‘आनंदवनीचा श्रमर्षी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 06:01 AM2020-04-26T06:01:00+5:302020-04-26T06:05:01+5:30

ओसाड, दगडांच्या प्रदेशाला  ‘आनंदवन’ बनवणारे बाबा आमटे. सेवा क्षेत्नात महनीय काम केलेले बाबा आणि त्यांच्या कुटुंबियांची आनंदवनमध्ये भेट झाली. त्यांची काही प्रकाशचित्रेही यावेळी घेता आली. बाबांना मणक्यांचा त्रास होता. वयही झाले होते. तरीही त्यांच्यातला झपाटा आणि स्फूर्ती पाहण्याजोगी होती. त्यांच्यातला कार्यकर्ता तर अखंड जागा होता. आनंदवनात त्यांनी स्वत:ही रांगेत उभं राहून आपलं जेवण वाढून घेतलं. नंतर ताट धुवून, घासून पुन्हा जागच्याजागी ठेऊनही दिलं. स्वयंशिस्तीचा पाठ त्यांनी कधीच सोडला नाही. आनंदवनात आजही हे चित्र पाहायला मिळतं.

Memories of Baba Amte by Sateesh Paknikar | ‘आनंदवनीचा श्रमर्षी’

‘आनंदवनीचा श्रमर्षी’

Next
ठळक मुद्देबाबा आमटे यांनी पाहिलेलं स्वप्न आज आनंदवनच्या रूपानं, विकासदादा, त्यांची पत्नी डॉ. भारतीवहिनी व त्यांच्या सहकार्‍यांच्या प्रयत्नांनी जगाचं लक्ष वेधून घेतंय.

- सतीश पाकणीकर 
एकदा मुंबईच्या फोर्ट भागातील ‘किताबखाना’ नावाच्या पुस्तकांच्या दालनात पुस्तके पाहत होतो. असंख्य पुस्तकांतून एका कॉफी-टेबल पुस्तकावर नजर गेली. मुंबईच्या बीएआरसी संस्थेच्या उभारणीच्या सर्व अवस्थांचे अत्यंत रेखीव असे चित्नण असलेले ते पुस्तक पाहताना मला जणू त्या काळाची अनुभूती आली. अर्थात, या चित्रीकरणासाठी एका मोठय़ा कॉर्पोरेट कंपनीचा भरभक्कम आर्थिक पाठिंबा होता. मनात विचार आला, एखादी संस्था निर्माण करताना त्याचं असं पहिल्या दिवसापासून चित्नीकरण करणं किती जरूरीचं व महत्त्वाचं आहे; पण असा किती प्रयत्न होताना दिसतो? याबाबतीत आपण सारे फारच उदासीन आहोत का? 
आता अचानक हे आठवायचं कारण म्हणजे काही काळापूर्वी माझ्याकडे माझा एक मित्र श्री. संजय साळुंखे निगेटिव्हज असलेला एक मोठा बॉक्स घेऊन आला. त्यात  135 व 120 फॉरमॅट आकाराच्या जवळजवळ नऊशे निगेटिव्हज होत्या. वेगवेगळ्या पाकिटांत व्यवस्थितपणे ठेवलेल्या त्या निगेटिव्हजचे डिजिटल रूपांतर म्हणजेच स्कॅनिंग करायचे होते. आणि त्या निगेटिव्हज ‘आनंदवन’ येथून आल्या होत्या. संजय हा मुळातच कार्यकर्ता. आनंदवनचा कार्यकर्ता. भारत जोडो, नर्मदा बचावो अशा आंदोलनातील सहभागी आणि आमटे कुटुंबीयांच्या जवळचा. मी उत्सुकतेने निगेटिव्हज पाहू लागलो. आणि चक्क आनंदवनाच्या उभारणीचे ते चित्नण पाहून थक्क झालो. कोणतेही विशेष आर्थिक साहाय्य नसताना त्या त्या वेळचे ते प्रकाशचित्नण करणार्‍या त्या प्रकाशचित्नकारांपुढे नतमस्तकही! ओसाड, दगडांच्या प्रदेशामधून त्या प्रदेशाचं झालेलं नंदनवन म्हणजेच आनंदवन. या कार्याच्या पाठीमागचा कणखर पुरुष म्हणजे मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटे आणि त्याला या कार्यात समरसून साथ देणारी त्यांची अर्धांगिनी साधनाताई आमटे. 
त्या निगेटिव्हजचं स्कॅनिंग करताना माझं मन सुमारे पस्तीस वर्षे मागे गेलं. म्हणतात ना, आठवणींच्या जंगलात अंतराचं बंधन उरत नाही. माझा प्रकाशचित्नणाचा व्यवसाय व पदार्थविज्ञान विषयातील एम.एस्सी. बरोबरीनं सुरू होतं. साल होतं 1985. आम्ही काही मित्न बरोबर येऊन एक दिवाळी अंक काढण्याचं ठरलं. चित्नकार, नाटककार संजय पवार याच्या डोक्यातील ही कल्पना. 1985 साल हे इंडियन काँग्रेसचं शताब्दी वर्ष. त्यामुळे त्या विषयाला वाहिलेला दिवाळी अंक - ‘ताजे वर्तमान’ या नावाचा. आम्हाला कुठून माहीत नाही पण बातमी कळली की त्या वेळचे व भारताच्या इतिहासातले सर्वात तरु ण पंतप्रधान र्शी. राजीव गांधी हे ‘आनंदवन’ला भेट देणार आहेत. आमच्या हातात फार वेळ नव्हता. तेथे जाऊन त्यांचे काही फोटो व मुलाखत घेता आली तर, असा विचार झाल्याने मी व नुकताच पत्नकारितेचा अभ्यासक्र म पूर्ण केलेली विद्या कुलकर्णी असे आनंदवन येथे जाण्याचे ठरले; पण बाबा आमटेंची भेट व आनंदवन परिसर पाहण्याची उत्सुकता या दोन गोष्टी मला आकृष्ट करायला पुरेशा होत्याच.
संध्याकाळच्या ट्रेनने निघून आम्ही वध्र्याला पोहोचायला दुसर्‍या दिवशीची दुपार झाली. तेथून वरोरा. पुढे तीन किमीवर आनंदवन! दिवस होता 24 सप्टेंबर 1985. आम्ही पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झालेली. उतरतीची उन्हे आनंदवनच्या घनदाट झाडीतून पदपथावर पडत होती. आम्ही अतिथी निवासापाशी पोहोचतोय तोवर आमचा पुण्यातलाच चित्नकार मित्न सुभाष रोठे अचानक समोर आला. मी त्यावेळी लोकविज्ञान संघटनेचं काम करीत असल्याने व आम्ही आयोजित केलेल्या विमान प्रदर्शनातील बरीचशी चित्ने मी काढलेली असल्याने सुभाषची व माझी मैत्नी. आम्ही अतिथी निवासात स्थिरावतोय तोपर्यंत सुभाष एका व्यक्तीला घेऊन आला. पांढरा शर्ट व पायजमा. त्याने आमची ओळख त्यांना करून दिली. त्यांनीही आपुलकीने प्रवासाबद्दल विचारणा केली व आम्हाला म्हणाले- ‘प्रवास मोठा झालाय. जरा विर्शांती घ्या. जेवायच्या वेळी बोलूच.’ व ते त्यांच्या कामाला निघून गेले. मी नंतर सुभाषला म्हणालो-‘ सुभाष, अरे आमची तू ओळख करून दिलीस; पण हे आत्ता आलेले कोण?’ ‘हं .. ते राहिलंच की’  इति सुभाष. मग म्हणाला - ‘हा होता विकासदादा आमटे.’ आम्ही चकित. किती साधेपणा. बोलण्यात किती सहजता. का नसेल? बाबा व साधनाताईंचा मोठा मुलगा होता तो. मग आम्ही सुभाषकडे पंतप्रधानांच्या भेटीची चौकशी केली. अशी कोणतीही भेट नजीकच्या काळातही ठरलेली नव्हती. आम्हाला उमगले की मिळालेली बातमी निखालस खोटी होती. 
अंधार पडू लागला होता. आम्ही सुभाष बरोबर जेवणाच्या हॉलमध्ये आलो. काही व्यक्ती आधीच आलेल्या. त्यात विकासदादाही. परत आमचे बोलणे झाले. इतक्यात तेथे बाबा व साधनाताई आले. पांढरी बंडी , हाफ पँट व कमरेला पट्टा लावलेले बाबा  तर अगदी साधी सुती साडी नेसलेल्या साधनाताई. विकासदादाच्या साधेपणाचं रहस्य उलगडलं. सेवा क्षेत्नात महनीय असे काम केलेल्या या सगळ्यांनी आपापली ताटे घेऊन रांगेत उभे राहून तेथील टेबलवरून जेवण वाढून घेतले. अशावेळी आजूबाजूचे सर्वजण जे करतील तसे आपण वागायचे हे सोयीचे ठरते. आम्हीही जेवण घेतले. एकाच टेबलवर आम्ही बसलो. समोरच साधनाताई. बाबा मात्न त्याच टेबलवर ताट ठेवून पण उभे राहून जेवत होते. त्यांचा डावा पाय त्यांनी तेथील एका स्टुलावर ठेवला होता. आधारासाठी. मणक्यांची अपार झीज झाल्यामुळे त्यांना कमरेला पट्टा लावावा लागत होताच पण त्यांना  बसण्यात अडचण येत होती. एकतर उभं राहायचं अन्यथा कॉटवर आडव्या अवस्थेत झोपायचं. विकासदादांनी बाबा व ताईंशी आमची ओळख करून दिली. मी पदार्थविज्ञान विषयात एम.एस्सी. करतोय, बरोबरच प्रकाशचित्नणाचा व्यवसाय व लोकविज्ञान संघटनेचा कार्यकर्ता आहे अशी त्यांनी ओळख करून दिल्यावर त्या दोघांच्याही चेहर्‍यावर कौतुकाचे भाव प्रकटले. पानातील सर्व पदार्थ अत्यंत साधे पण कमालीचे चविष्ट होते. गप्पागोष्टीत कसा वेळ गेला हे कळलेच नाही. सगळ्यांची जेवणे झाली. बाबा व ताई स्वत:चे ताट उचलून घेऊन कडेच्या सिंकपाशी गेले. तेथे ठेवलेल्या साबणाने त्यांनी ते घासले, विसळले आणि परत जागच्याजागी ठेवून दिले. अर्थातच सगळ्यांनी तसेच केले. आम्हाला तेथील स्वयंशिस्तीचा तो पहिला पाठ होता. 
नंतर सुभाषकडून दुसर्‍या दिवशी काय काय करता येईल याचा अंदाज घेतला. बाबा व ताई पहाटेच उठून ‘स्नेहसावली’ या वृद्ध रु ग्णांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला जातात हे कळले. मग आम्ही सकाळी आधी आनंदवनातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन ती पाहण्याचे ठरवले. प्रवासाचा शिणवठा असल्याने पाठ टेकताच आम्हाला झोप लागली. 
पहाटेच जाग आली. बाहेरचे स्थिर जग हलू लागले होते. पटापट आवरले. आणि बाहेर पडलो. पहिलीच लागली ‘अंधशाळा’. एक शिक्षक आपल्या समोर असलेले ब्रेल लिपीतले पुस्तक आपल्या विद्यार्थ्यांना वाचून दाखवत होते. ते फक्त वाचन नव्हते तर तो होता स्वत:च्या दिव्यचक्षुंनी आपल्या पुढय़ातील विद्यार्थ्यांना एका अनोख्या विश्वात फिरवून आणण्याचा आविष्कार. किती तल्लीन झाले होते ते शिक्षक आणि त्यांचे चेले. आम्ही तेथे आल्याची चाहूल लागूनही त्यांच्यात जराही चुळबूळ झाली नाही न त्यांचे त्या गोष्टीतले हरवून जाणे कमी झाले. तसेच पुढे गेलो तर दुसरा एक अंध विद्यार्थ्यांचा वर्ग होता. पण येथे काही विद्यार्थी लाकडी स्टूल व खुच्र्यांना विणकाम करीत होते. त्यांचे हात सफाईने चालत होते. एखाद्या डोळस व्यक्तीलाही लाजवेल असा कामाचा झपाटा होता. एका मुलाकडे माझ्या कॅमेर्‍याचे लक्ष वेधले गेले. तो तर दोन्ही हात आणि तो वापरत असलेल्या त्या प्लॅस्टिकचा धागा पकडण्यासाठी त्याच्या ओठांचाही अतिसफाईने वापर करत होता. त्याच्या कामातली ती लय एखाद्या गाण्याच्या लयीपेक्षा कणभरही कमी नव्हती. त्यानंतर आम्ही पोहोचलो सतरंजी विणकाम विभागात. अर्थातच हातमाग असलेल्या विभागात. ज्या विभागात जाऊ तेथील वेगळेपण लगेचच जाणवत असे. येथील कलाकारांच्या रंगसंगतीच्या भानाने आम्ही अचंबित होऊन गेलो. बरोबरच कामाची शिस्त आणि चेहर्‍यावरचा आनंद. ‘आनंदवनच’ होतं ना ते!
बाबा-ताई स्नेहसावलीची भेट संपवून परतले होते. मला त्यांची प्रकाशिचत्ने घ्यायची होती. आम्ही पोहोचलो. मला त्यांचे त्या वातावरणातच फोटो टिपायचे होते. घडलेही तसेच. ते गप्पा मारत असताना, कोणाला काही सूचना करत असताना, एकमेकात हास्य-विनोद करताना मी फोटो टिपत गेलो. इतक्यात कोणीतरी त्यांना नव्याने आलेला मासिकाचा अंक आणून दिला. बाबा तो अंक चाळू लागले. माझ्या कॅमेर्‍यात अजून एका प्रकाशचित्नाची भर. ते जेथे उभे होते त्या ठिकाणी मला एका कोनातून मागची हिरवी झाडी पार्श्वभूमी म्हणून मिळत होती. मग मी त्यांना म्हणालो- ‘‘बाबा, आता थेट कॅमेर्‍यात बघताना तुमचे दोघांचेही फोटो घेतो.’’ त्यांच्या चेहर्‍यावर हसू उमलले. माझे शटरच्या बटणावरील बोट नकळत दाबले गेले. त्यांची एक प्रसन्न मुद्रा कॅमेरांकित झाली होती. मग साधनाताईंचाही फोटो टिपला. त्या दोघांच्या वागण्यातील साधेपणा माझ्या त्या प्रकाशचित्नात आपोआप परावर्तित झाला. अत्यंत कमी वेळात व मोजक्याच प्रकाशचित्नात संपलेला माझा हा फोटोसेशन. पण त्यामुळे आभाळभर आनंदाचा मी धनी झालो.
दुपारी परत एकदा सगळ्यांबरोबर जेवण झालं. अजून काही विभागांच्या भेटी झाल्या. काष्ठ शिल्प, शिलाई, चर्म शिल्प, ग्रीटिंग असे विविध विभाग बघत गेलो. प्रत्येक ठिकाणी काही न काही व्यंग असलेले रुग्ण; नव्हे कलाकार कार्यरत होते. प्रत्येक विभागात एक समान धागा म्हणजे जे करतो आहोत त्या कामावर प्रेम आणि र्शद्धा आणि ते काम उत्तमच करण्याचा अनोखा ध्यास. संवेदनशील असलेली कोण व्यक्ती भारावून जाणार नाही?
संध्याकाळच्यावेळी आम्ही परत येत असताना असे कळले की बाबा त्यांच्या बसमधून ‘हेमलकसा’ या प्रकल्पावर निघाले आहेत. आम्ही बाबांना भेटायला बसमध्ये गेलो. आत एका कॉटवर बाबा डोक्याखाली कोपर घेऊन एका कुशीवर झोपले होते. डोळ्यांत तेच हसू. त्यांनी विचारले- ‘‘चला, येताय का हेमलकश्याला? खूष होऊन जाल तेथे!’’ आमची दुसर्‍या दिवशीची परतीची तिकीटे काढलेली होती. त्यामुळे आम्हाला ते शक्य नव्हते. आम्ही त्यांना नमस्कार केला. 
‘‘लवकर या परत .’’ त्यांनी आशीर्वाद दिला. बस धुरळा उडवीत निघून गेली. त्या दिशेनी पाहताना एक मन विचार करीत होते की - ‘‘त्यांच्या बरोबर गेलो असतो तर काही वेगळेच अनुभव पदरात पडले असते.’’ दुसरे मन म्हणत होते की ‘‘त्यांचा एक दिवसाचा सहवास तर मिळाला! ही जमेची बाजू मान्य कर की!’’
आम्ही पुण्याला परतलो. नंतर लगेचच डिसेंबर महिन्यात ‘भारत जोडो’ अभियानाच्या वेळी एकदा प्रा. मंजिरी परांजपे यांच्या घरी बाबांना भेटण्याचा योग आला. त्यावेळी त्यांची प्रकाशचित्ने त्यांना देता आली. त्यांना ती आवडली. प्रसन्न चेहर्‍यानी त्यांनी तोंड भरून कौतुक केले. मी भरून पावलो.  
नंतर विकासदादाबरोबर नेहमी पत्नव्यवहार होत राहिला. आनंदवनाचे अप्रतिम असे एखादे शुभेच्छापत्न. त्यावर ‘भारत जोडो’चा शंकरपाळ्याच्या आकारातला एक स्टिकर लावलेला. त्याच्या खाली- ‘‘बर्‍याच दिवसांत पत्न नाही. एकदा सवड काढून ये. हार्दिक शुभेच्छांसह.. - विकासदादा, आनंदवन’’ असा वेगवेगळ्या दोन तीन रंगीत पेनांनी सुवाच्य अक्षरात लिहिलेला मजकूर. त्या दोन-तीन ओळीत असलेली ती आपुलकी. सगळंच विलक्षण.
2005 सालच्या माझ्या ‘दिग्गज’ या थीम कॅलेंडरमध्ये त्यांचे ते व्यक्तिचित्न वापरण्याबद्दल मी परवानगी मागितली. त्यांनी उलट टपाली परवानगी दिली व आशीर्वादही! त्यांच्या प्रकाशचित्नासाठी प्रा. अजित सोमण सरांनी ओळी लिहिल्या - 
‘‘झेपावणार्‍या पंखांना आभाळ मिळालं, 
उंच भरारी घेताना क्षितिज विस्तारलं, 
खूप काही केलं, खूप काही करायचं आहे; 
पंख थकले तरी उमेद जागी आहे.’’
विकासदादाचं पत्न आलं - ‘‘बाबांना कॅलेंडर खूपच आवडलं. तुला आशीर्वाद सांगितले आहेत.’’ 
- अजून काय पाहिजे?
1990 साली बाबा व ताई कसरावदला नर्मदा बचावो आंदोलनासाठी गेले. त्यानंतर आनंदवनची सारी जबाबदारी विकासदादाने आपल्या खंद्या खांद्यावर घेतली. 50 एकरपासून सुरू झालेला हा प्रवास आज 631  एकरांच्या विस्तारापर्यंत पोहोचला आहे. त्यात 200 एकरची शेती सुजलाम् सुफलाम् आहेच, पण तेथे एकूण 140 प्रकारची वेगवेगळी उत्पादनं बनतात. मंत्नाचं सार्मथ्य ज्यांच्या शब्दांना लाभलं अशा बाबांनी दिलेला मंत्न आहे- 
‘शृंखला पायी असू दे , मी गतीचे गीत गाइ, 
दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही.’
बाबांनी पाहिलेलं स्वप्न आज आनंदवनच्या रूपानं, विकासदादा, त्यांची पत्नी डॉ. भारतीवहिनी व त्यांच्या सहकार्‍यांच्या प्रयत्नांनी जगाचं लक्ष वेधून घेतंय. त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते साकार होणारच होतं, कारण त्याचं वर्णन त्यांनीच करून ठेवलं होतं - 
‘‘ येथे नांदतात र्शमर्षी, या भूमीला क्षरण नाही
येथे ज्ञान गाळते घाम, विज्ञान दानवशरण नाही
येथे कला जीवनमय, अर्थाला अपहरण नाही 
येथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही!’’

sapaknikar@gmail.com                                
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)

Web Title: Memories of Baba Amte by Sateesh Paknikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.