LMOTY 2020: महाराष्ट्राशी, मराठीशी माझं नातं खूप जुनं आणि हृद्य ! : निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 05:20 PM2021-03-22T17:20:05+5:302021-03-22T17:20:37+5:30

Lokmat Maharashtrian of the year award 2020: संत ज्ञानेश्‍वर - तुकाराम - एकनाथ, शिवाजी राजे यांच्याशी माझी ओळख माझ्या अम्माने करून दिली होती. त्या मराठी संस्कारांचं बोट मी आजही पकडून ठेवलेलं आहे. पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी आजही माझ्या जिवाला आस लागते! - निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

LMOTY 2020: My relationship with Maharashtra and Marathi is very old and heartfelt! : Nirmala Sitharaman | LMOTY 2020: महाराष्ट्राशी, मराठीशी माझं नातं खूप जुनं आणि हृद्य ! : निर्मला सीतारामन

LMOTY 2020: महाराष्ट्राशी, मराठीशी माझं नातं खूप जुनं आणि हृद्य ! : निर्मला सीतारामन

Next

महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ‘लोकमत’च्या या वार्षिक कार्यक्रमाचा उल्लेख मी ‘कॅलेंडर इव्हेंट’ असा करेन. महाराष्ट्रभरातून उत्तम लोक निवडून त्यांचा या व्यासपीठावर सन्मान करण्याच्या या सोहळ्याची वाट लोक बघत असतात. अतिशय पारदर्शी प्रक्रियेतून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं झटणार्‍या गौरवमूर्ती निवडल्या जातात व त्यांचा उचित सन्मान इथं होतो. ‘लोकमत’ हे इतकं मोठं मीडिया हाऊस, त्यांनी समाजाशी जोडलेला, टिकवलेला व्यक्तिगत सलोखा मला महत्त्वाचा वाटतो. समाजाच्या हितासाठी आपली काही भूमिका असायला हवी आणि राज्याच्या कल्याणासाठी अग्रेसर असणारी गुणी, बुद्धिमान, कुशल माणसं सर्वांसमोर आणून त्यांचं कौतुक करायला हवं ही त्यांनी मानलेली एक जबाबदारी. त्याचं फलित म्हणजे हा वार्षिक ‘सोहळा’! - समाजाच्या कानाकोपर्‍यातून उल्लेखनीय माणसं नि कामं पाहण्यासाठी व ऐकण्यासाठीच तर लोक या सोहळ्याची आतुरतेनं वाट बघत असतात.


असे कार्यक्रम मला व्यक्तिश: खूप समाधान देऊन जातात. समाजातील गुणीजनांचा आपण सन्मान करतो तेव्हा एकाअर्थी त्यांनी स्वत:त मिरवून घेतलेल्या आपल्या संस्कृतीच्या वारशाशी कृतज्ञ राहायचा आपण प्रयत्न करत असतो, असं मला वाटतं. त्याचा संबंध माझ्या लहानपणाशी आहे. माझ्या अम्माला वाचायची नि वाचलेलं आपल्या मुलाबाळांना सांगायची खूप आवड. तिचं वाचन सखोल होतं. आपल्या आजच्या जगण्यावर प्रभाव असणार्‍या ऐतिहासिक, पौराणिक गोष्टी नि प्रबोधन करणारी समाजसुधारक मंडळी अशा सगळ्यांबद्दल ती आवर्जून वाचायची. या मराठीतून वाचलेल्या गोष्टी तिनं तमिळमध्ये अनुवाद करत आमच्यापर्यंत पोहोचवल्या. रूजवल्या. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत एकनाथांच्या गोष्टी किती विलक्षण आहेत! केवढे जोडलेले होते हे संत समाजाशी. आपल्या जगण्यातून ते समाजावर काही मूल्यसंस्कार करत होते. मानवी जीवनाची सार्थकता कशा तर्‍हेचं माणूस बनण्यात आहे हे त्यांच्या शिकवणुकीतून समाजापर्यंत पोहोचत असे. त्यांच्या गोष्टी ऐकताना आम्हालाही ते गुण घ्यावे वाटायचे. कधी अम्मा छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांची आई जिजाऊ कशी मेहनत घेत होती ते सांगायची. छोट्या राजांवर प्रजेचं रक्षण करण्याचे, मावळ्यांमध्ये स्वातंत्र्याविषयी आस जागवण्याचे जिजाऊंचे प्रयत्न नि पुढे शिवाजी राजांनी गाजवलेला पराक्रम ऐकताना आम्ही भारावून जायचो. एक उत्साह संचारायचा अंगात! सावित्रीबाई फुलेंनी बायकामुलींना घराच्या उंबर्‍याबाहेर काढून शिक्षण देण्यासाठी किती सोसलं हे आम्ही गोष्टींमधून ऐकत होतो. पंडिता रमाबाई नि अशा अनेक स्त्री-पुरुषांविषयी ऐकत होतो ज्यांनी समाजासाठी आपलं जीवन वेचलं. अम्मा असं सगळं सांगायची पण आम्ही हा सगळा इतिहास मुळातून वाचावा, समजून घ्यावा अशी तिची धडपड असायची. त्यासाठी ती आग्रही असायची. आमचं बालपण अशा अनेक गोष्टींनी संस्कारित झालं आहे. या गोष्टींपासून स्फूर्ती घेत घेत आम्ही जगण्यात पुढे जात राहिलेलो आहोत.
खरं सांगायचं तर महाराष्ट्रातील साहित्य, संस्कृती नि कला यांचं त्यामुळंच प्रचंड आकर्षण वाटत राहिलं आहे. हा प्रभाव तर पुरून उरेल इतका होता व आहे. चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या विठुरखुमाईंच्या पंढरपूरचं माझ्या मनात विशेष स्थान आहे. या तीर्थाला भेट देण्याची संधी मी शोधत असते, आणि जेव्हा जेव्हा ती मिळते तेव्हा मी पंढरपुरी पोहोचते. या प्राचीन गावाच्या आसपास लगडून असलेल्या संतांच्या गोष्टींनी मनावर गारूड केलं आहे. आचार्य परमाचार्यांच्या कृपाशीर्वादासाठी आणि त्यांची व्याख्यानं ऐकण्यासाठी तर तामिळनाडूतून सातार्‍याला मोठ्या संख्येनं लोक येतात. महाराष्ट्रातील अशी अनेक ठिकाणं आध्यात्मिक ऊर्जेचे स्रोत आहेत. भारतीय वाङ्‌मय, विचारविश्‍व, भारतीय सद्‌गुणी, सदाचरणी माणसाच्या घडणीसाठी महाराष्ट्रानं दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे.


महाराष्ट्रातील सत्ताधीशांचा मोठा प्रभाव तामिळनाडूवर राहिलेला आहे. 
एकूणच आपल्या देशासाठी महाराष्ट्रातल्या महनीय ज्येष्ठश्रेष्ठांनी सर्वच क्षेत्रात मोलाचं योगदान दिलेलं आहे. ‘लोकमत’च्या सोहळ्यानिमित्तानं या भूमीत यायला मिळणं माझ्यासाठी विशेष गोष्ट आहे. इथं आलं की माझ्या लहानपणी आईनं मनावर बिंबवलेल्या गोष्टींशी व समाजाला आपण देणं लागतो या विचाराशी पुन्हा पुन्हा मी पोहोचते.

Web Title: LMOTY 2020: My relationship with Maharashtra and Marathi is very old and heartfelt! : Nirmala Sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.