‘कोविड-19’  ते ‘क्लायमेट- 30’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:00 AM2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:07+5:30

‘कोविड-19’ हा रोग आज  अख्ख्या जगाला गिळंकृत करू पाहतोय. ‘हात धुऊन’ मागे लागलेल्या या विषाणूपासून  वाचण्यासाठी वारंवार हात धुणं आणि एकमेकांपासून  दूर राहाणं, एवढाच पर्याय आज आपल्याला दिसतोय; पण आणखी केवळ दहाच वर्षांनी; 2030मध्ये येऊ घातलेला ‘क्लायमेट-30’चा धोका आपल्या  डोक्यावर घोंघावतोय, त्याला आताच प्रतिबंध केला नाही तर त्यावेळी कोट्यवधी लोकांना ना हात धुवायला पाणी असेल, ना त्यांना एकमेकांना टाळता येईल. सगळ्यांना हातात हात घालूनच  या संकटाचा सामना करावा लागेल.

'Covid-19' to 'Climate-30'! | ‘कोविड-19’  ते ‘क्लायमेट- 30’!

‘कोविड-19’  ते ‘क्लायमेट- 30’!

Next
ठळक मुद्दे‘क्लायमेट-30’च्या संकटातून आपल्याला वाचायचं असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे ‘प्लॅनेट बी’!. एखाद्या दुसर्‍या ग्रहावरच आपल्याला जावं लागेल; पण सध्यातरी पृथ्वीशिवाय आपल्याला पर्याय नाही. 

 - डॉ. राजेंद्र शेंडे

.लोकांना स्वत:लाच घरात कोंडून ठेवावं लागेल, एकमेकांशी संपर्क तोडावा लागेल, रस्ते ओस पडतील, विमान कंपन्या बंद पडतील, जग डबघाईला येईल. 2020मध्ये असं काही होईल असं भाकीत 2019च्या शेवटाला कोणी केलं असतं तर सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलं असतं; पण असं झालं. डिजिटल टेक्नॉलॉजी, ग्रोथ रेट, इन्फ्लेशन रेट, ट्रेड वॉर सायबर वॉर्स. यामध्ये गुंतलेल्या लोभी मानवतेवर ‘कोरोना’ हा विषाणू अँटम बॉम्बसारखा पडला.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात आणि इतक्या कमी वेळेत एवढा मोठा हाहाकार होईल आणि सुपर पावर म्हणवणार्‍यांनाही गुडघे टेकावे लागतील, हे कोणीच अपेक्षित केलं नव्हतं.
जगात गेल्या शंभर वर्षांत यापूर्वीही अनेक क्रायसिस, समरप्रसंग आले; पण ते लोकांना ‘परिचित’ होते. आर्थिक संकट, राजकीय संकट आणि स्थलांतराचं संकट. हे त्यातली प्रमुख. त्यातूनच पहिलं आणि दुसरं जागतिक महायुद्ध झालं. भारत-पाकिस्तान युद्ध, अमेरिका-इराक यांच्यात संघर्ष पेटला. युरोपात मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झालं. बांगलादेशातून झालेल्या स्थलांतरामुळेही युद्धप्रसंग आढवला. ही सगळीच संकटं जागतिक आणि प्रादेशिक असली तरी ती अचानक उद्भवली नव्हती. संपूर्ण अपरिचित अशीही ती नव्हती.  
आताचं संकट मात्र अतिशय वेगळं आहे. ‘कोरोना’च्या संसर्गामुळे संपूर्ण जगालाच आज 144 कलम लागलं, शिवाय हे संकट आर्थिक आणि राजकीय नाही. ते हेल्थ प्रॉब्लेम’शी निगडित आहे. ‘एबोला’, ‘सार्स’, ‘एचवन-एनवन’ यासारखी यापूर्वीची संकटं आरोग्याशी निगडित होती, त्यातील काही संकटं तर सध्याच्या ‘कोविड-19’पेक्षाही मोठी होती. 
आताच्या ‘कोविड-19’ या रोगाने आपल्यावर गनिमी काव्यासारखा हल्ला केला आहे. कोरोना व्हायरसवर आपल्याला अजूनही रामबाण इलाज सापडलेला नाही; पण त्याच्या तडाख्यातून आपण बाहेर पडू, अशी आशा आहे. लोकांना ‘क्वारंटाइन (अलिप्त) करणं, त्यांचा एकमेकांशी संपर्क थांबवणं, जमावबंदी लागू करणं या उपायांनी आपण या रोगाला आळा घालू शकतो. खरं तर अशा अचानक उद्भवलेल्या साथींना सामोरे जाण्यासाठी आपण तयार पाहिजे. 
एबोला, सार्स, मार्स, एचवन, एनवन. यासारखी यापूर्वी आलेली संकटं कोरिया, जपान, आफ्रिका. अशी त्या त्या विभागापुरती मुख्यत: र्मयादित असली तरी त्यातून उद्भवू वा पसरू शकणारं जागतिक संकट मात्र कोणीच लक्षात घेतलं नाही. त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यातून धडा घेतला नाही. ना आपली आरोग्य यंत्रणा सक्षम झाली, ना आपली हेल्थ सिस्टीम सुधारली, ना त्यासंदर्भात काही मूलभूत संशोधन झालं. 
आज ‘कोरोना’ या व्हायरसचा मुकाबला आपण कसा करतोय, तर कंपन्या बंद करा, कार्यालयं बंद करा, शाळा, कॉलेजेस, हॉटेल्स, वाहतूक बंद करा. अशा मार्गांनी. याला ‘हेल्थ सिस्टीम’ म्हणायची का? ही तर ‘पॅनिक सिस्टीम’ आहे. ‘घाबरू नका, पॅनिक होऊ नका’, असं पंतप्रधानांपासून तर ठिकठिकाणच्या सरकारी, खासगी डॉक्टरांपर्यंत सगळेच सांगताहेत; पण लोकांच्या मनात भीती आहेच. हे सगळं का, कशामुळे झालं, तर ‘सिस्टीम’ नव्हती, आपण ती विकसित केली नाही म्हणून! 
पण भविष्यातला एक धोका यापेक्षाही फार मोठा असणार आहे. त्यावेळी कोणालाच ‘क्वारंटाइन’ करता येणार नाही. आता जसं ‘कोविड-19’पासून आपण ‘पळ’ काढतोय, तसं त्यावेळी कुठल्याच गोष्टींपासून आपल्याला पळता येणार नाही आणि कदाचित वाचण्याची कुठलीच संधीही मिळणार नाही. हे संकट कुठल्या एका देशातून येणार नाही. एकाचवेळी एकदम चोहोबाजूंनी ते आपल्यावर आदळेल. सगळ्या देशांना एकदमच या संकटाचा सामना करावा लागेल. त्यातून बाहेर पडणं मग फारच कठीण जाईल.
गेली कित्येक वर्षे पर्यावरणाशी आपण जो खेळ केला, करतोय त्यातून उद्भवलेलं हे संकट असेल! 
आजचं संकट आहे ‘कोविड-19’, उद्याचं संकट असणार आहे ‘क्लायमेट- 30’! 
आजपासून केवळ दहा वर्षांनी पर्यावरणाच्या या प्रश्नानं जगाला चिंताक्रांत केलेलं असेल आणि ‘कोविड-19’पेक्षा ‘क्लायमेट- 30’ हे संकट कितीतरी मोठं असेल. जगभरातल्या तज्ज्ञांनी आणि ‘आयपीसीसी’नंही (इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज) या धोक्याचे संकेत दिले आहेत. 

2030ला ‘क्लायमेट-30’ आपत्तीमुळे अशीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी यातले कोणतेही ‘उपाय’ लागू पडणार नाहीत. प्रत्येकाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील. अख्खं जग आज ‘लॉकडाउन’ झालंय. पूर्वी ही संकल्पना फक्त फॅक्टरींसाठी वापरली जायची. उद्योगांना जबरी तोटा झाला, त्यांची उत्पादकता थंडावली, थांबली, तर त्यावेळी हा शब्द वापरला जायचा; पण आज हा शब्द संपूर्ण देशासाठी वापरला जातोय. 
ही लोकांना घाबरवण्याची नाही तर या धोक्यापासून सजग आणि सज्ज राहण्याची गोष्ट आहे. 
कोणत्याही संकटावर दोनच प्रमुख उपाय असतात. एक म्हणजे ते संकटच मुळापासून नष्ट करणं आणि दुसरं, त्या संकटाचा आधीच अंदाज घेऊन त्याविरुद्ध लढण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवणं.
पर्यावरणाच्या संकटापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे काही उपाय आहेत की नाही?. आपण रिन्युएबल एनर्जीचा वापर करतोय, एनर्जी इफिशिएन्ट मार्गांचा वापर करतोय, ग्रीन एफर्ट घेतोय; पण हे सारेच उपाय परिघावरील आहेत. ते पुरेसे नाहीत. वीस-तीस वर्षांपूर्वी कार्बनचं जेवढं उत्सर्जन आपण करत होतो, तेवढंच आजही करतोय. ‘क्लायमेट चेंज’विषयी बोलणं ही गोष्ट तर आज फॅशन झाली आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही नेते इतरवेळी फक्त आर्थिक प्रश्नांवर बोलतात; पण त्यांना यापुढे स्व-सक्तीनं या विषयावर बोलावं लागेल आणि त्यासंदर्भात निर्णय घ्यावे लागतील. 
‘कोविड-19’नं आज जगाला हादरवलं, पर्यावरणाच्या प्रश्नांनीही यापूर्वी जगाला पुरेसे संकेत दिले आहेत. अनेक ठिकाणी महापूर आले, दुष्काळ पडला, हीटवेव्ह, कोल्डवेव्ह आल्या, राक्षसी पाऊस पडला, थंडर शॉवर्स झालेत.; पण आपण त्यापासून काय धडा घेतला? 
‘कोविड-19’ हा जगापुढे धरलेला आरसा आहे. या आरशात प्रत्येकानं, जगानं तातडीनं पाहायला हवं. त्यादृष्टीनं उपाय योजताना स्वत:ला तयार ठेवायला हवं. नाही तर ‘क्लायमेट-30’मुळे जगाचा विनाश अटळ आहे. 
त्यातल्या त्यात आशादायक गोष्ट हीच, की ‘कोविड-19’नं जगाचे डोळे उघडले आहेत. काय होऊ शकतं, याची झलक जगाला मिळाली आहे. या संकटाचा सामना आपण कसा करू, त्यावर ‘क्लायमेट-30च्या संकटाचा मुकाबला आपण कसा करू हे ठरेल. 
‘कोरोना’ हे आरोग्याशी निगडित संकट होतं. पुढचं संकट पर्यावरणाशी निगडित असणार आहे; पण त्याहीपेक्षा मोठा धोका म्हणजे आरोग्य आणि पर्यावरण या दोन्ही संकटांचं कॉम्बिनेशन झालं, ते एकत्र आले तर काय?. त्याचा विचार कोणी करणार आहे की नाही? तोही आत्ता आणि या क्षणी.
त्यावेळी या संकटातून आपल्याला वाचायचं असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे ‘प्लॅनेट बी’!. एखाद्या दुसर्‍या ग्रहावरच आपल्याला जावं लागेल; पण सध्यातरी पृथ्वीशिवाय आपल्याला पर्याय नाही. 

जागे व्हा, पृथ्वीच्या विनाशाचा धोका..
पृथ्वीवर जीवसृष्टी नांदायची असेल तर पृथ्वीचं सरासरी तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असायला पाहिजे. (पृथ्वीवर आज काही ठिकाणी तापमान पन्नास अंशांच्या पुढे तर ध्रुवीय प्रदेशात उणे पन्नास अंशांच्याही खाली जातं; पण या सार्‍याची सरासरी काढली तर पृथ्वीचं तापमान 15 ते 16 अंशांच्या दरम्यान असलं पाहिजे.) पृथ्वीचं तापमान वेगानं वाढतं आहे. त्यामुळे 2016 मध्ये झालेल्या पॅरिस करारानुसार पृथ्वीचं तापमान दोन अंशांनी कमी करण्यासाठी तातडीनं प्रयत्न करण्याचं जागतिक नेत्यांनी मान्य केलं; पण यासंदर्भात जगानं पुरेशी काळजी न घेतल्यानं दरम्यानच्या काळात पृथ्वीचं तापमान आणखी एक अंशानं वाढलं आहे. म्हणजे धोका आता आपल्या दाराशी आला आहे. 
पृथ्वीचं तापमान धोक्याच्या पलीकडे, नियंत्रणाबाहेर गेलं (आणखी चार ते पाच अंशांनी वाढलं) तर जगावर मोठीच आपत्ती कोसळेल. मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेत वर्षाकाठी महासंहारक हीटवेव्हज येतील, दुष्काळ पडेल. अनेक ठिकाणी अवकाळी मुसळधार पाऊस पडेल, आशियात अन्नधान्याची भयानक टंचाई निमराण होईल, समुद्राची पातळी तब्बल 70 मीटरनं वाढून किनारी प्रदेशांत महापूर येतील आणि तिथून आतल्या भागात मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होईल. मुंबई, न्यू यॉर्क आणि शांघायसारख्या महानगर परिसरातून कोट्यवधी नागरिकांना आपापल्या ठिकाणांहून हद्दपार व्हावं लागेल. 
महासागरांचं तापमान आणखी वाढून ते मोठय़ा प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून घेतील. समुद्रांचं पाणी अँसिडिक झाल्यामुळे माशांसह अनेक समुद्री जिवांचा नाश होईल. जगात मोठय़ा प्रमाणावरील लोकांचं मासे हे प्रमुख अन्न आहे. त्यामुळे ते भुकेला लागतील. 
आक्र्टिक समुद्र, अंटार्टिका खंड, सैबेरिया या भागातील हिम वितळून त्याखालील मिथेन वायू मोठय़ा प्रमाणात मुक्त होईल. त्यामुळे तापमान आणखी वाढेल आणि ग्लोबल वॉर्मिंग हाताबाहेर जाईल. हिमालयातील हिमनद्या वितळून सुरुवातीला महापूर येतील आणि नंतर नद्या आटल्याने पाण्याचं भीषण संकट जगासमोर उभं राहील. 
पाणीटंचाईमुळे अर्थातच पृथ्वीवरील झाडं कमी होऊन कार्बन सिंकही घटेल. कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढेल. विषिववृत्तापासून ते थेट ध्रुवीय प्रदेशापर्यंत पसरत गेलेल्या हीटवेव्हजमुळे पृथ्वीवरील अख्ख्या जीवसृष्टीसाठीच ती अखेरची मृत्युघंटा ठरू शकेल. 
आजपासून केवळ दहा वर्षांनी, म्हणजे 2030च्या दरम्यान येऊ घातलेल्या या आपत्तीच्या वेळी आपल्या मदतीसाठी दुसरा ग्रह धावून येईल आणि त्यावर आपल्याला वस्ती करता येईल याची कोणतीही गॅरंटी निदान आजतरी नाही. ‘कोविड-19’ या रोगाच्या निमित्तानं आज किमान धोक्याची घंटा तरी वाजली आहे. आताच काळजी घेतली नाही, तर ‘क्लायमेट-30’च्या वेळी तेवढी संधीही आपल्याला मिळणार नाही. 

कसं वाचाल या संकटातून?
‘कोविड-19’ या रोगावर आपल्याला अजून उत्तर सापडलेलं नाही. तात्पुरता उपाय म्हणून वारंवार हात धुऊन या विषाणूपासून लांब राहण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत; पण आजच पाण्याची टंचाई आहे, उद्या अशीच काही मोठी आपत्ती आली, तर कोट्यवधी लोकांना हात धुवायलाही पाणी नसेल ही वस्तुस्थिती आहे. आज आपण एकमेकांपासून दूर राहून, ‘सोशल डिस्टन्सिंग’ करून या आपत्तीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहोत; पण उद्याच्या संकटात आपल्याला पळ काढून चालणार नाही, तर एकमेकांच्या हातात हात घालून या संकटाचा सामना करावा लागेल. त्याची तयारी आजच करावी लागेल.
पृथ्वीचं तापमान कमी करायचं असेल तर ग्रीन हाउस गॅसेसचं उत्सर्जन मोठय़ा प्रमाणात घटवावंच लागेल. 2030 पर्यंंत कार्बन डायऑक्साइडचं प्रमाणही लक्षणीयरीत्या घटवावं लागेल आणि 2060 ते 2075 या काळात ते चक्क शून्यावर आणावं लागेल. ‘क्लायमेट-2030’चा धोका आजच आपल्या डोक्यावर घोंघावतोय. त्यापासून वाचायचं तर आत्ता, या क्षणापासून तयारी करायला हवी.

shende.rajendra@gmail.com
(राजेंद्र शेंडे पुणेस्थित तेर पॉलिसी सेंटरचे चेअरमन असून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक उपक्रमांचे निवृत्त संचालक आहेत.)
(शब्दांकन : समीर मराठे)

Web Title: 'Covid-19' to 'Climate-30'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.