डिजिटल होम-स्कूलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:54 PM2020-04-25T23:54:21+5:302020-04-25T23:55:12+5:30

लॉकडाऊनमुळे सर्वच घटकांवर मोठा परिणाम झालेला आहे. यात शिक्षणही अपवाद नाही. वर्गात बसून शिकवणे आणि शिकणे शक्य नसल्याने होम स्कूलिंगला सुरुवात झाली. अ‍ॅक्सेस करा आणि शिका ही शिकण्याची उत्तम पद्धत आहे. याच विचार प्रवाहातून दीप (डिजिटल एज्युकेशन एम्पॉवरमेंट प्रोग्रॅम) फाउंडेशनने तंत्रज्ञानावर आधारित केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग विद्यार्थ्यांना घरबसल्या रंजक पद्धतीने शिकण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.

Digital home-schooling | डिजिटल होम-स्कूलिंग

डिजिटल होम-स्कूलिंग

Next

सदर प्रयोगांच्या मदतीने आपणही आपल्या घरातील टीव्ही, स्मार्ट फोन्स यासारख्या गॅजेट्सचा वापर करून आपल्या घरात डिजिटल होम स्कूलिंग सुरू करू शकता.

ऑफलाईन डिजिटल लायब्ररी
स्मार्ट टीव्हीतील अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर करून आपण आपल्या घरातच ऑफलाईन डिजिटल लायब्ररी तयार करू शकतो. यासाठी आपल्याकडे जास्त स्टोरेज असलेल्या एखाद्या पेनड्राईव्ह किंवा हार्ड ड्राईव्हची आवश्यकता आहे. पेन ड्राईव्ह किंवा हार्ड ड्राईव्हमध्ये आपल्या मुलांच्या इयत्तेनुसार फोल्डरवाईज कन्टेन्ट अ‍ॅड करून सदर हार्ड ड्राइव्ह किंवा पेन ड्राईव्ह टीव्हीच्या अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमला जोडा. यानंतर आपल्या स्मार्ट फोनवर ‘डिलिंक’ हे लोकल नेटवर्किंगचे अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करून हार्ड ड्राईव्ह किंवा पेन ड्राईव्हमध्ये ठेवलेला कन्टेन्ट आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अ‍ॅक्सेस करता येऊ शकेल. यात वायफाय फक्त माध्यम म्हणून काम करेल. विशेष म्हणजे डिजिटल लायब्ररीमध्ये शेकडो पुस्तकांचा व व्हिडिओचा समावेश करता येऊ शकतो.

घरचा टीव्ही : डिजिटल फळा
लॉकडाऊनच्या काळात तर मुलांचे टीव्ही पाहणे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा परिस्थितीत टीव्ही पाहणेच जर अभ्यास झाला तर..! यासाठी काही क्लृप्त्या आपल्यासाठी निश्चित उपयुक्त ठरतील. तीन वर्षांपूर्वी घरातील टीव्हीवर मी हा प्रयोग केला होता. टीव्हीच्या स्क्रीनवर एक टच स्क्रीन इंटरफेस लावून टीव्हीची पॅसिव्ह स्क्रीन टच स्क्रीनमध्ये कन्व्हर्ट केली. ज्यामुळे घरचा टीव्ही इंटरॅक्टिव बोर्डमध्ये परावर्तित झाला. घरच्या टीव्हीवर विविध शैक्षणिक अप्लिकेशन टचस्क्रीन पद्धतीने हाताळणे, त्यातील अ‍ॅक्टिव्हिटी पेन टूलने सोडवणे टीव्हीच्या स्क्रीनवर विविध रंगात लिहिणे, पुसणे, सेव्ह करणे आदी इंटरॅक्टिव बोर्डचे सर्व पॉवरफुल टूल मुलांना घरबसल्या घरच्या टीव्हीवर अनुभवयास मिळाले. सदर इंटर्वेंशन दीप फाऊंडेशनच्या माध्यमातून शेकडो शाळांपर्यंत तसेच अनेक घरांमध्ये पोहचवले गेले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या अ‍ॅक्टिव्हिटी बेस डिजिटल लर्निंगचा आनंद घेता येत आहे.
घरच्या टीव्हीचा डिजिटल फळा म्हणून वापर करण्यासाठी आणखी एक साधा प्रयोग आहे. ज्यात टीव्हीच्या आकाराची काच घेऊन टीव्हीच्या स्क्रीनवर चिटकवून स्क्रीनवरील अ‍ॅक्टिव्हिटी सोडवण्यासाठी साध्या मार्करचा किंवा स्केच पेनचा वापर करता येतो. घरातील टीव्ही व स्मार्टफोन यांच्या मदतीने घरबसल्या शिकण्याची आणखी एक उत्तम पद्धत म्हणजे स्क्रीन कास्टिंग किंवा स्क्रीन मिररिंग. यात आपल्या स्मार्ट फोनची स्क्रीन टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर वायरलेस पद्धतीने परावर्तित केली जाते.

इलेक्ट्रिक टीचिंग एड
हलणारी, डोलणारी विविध आवाज करणारी इलेक्ट्रिक खेळणी मुलांना नेहमी आकर्षित करतात. या कारणाने घरोघरी अशी अनेक इलेक्ट्रिक खेळणी आपल्याला सापडतील. अशाच एका इलेक्ट्रिक कारच्या मदतीनं मी बनवलेले टिचिंग एड निश्चित आपल्या मुलांना उपयुक्त ठरेल. चालू स्थितीत असलेली एक इलेक्ट्रिक कार घेऊन कारचे आॅन-आॅफ स्विच काढून टाकले व स्विचमधून प्लस आणि मायनस अशा दोन वायर बाहेर काढून वायरच्या दोन्ही टोकांना मल्टिमीटरच्या दोन पिन शोल्डर केल्या गेल्या. त्यानंतर काही कुठे घेऊन त्यावर बहुपर्यायी प्रश्नांची प्रश्नपेढी तयार केले गेली. प्रत्येक प्रश्नासमोर व उत्तराच्या पर्यायासमोर मेटल पिन लावल्या गेल्या. पुठ्ठ्याच्या मागील बाजूस प्रश्न व योग्य उत्तर असलेल्या पर्यायाची पिन तारेने जोडून घेतली. ज्यावेळी मुले मल्टिमीटरच्या पिनचे एक टोक प्रश्नासमोरील मेटल पॉईंटवर तर दुसरे टोक उत्तराच्या योग्य पर्यायासमोरील मेटल पॉईंटवर ठेवतात, त्या वेळेला कार आपोआपच चालू होते. हा जादुई अनुभव मुलांना खूप व्यस्त ठेवतो. यांसारख्या अ‍ॅक्टिव्हिटीमुळे मुलांचे खेळणे आणि शिकणे एक होऊन जाते.

  • संदीप गुंड

Web Title: Digital home-schooling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.