलेली ही व्यक्ती दुसर्‍याच्या कार्याबद्दल किती आपुलकीने सांगत होती. ‘अजातशत्नुत्व’ म्हणजे हेच का?
ते कॅलेंडर पाहत असताना त्यांना एका रु ग्णाचा फोन आला. त्यांच्या एकमेकांशी बोलण्यावरून मला काही अंदाज येत होता. त्याने डॉक्टरांची वेळ रिसेप्शनवर फोन करून घेतली होती. सकाळी 7.00 वाजताची वेळ त्याला मिळाली होती. त्यावेळी यायला त्याला जमणार नाही अशी त्या रु ग्णाची तक्र ार होती. आणि त्याला ती बदलून हवी होती. डॉक्टर सहजपणे त्याला बोलून गेले की, ‘7.00 वाजता जमणार नाही का? ठीक आहे, तुम्ही 5 वाजून 5 मिनिटानी या. मी येथे पहाटे 5 वाजताच येतो!’ तो रु ग्ण सर्दच झाला असावा. पहाटे 5 वाजता रुग्णसेवा सुरू करणारा डॉक्टर त्याच्या स्वप्नातही नसेल ना?
डॉक्टरांनी ‘दिग्गज’ कॅलेंडरचं परत एकदा कौतुक केलं. मी त्यांना म्हणालो - ‘मला तुमचा फोटोसेशन करायची इच्छा आहे. कधी देऊ शकाल वेळ?’ ‘हो, नक्की!’ असं म्हणत त्यांनी कॅलेंडरमध्ये बघितले. आणि लगेचच मला जानेवारीमधील वेळ दिली. ‘गुरु वार, 6 जानेवारी 2005ला संध्याकाळी बरोबर 4 वाजता तुम्ही माझ्या घरी या. मी वाट पाहतो.’ अंकुर क्लिनिकमध्ये येताना माझ्या मनातील कॅलेंडर देण्याची व फोटोसेशनबद्दल विचारण्याची अशा दोन्ही इच्छा फलद्रूप झाल्या होत्या. अगदी सहजतेने.
गुरु वार, 6 जानेवारी 2005. वेळ संध्याकाळी 4. मी ‘सुरचित’ या आघारकर इन्स्टिट्यूट रोडवरील डॉक्टरांच्या घरी पोहोचलो. प्रशस्त बंगला. आजूबाजूला गर्द झाडी. फारशी रहदारी नसल्याने शांतताही. त्यांच्या सेंट बर्नार्ड या जातीच्या ‘राफाएल’ नावाच्या भल्यामोठय़ा श्वानराजाने हुंगून आणि शेपूट हलवून माझं स्वागत केलं. मी बंगल्याच्या चार-पाच पायर्‍या चढून गेलो. डॉक्टर एच. व्ही. आणि त्यांच्या पत्नी डॉ. कुंदा दोघेही तयारच होते. आत येतानाच बागेतील एक जागा मी हेरली होती. हिरव्याकंच पार्श्वभूमीवर झाडांच्या पानापानातून झिरपणार्‍या प्रकाशाचे कवडसे मोह न घालतील तरच नवल. तेथे एक सोफा-खुर्ची ठेवून मी डॉक्टरांना बसण्याची विनंती केली. एरवी रुग्णांच्या गर्दीत असले तरीही प्रसन्न हास्य धारण करणारे डॉक्टर जरा जास्तच रिलॅक्स वाटत होते. त्यांच्या सहजपणामुळे मीही रिलॅक्स झालो होतो. वेगवेगळ्या कोनातून, सोनेरी काड्यांचा चष्मा, अध्र्याच फ्रेमचा चंदेरी काडीचा चष्मा घालून आणि चष्मा काढून अशी अनेक प्रकाशचित्ने मी टिपली. त्यांच्या बोलण्यातील सहजता त्यांच्या हालचालीतही असल्याने माझे काम फारच सोपे झाले होते. त्यानंतर घरात आतमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची व डॉ. सौ. कुंदा यांची प्रकाशचित्ने मला टिपता आली. 
आमचा फोटोसेशन चालू होता तेव्हा त्यांच्याकडील सेवक ‘राफाएल’ला घेऊन बाहेर पडला होता. सेशन संपता संपता तो परत आला. त्याचा प्रेमाच्या गुरकावण्याचा आवाज ऐकून डॉक्टर पायर्‍या उतरून खाली आले. आणि अत्यंत सहजपणे तो बसला होता त्या पायरीवर बसत ‘राफाएल’च्या गळ्यात त्यांनी हात घातला. त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शाने तो श्वानराजही त्यांच्याकडून लाड करून घेऊ लागला. अर्थातच माझ्या कॅमेर्‍यांनी हा क्षण गोठवला होता. मी टिपलेल्या फोटोंच्या प्रिंट्स घेऊन नंतर परत एकदा त्यांच्याकडे गेलो. फोटो पाहून डॉक्टरांच्या चेहर्‍यावर आलेले भाव मला माझ्या कामाची पावती देऊन गेले.
2013 साली मी प्रकाशचित्नण करायला लागून तीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मी ज्या वेगवेगळ्या प्रकारात काम केले त्या औद्योगिक, जाहिरात, व्यक्तिचित्नण, निसर्गचित्नण अशा प्रकाशचित्नकलेच्या सुमारे सोळा शाखांमधील प्रकाशचित्नांचे ‘व्ह्यू फाइंडर’ नावाचे एक प्रदर्शन भरवले होते. 28 सप्टेंबर 2013 ते 3 ऑक्टोबर 2013 या कालावधीत बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन होते. त्या प्रदर्शनात असलेल्या व्यक्तिचित्नात पु.ल. देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले, बाबासाहेब पुरंदरे, प्रल्हाद छाब्रिया, विजय भटकर, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि अर्थातच धन्वंतरी डॉ. ह. वि. सरदेसाई यांची प्रकाशचित्नं विराजमान होती.
रविवार, 29 सप्टेंबर 2013च्या संध्याकाळी डॉक्टर सहकुटुंब प्रदर्शन बघायला आले. त्यावेळी त्याचं वय होतं ऐंशी. पण उत्साह कोणालाही लाजवील असा. प्रत्येक फोटोतील बारकावे जाणून घेत, सुमारे तासभर प्रदर्शन बघितल्यावर, डॉक्टर शांतपणे खुर्चीवर बसले आणि त्यांनी त्यांच्या सुवाच्य अक्षरात अभिप्राय लिहिला–-‘नेत्नांचे पारणे फिटावे असा अनुभव आज आला. कलेची व्याप्ती आणि कलाकाराचा व्यासंग येथे प्रत्येक कृतीत प्रतीत झाला. जेव्हडी चित्ने/छायाचित्ने/प्रकाशचित्ने पाहिली, पाहू शकलो त्यातून या कलाकाराचे किती कवतुक करावे याला शब्द आठवेनात. अशी व्यक्ती येथे आहे याचा अभिमान वाटला, अशा व्यक्तीची ओळख आहे याची धन्यता वाटली !’  डॉ. हणमंत विद्याधर सरदेसाई. ज्ञानरूपी फळांनी लगडलेला हा महावृक्ष किती विनम्रपणे लिहिता झाला हे पाहून आजही नतमस्तक व्हायला होते.
डॉक्टरांसारख्या व्यक्ती समाजात नुसत्या असण्यानेही मोठा आधार असतो. पण जीवन आहे तेथे मरण हे असणारच. 15 मार्च 2020च्या दुपारी हा ऋषितुल्य धन्वंतरी अपार समाधानी आयुष्य जगून अनंताच्या प्रवासाला निघून गेला. नातेवाइकांच्या, विद्यार्थ्यांच्या, चाहत्यांच्या, वाचकांच्या आणि हजारो रुग्णांच्या आयुष्यात आणि त्या प्रत्येकाच्या हृदयाचा एकेक कप्पा व्यापून. त्यांनी एका मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर दिले होते - ‘एक माणूस म्हणून व एक डॉक्टर म्हणून मला असं सांगावंसं वाटेल की प्रत्येक माणसांनी त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवलंच पाहिजे. मानवी जीवनाचं ध्येय हे नेहमीच ‘सुखं आत्यंतिकं नित्यं यत् बुद्धिग्राह्यमतिंद्रियं’ असंच असतं. याचा अर्थ जे आपल्या केवळ मनाला व शरीराला समजत नाही व केवळ बुद्धीने समजतं असं जे सुख आहे हे मिळवलं पाहिजे. हे सुख केवळ आध्यात्मिकच असतं. प्रत्येक माणसाची आध्यात्मिक प्रगती होणं शक्य आहे. तो फार मोठा विद्वान नसेल, त्याची गरजही नाही, मात्न मनातून तळमळ असली म्हणजे झालं. जर तो अशी आध्यात्मिक प्रगती करून या स्थितीपर्यंत येऊन पोहोचला की मला जसं शरीर आहे तसं इतरांना आहे, मला जसं मन आहे तसं इतरांना आहे, मला जसं दु:ख होतं तसंच इतरांना होतं, मला जशा गरजा आहेत तशा इतरांना आहेत. तर त्या दुसर्‍यांच्या गरजांकडे लक्ष देऊन जो स्वत:च्या गरजा भागवतो असाच समाज समृद्ध होतो, सुखी राहतो, पुढे यशस्वी होतो. ही भारतीय तत्त्वज्ञानाने जगाला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. ती आपण वापरू या. आपण त्याची जाणीव करून घेऊ या. आणि आपण सगळे आपल्या आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष देऊ या !’
ऋषितुल्य धन्वंतरींचं हे सांगणं आपण अंगीकारणं हीच त्यांना अनमोल आदरांजली असेल!

sapaknikar@gmail.com                               
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)

Web Title: The memories of renowned medical practitioner Dr H. V. Sardesai by Sateesh Paknikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.