सिनेमा कात टाकतोय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:00 AM2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:07+5:30

‘कर्मशिअल’ आणि ‘आर्ट फिल्म’  यातली सीमारेषा गेल्या 15 वर्षांत नष्ट झाली.  आपल्या मातीतल्या कहाण्या हे चित्रपटांचे विषय बनले. ‘हैदर’सारखा चित्रपट व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाला  तरच आपण त्याचे पैसे घेऊ ही माझी अट  शाहीद कपूरसारख्या कलाकारानेही मान्य केली.  निर्माते चित्रपटांत पैसा ओततात तो नफ्यासाठी, हे लक्षात घेऊन, ‘व्यावसायिक गणित’ जपत  आपली कलात्मकता सादर करण्याचे कौशल्य  आत्मसात करणे ही आजची खरी गरज आहे.  सुदैवाने आपला सिनेमा त्याच दिशेने जातो आहे..

Indian cinema is changing.. | सिनेमा कात टाकतोय..

सिनेमा कात टाकतोय..

Next
ठळक मुद्देआपल्यातील ‘क्रिएटिव्हिटी’ला किती चांगल्या रीतीने आपण ‘कमशिर्अलाइज’ करू शकतो ही माझ्या दृष्टीने खरी कला आहे!

- विशाल भारद्वाज

कलात्मकता आणि व्यावसायिकता या दोन्ही गोष्टी जणू समांतर आहेत असा प्रवाह अनेक वर्षांपासून चालत आलेला दिसतो. भारतीय सिनेमामध्ये तो जरा अधिकच. जे चांगले चित्रपट व्यावसायिक कामगिरी करू शकत नसत त्यांना ‘आर्ट फिल्म’ म्हणून संबोधले जायचे आणि कलात्मकता नसली तरी ज्यातून उत्तम व्यवसाय साधता येतो अशी ‘गणिते’ योग्य रीतीने जमवणार्‍या चित्रपटाला कमशिर्अल सिनेमा म्हटले जायचे. त्यामुळे क्रिएटिव्ह आर्ट सिनेमा हा व्यावसायिक स्तरावर यशस्वी होऊच शकत नाही अशी एक धारणा भारतीय चित्रपटविश्वामध्ये तयार झालेली होती. नाट्य क्षेत्रात जशी प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी असे समांतर प्रवाह दिसतात तसेच काहीसे कलात्मक चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट हे दोन्ही समांतर पद्धतीने पुढे जाताना दिसत होते.
बदलत्या काळाच्या संदर्भात मात्र हे चित्र काहीसे बदलताना दिसत आहे. याचे कारण या सर्व चित्रपटविश्वाचे एक अर्थकारण आहे आणि एक कलाकार म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून आणि त्या विश्वाचा एक अविभाज्य भाग म्हणून मला ते नीटपणे समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. आपल्यासारखी जी कलात्मक माणसं असतात ती चित्रपट या माध्यमाकडे एक कला म्हणून पाहतात, तर या निर्मितीसाठी जो माणूस पैसा ओतत असतो तो याच्याकडे एक व्यवसाय म्हणून पाहतो. त्यामुळे चित्रपट माध्यमातील अर्थकारण समजून घेत पावले पुढे टाकत जाणे ही यातील एक अनिवार्यता मानायला हवी. दुर्दैवाने असे फारसे न झाल्यानेच कलात्मक चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट अशा दोन समांतर रेषा उभ्या राहिल्या असाव्यात.
आपण जेव्हा ‘क्रिएटिव्हिटी इन कमशिर्अल सिनेमा’ असा विचार करतो तेव्हा माझ्यासारखा दिग्दर्शक मात्र याकडे अगदी उलट्या पद्धतीने पाहतो. मी असा विचार करतो की कमशिर्अल पद्धतीने काम करताना मी माझ्यातील ‘क्रिएटिव्हिटी’ किती उत्तम रीतीने या सगळ्यात ओतू शकतो? अर्थकारणात किंवा व्यावसायिक दृष्टिकोनात क्रिएटिव्हिटी अथवा सर्जनशीलता असण्याचा दुरान्वये संबंध नाही त्यामुळे ज्यांच्याकडे ती आहे त्यांनीच आपल्या दृष्टिकोनात काहीसा बदल करून असे पाहणे आता आवश्यक आहे. आपल्यातील ‘क्रिएटिव्हिटी’ला किती चांगल्या रीतीने आपण ‘कमशिर्अलाइज’ करू शकतो ही माझ्या दृष्टीने खरी कला आहे!
जेव्हा तुम्हाला तुमचे म्हणून अस्सल आणि नवे काही असलेले बाजारात विकायचे असेल तेव्हा ते सर्वांत मोठे आव्हान असते. मी या क्षेत्रात सुरु वात केली ती म्युझिक कंपोझर म्हणून. ‘माचिस’ हा चित्रपट मिळण्यापूर्वीचा माझा जो संघर्षाचा काळ होता, त्या काळामध्ये संगीत चोरणे ही अगदीच सर्वसाधारण गोष्ट समजली जात होती, किंबहुना स्वत:चे नवे काही असण्यापेक्षा त्याचेच कौतुक अधिक असायचे. नव्वदच्या दशकात पाकिस्तानातून चोरलेल्या अनेक संगीतरचना आपल्याकडे ‘हिट’ झालेल्या होत्या. त्यामुळे उमेदीच्या काळामध्ये मीदेखील माझ्या स्वत:च्या रचना असल्यातरीही त्या पाकिस्तानमधून घेतलेल्या आहेत असे सांगितले की दिग्दर्शकाला ते चांगले असणार याची खात्री वाटायची. स्वत:चे म्हणून नव्याने काही देऊ गेलो तर मात्र ते नाकारले जायचे. यातील गमतीचा भाग सोडला तर आजही आपल्यातील जे काही चांगले, नवे, अस्सल आहे ते बाजारात तुम्ही कसे विकणार हा संघर्ष सुरूच आहे. आपल्या पुढय़ात खरे आव्हान आहे ते हेच.
मला आतापर्यंतच्या अनुभवांतून लक्षात आलेली एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला जे काही समोरच्याला द्यायचे आहे ते जरूर द्यावे; परंतु ते एखाद्या वेष्टणात गुंडाळून, छान भेट देत आहोत अशा पद्धतीने द्या म्हणजे तुमचाही उद्देश साध्य होतो आणि घेणार्‍यालाही ते स्वीकारताना अडचण येत नाही. औषध द्यायचेच आहे, तर ते साखरेत मिसळून द्यावे लागेल इतकंच. कारण चित्रपट माध्यमात ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावीच लागेल की चित्रपटांमध्ये पैसे ओतणार्‍याला त्यातून त्याचे पैसे परत हवे आहेत. शिवाय त्यातून त्याला फायदाही हवा आहे. चित्रपट नुसता तयार करून उपयोग नाही तर तो पडद्यावर यशस्वी होणेही तितकेच गरजेचे आहे. त्यातून तो लोकांच्या पसंतीला उतरणेही आवश्यक आहे. चांगले काही जगासमोर आणत असताना या व्यावसायिक जबाबदारीचे भान विसरूनही चालत नाही. चित्रपट हे अभिव्यक्तीचे एक महागडे असे माध्यम आहे. त्याचबरोबर ते एक मोठे कसरतीचे टीमवर्क आहे. कलात्मक दृष्टी असणार्‍या दिग्दर्शकाला त्याच्या कल्पनेनुसार भव्य काही मांडायचे असेल तर त्यानुसार चित्रपट निर्मितीचा खर्च, स्टारकास्ट या सगळ्या गोष्टी वाढत जातात. त्यासाठी तो चित्रपट नुसती कलात्मकनिर्मिती न ठरता व्यावसायिक चित्रपट म्हणूनही त्याने पडद्यावर व्यवसाय करून देणे गरजेचे आहे हा सुवर्णमध्य बर्‍याचदा आपल्याकडे दुर्लक्षिला जातो; परंतु खरे गमक आहे ते इथेच.
मी दिग्दर्शक बनू शकेन असे मला खरेच कधी वाटले नव्हते; पण अशी काही परिस्थिती समोर आली की मला दिग्दर्शक बनावे लागले. मला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, कलात्मक चित्रपट पडद्यावर यशस्वी होत नसल्याने त्यांच्याकडे बघण्याची दृष्टीही अत्यंत उपेक्षेची होती. ‘कलात्मक चित्रपट करणारा म्हणजे अपयशी’ असा ठपका त्याच्यावर बसत असे, मात्र गेल्या 15 वर्षांत एक चांगली गोष्ट घडून आली ती म्हणजे कलात्मक सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा यांच्यामध्ये उभा छेद देणारी जी एक रेषा होती ती या काळात नष्ट झाली. 
मराठीमध्ये आलेला ‘कोर्ट’ हा चित्रपट याचे अत्यंत बोलके उदाहरण. एकीकडे इतर व्यावसायिक चित्रपट आणि त्याच्याच बरोबरीने हा चित्रपटही चित्रपटगृहात सुरू होता. माझ्या मते, चित्रपटविश्वात इतका सुंदर काळ यापूर्वी कधीही आलेला नसणार. त्यातून चित्रपटविश्वात ‘मल्टिप्लेक्स’च्या रूपाने मोठी क्र ांती झाली. चित्रपट पाहणे ही अनुभव घेण्याची गोष्ट बनली. अशाच टप्प्यावर चांगले दिग्दर्शकही पुढे आले आणि त्यांनी कर्मशिअल चित्रपटांचे गणित समजून घेत त्यात कलात्मकता ओतत चित्रपट साकारले. त्यामुळे कलात्मक आणि व्यावसायिक हा भेद या काळात संपून गेला.
छोट्या शहरांतून आलेल्या दिग्दर्शकांमुळे चित्रपटाची कहाणी बदलू लागली ही आणखी एक मोठी उपलब्धी मानायला हवी. ‘कट टू स्वित्झर्लंड’ हा परदेशांत चित्रीकरण करण्याचा ट्रेण्ड यामुळे अचानक संपूनच गेला. इंटरनेट क्रांती झाली आणि विमानप्रवास ही सामान्य बाब बनली तशा अनेक गोष्टी बदलत गेल्या. चित्रपटांचे विषय बदलू लागले. 
मी दिग्दर्शित केलेला ‘ओंकारा’ हा चित्रपट त्या गावाची, तिथल्या संस्कृतीची भाषा बोलणारा चित्रपट होता. तिथून जो प्रवास सुरू झाला तो आजही दिसून येतो आहे. त्यामुळे आपल्या मातीतल्या कहाण्या हे चित्रपटांचे विषय बनले यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते? ‘हैदर’सारखा चित्रपट साकारताना तो व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाला तरच आपण त्याचे पैसे घेऊयात ही माझी अट आजच्या युगात शाहीद कपूरसारखा कलाकार मान्य करतो ही खरोखर मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण हे समजून घ्यावे लागेल की बिझनेसमन अथवा कॉर्पोरेट कंपन्या चित्रपट माध्यमात पैसा ओतत आहेत तो निव्वळ नफ्यासाठी. मग जबाबदारी वाढते ती कलात्मक असे काही साकारू पाहणार्‍यांची. ते व्यावसायिक गणित जपत आपली कलात्मकता सादर करण्याचे कौशल्य आत्मसात करणे हीच आजच्या युगाची खरी गरज आहे. सुदैवाने आपला सिनेमा आज त्याच दिशेने जातो आहे..

(लेखक प्रख्यात दिग्दर्शक, संगीतकार, गायक आहेत.)
(पुण्यात नुकत्याच झालेल्या डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये मांडलेल्या विचारांचा सारांश.)
 (शब्दांकन : पराग पोतदार)

Web Title: Indian cinema is changing..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.