घाबरट नको, तसे गोंधळी कार्यकर्तेही नकोत

By किरण अग्रवाल | Published: July 18, 2021 11:27 AM2021-07-18T11:27:03+5:302021-07-19T19:04:23+5:30

Don't be afraid, don't be a confused activist : पक्ष नाजूक अवस्थेतून जात असतानाही कार्यकर्त्यांमधील गटबाजी अशी चव्हाट्यावर येणार असेल तर ती पक्षासाठी नुकसानदायीच ठरावी.

Don't be afraid, don't be a confused activist | घाबरट नको, तसे गोंधळी कार्यकर्तेही नकोत

घाबरट नको, तसे गोंधळी कार्यकर्तेही नकोत

googlenewsNext

- किरण अग्रवाल 

धीची दारे अधिक असतात तेथे फारशा कटकटी होत नाहीत, परंतु संधीच कमी असते तिथे स्पर्धा अधिक असणे व त्यामुळे वाद-विवाद घडून येणे स्वाभाविक ठरते. अकोला येथे पक्षनिरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीप्रसंगी जी हाणामारीची घटना घडली त्याकडेही याच दृष्टीने बघता यावे; परंतु मुळात पक्ष नाजूक अवस्थेतून जात असतानाही कार्यकर्त्यांमधील गटबाजी अशी चव्हाट्यावर येणार असेल तर ती पक्षासाठी नुकसानदायीच ठरावी.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सद्या राज्यभर झंझावाती दौरे चालविले असून, त्यात ते स्वबळाची भाषा करत असल्याने राज्यातील महाआघाडी सरकारमध्ये चलबिचल आहे. याचदरम्यान देशात इंधनाचे दर दिवसागणिक वाढत असल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून राज्यभर आंदोलने छेडली गेली आहेत. या आंदोलनांचा आढावा घेण्यासाठी  काँग्रेसचे निरीक्षक भाई नगराळे यांच्या उपस्थितीत अकोला येथे बैठक घेण्यात आली असता त्यात स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत फेरबदलाचाही मुद्दा चर्चेत येऊन गेला. गेल्या महिन्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दौऱ्यावर येऊन गेले होते. अकोल्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी देऊन त्यांनी यासंदर्भात चाचपणी केल्याने त्या पाठोपाठ आलेल्या निरीक्षकांच्या बैठकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. यात फेरबदलाला अनुकूल व प्रतिकूल मते प्रदर्शित झाल्याने त्यातूनच दोघात वाद होऊन फ्री-स्टाइल घडून आली. या हाणामारीचा पक्षाच्या बैठकीशी संबंध नव्हता असे नंतर सांगण्यात आले असले तरी; झाला प्रकार सार्वजनिकपणे घडून आल्याने पक्षाच्या प्रतिमेवर ओरखडा ओढला जाणे स्वाभाविक ठरले.


खरे तर राज्यातील सत्तेत काँग्रेस सहभागी असली तरी, या पक्षाची संघटनात्मक अवस्था नाजूकच आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ नये.   वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा असो, की वाशिम, कोणताही जिल्हा त्याला अपवाद नाही. सुरुवातीचा काळ असा होता जेव्हा या परिसरात केवळ काँग्रेसचा दबदबा होता. अकोल्याबाबतच बोलायचे तर  विदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी व विनयकुमार पाराशर या मान्यवरांच्या उल्लेखाशिवाय अकोला व काँग्रेसचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. आबासाहेब खेडकर,  जमनलाल गोयनका, नानासाहेब सपकाळ, गोविंदराव सरनाईक, अरुण दिवेकर, बाबासाहेब धाबेकर, वसंतराव धोत्रे, सुधाकर गणगणे आदींपासून ते सुभाष झनक, प्रा. अजहर हुसेन यांच्यासारखे मान्यवर मंत्री या पक्षाने दिलेत. जिल्हा विभाजन होण्यापूर्वी खेडकर, एम. एम. हक, मो. असगर हुसेन, वसंतराव साठे, मधुसूदन वैराळे, गुलाम नबी आझाद, अनंतराव देशमुख यांच्यासारखे ताकदीचे नेते खासदार म्हणून येथून निवडून गेले. १९८४ मध्ये वैराळे दुसऱ्यांदा निवडून गेले होते. त्यांच्यानंतर मात्र काँग्रेसला अकोल्याची जागा राखता आली नाही.  रामदास गायकवाड यांच्यासारखा सामान्य व्यक्ती काँग्रेसच्या नावावर अकोलेकरांनी आमदार म्हणून निवडून पाठविला. बाबासाहेब धाबेकर, दादासाहेब खोटरे, किसनराव गवळी आदींनी जिल्हा परिषद गाजवली. अण्णासाहेब कोरपे यांच्यासारख्या नेत्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार भरभराटीस आणला. इतरही अनेक नावे घेता येण्यासारखी आहेत की ज्यांच्यामुळे अकोल्यातील काँग्रेसचा वरचष्मा स्पष्ट व्हावा, परंतु तो काळ सरला. आता वंचित बहुजन आघाडी निर्णायक स्थितीत आली असून, त्यांच्यामुळे होणाऱ्या मत विभाजनातून भाजपा, शिवसेना प्रबळ झाली आहे. अशा स्थितीत काँग्रेसला अस्तित्व टिकवून स्वबळ आजमावायचे तर ते काम सोपे राहिलेले नाही, पण अल्प बळ असतानाही कार्यकर्त्यांमधील गटबाजी चव्हाट्यावर येणार असेल तर त्यातून वाटेत काटे पेरण्याचेच काम घडून येईल याचे भान बाळगले जाणे गरजेचे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच दिल्लीत महत्त्वाचे विधान केले असून, भाजपाला घाबरणाऱ्या घाबरटांनी काँग्रेस सोडावी, असे म्हटले आहे. असे घाबरट कामाचे नाहीत, त्याप्रमाणे बैठकांप्रसंगी गोंधळ घालून हाणामारी करणारे गोंधळीही उपयोगाचे नाहीत, कारण त्यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळते.

 
सारांशात, फेरबदलाचा असो, की आणखी कोणताही मुद्दा, त्यावर मतभेद असू शकतात व ते सनदशीर मार्गाने नेतृत्वासमोर मांडताही येतात; परंतु जाहीरपणे गोंधळ घालून सामान्यांच्या नजरेत पक्षाला उणेपणा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पाठिशी घालता येऊ नये किंवा सारवासारव करून वेळ निभावली जाऊ नये. तसे करणे अंतिमतः पक्षासाठीच नुकसानदायी ठरू शकते.
 
अकोल्यातील काँग्रेसमध्ये अलीकडे सक्रियता वाढली आहे. युवक आघाडी आंदोलनात आघाडीवर असते, त्यातून पक्षाचा प्रभाव निर्माण होऊ पाहत असतानाच कार्यकर्त्यांमधील वाद, मग तो वैयक्तिक स्वरूपाचा असला तरी त्यातून पक्ष कार्यालयात हाणामारी घडून येणार असेल तर स्वबळ सिद्ध होण्यापूर्वीच पक्षातील दुफळी उघड होऊन जावी. अलीकडील प्रकार त्यादृष्टीने गंभीर व दखलपात्र ठरावा.

kiran.agrawal@lokmat.com

Web Title: Don't be afraid, don't be a confused activist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.