घरातले स्थानबद्ध आणि बेघर स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:01 AM2020-04-05T06:01:00+5:302020-04-05T06:05:01+5:30

महाराष्ट्रातील 350 शहरांपैकी पाचपन्नास शहरात  काही हजार कोरोना रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे;  पण राज्यातल्या सुमारे 40 हजार खेड्यांपैकी  400-500 खेड्यांत हा रोग पसरला तर तेथे  आरोग्य सेवा पुरविणे शासनाला अशक्य होईल.  त्यातून खेड्यांत पुरेशी आरोग्य-सजगता नाही.  मूलभूत साधने आणि आरोग्य सेवकही पुरेसे नाहीत.  शहरात जगण्याची भ्रांत झाल्याने लोक गावी चालले आहेत.  गावी परतणार्‍या लोकांना आणि ग्रामपंचायतींना  तातडीने जागृत आणि सज्ज केले तर उपाय निघू शकतो.

closed in the homes and Homeless migrates | घरातले स्थानबद्ध आणि बेघर स्थलांतरित

घरातले स्थानबद्ध आणि बेघर स्थलांतरित

Next
ठळक मुद्देजगातील असंख्य माणसे घरात बंदिस्त झाली असताना, शहरातील कारखाने, यंत्ने आणि वाहने थंड झालेली असताना, निसर्गाने पहिल्यांदाच गेल्या दोनशे वर्षांत मोकळा श्वास घेतला आहे. 

- सुलक्षणा महाजन

 मुंबई स्थलांतरितांची आद्य राजधानी. मीही त्यातील एक स्थलांतरित. 1967 साली शिक्षणाच्या निमित्ताने मी मुंबईत आले. मरीन ड्राइव्ह. राणीच्या गळ्यातला जगप्रसिद्ध रत्नहार. त्या हारामध्येच आमची मुलींच्या वसतिगृहाची एक इमारत गुंफलेली होती. कॉलेजव्यतिरिक्त फावल्या वेळात मनसोक्त भटकणे हा माझा विरंगुळा होता. तेव्हापासून देशातली आणि परदेशातील जमतील तितकी शहरे जाणून घेण्यासाठी पायी किंवा बसने भटकण्याचा छंद मला कायमचा चिकटला; पण एक दिवस स्थलांतरितांच्या प्रश्नावरून मुंबईमध्ये शिवसेनेने आंदोलन सुरू केले. आम्ही सर्व मुली चार दिवस आमच्या होस्टेलमध्ये स्थानबद्ध झालो! त्यावेळी मुंबईमधील स्थलांतरित जिवाच्या भीतीने पळून गेले की जमेल तेथे दडून बसले हे मला आठवत नाही. त्या चार दिवसात, रेशनचा काळ आणि अन्नधान्याचा तुटवडा असल्यामुळे पुरेसे जेवणही मिळत नव्हते. ब्रेड, दूध, केळी, भाज्या गायब झाल्या होत्या, ते मात्न आठवते. मैत्रिणींच्या सहवासात ते दिवस निभावले.  
आज कोरोना साथीच्या काळात शिवसेनेचे मुख्यमंत्नी आहेत. गेले काही दिवस टीव्हीवरून सतत परराज्यातील लोकांना मुंबई आणि शहरे सोडू नका, आहे तिथेच थांबा, शासन तुमची काळजी घेईल असे आश्वासन देत आहेत. गेल्या पन्नास वर्षांत शिवसेनेत झालेला हा बदल अचंबित करणारा असला तरी दिलासा देणारा आहे. दुसरीकडे शहरे सोडून गावी जाण्यासाठी लोकांची होत असलेली धावपळ, धडपड आणि ससेहोलपट बघून वेदना होत आहेत. शिवाय गावी परत गेल्यावर तेथे त्यांचे स्वागत कसे होईल, त्यांना कशी वागणूक मिळेल, त्यांना घरात, गावात  आसरा आणि आधार मिळेल ना, याचीही चिंता आहे. 
शहरातले ग्रामस्थ दिवाळी-दसरा-गणपती उत्सवासाठी गावी जाताना बरोबर खाऊ आणि भेटी घेऊन जात. आज मात्न ते सामानाची गाठोडी आणि जीव मुठीत घेऊन परत निघाले आहेत. मात्र कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी वाहने, रेल्वेगाड्या, बसेस अचानकपणे बंद झाल्या. घर असणारे स्थानिक गुपचूप घरात बसले; पण अस्थिर स्थलांतरित मात्न अचानक बेकार, बेघर आणि बेसहारा झाले आहेत. 
हातावर पोट असणारे असंख्य मजूर, कामगार, शहरातून गावाकडे चालत निघाल्याच्या बातम्या वाचून, दृश्ये बघून मन अस्वस्थ होत होते. त्यांना वाटेत आणि गावी पोहोचल्यावर कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल याचा विचार मी करीत होते. त्याचवेळी एका टीव्ही चॅनलकडून या विषयावर माझे मत मोबाइलवर रेकॉर्ड करून पाठविण्याची विनंती आली. मी माझे मत पाठविले; पण टीव्ही चॅनलने स्थलांतरित निघून गेले तर शहरांचे कसे होईल हा विषय चर्चेला घेतला होता. शहर अभ्यासक असून मी ग्रामीण लोकांची चिंता का करते आहे हे त्यांना समजले नाही. तेव्हा मी त्यांना खेड्यापाड्यांची, परतणार्‍या लोकांची काळजी का महत्त्वाची आहे, हे समजावून सांगितले.
 कोरोना विषाणूविरोधातील हे माणसांचे युद्ध आहे आणि या काळात युद्धनीतीचे विशेष महत्त्व लक्षात घ्यायला हवे. युद्धामध्ये शत्नूशी लढताना आपल्याला सोईच्या अशा मोजक्या ठिकाणी आघाड्या उघडण्याचे तंत्न असते. एकाचवेळी अनेक आघाड्या उघडल्या तर शत्नूशी सामना करणे अवघड असते. तसाच विचार आज कोरोनायुद्धाच्या बाबतीत करणे आवश्यक आहे. कोरोना सुरुवातीला थोड्या शहरात आढळला. तेथे त्यावर मात करण्याची साधने, आरोग्य सेवक, डॉक्टर, इस्पितळे उपलब्ध होती. आता तो अनेक शहरात पसरला आहे. शहरांमध्ये आरोग्य, प्रशासकीय यंत्नणा अधिक बरी आहे. शहरात लोकांना घरात बंदिस्त करून संसर्ग रोखणे तुलनेने सोपे आहे. म्हणूनच कोरोनाचा ग्रामीण भागात होऊ शकणारा फैलाव रोखण्यासाठी वाहतूक साधने बंद केली आहेत. 
महाराष्ट्रातील 350 शहरांपैकी पाचपन्नास शहरात काही हजार कोरोना रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे; पण राज्यातल्या सुमारे 40 हजार खेड्यांपैकी 400-500 खेड्यांत हा रोग पसरला तर तेथे आरोग्य सेवा पुरविणे शासनाला अवघडच नाही तर अशक्य होईल. त्यातून आपल्या खेड्यातील लोक आरोग्य-सजग नाहीत. आजही खेड्यांमध्ये बालकांना पोलिओ आणि इतर लस देण्याच्या सर्व सुविधा असतानाही सामाजिक-सांस्कृतिक आणि मानसिक अडथळे आहेत. कोरोनाच्या अकस्मात झालेल्या हल्ल्याशी लढण्यासाठी तर मूलभूत साधने, शिक्षण आणि आरोग्य सेवकही पुरेसे नाहीत. म्हणूनच लोकांना शहरातून गावी न जाण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही लोक गावी चालले आहेत. त्यामुळेच आता गावी परतणार्‍या लोकांना आणि ग्रामपंचायतींना तातडीने जागृत आणि सज्ज केले पाहिजे.
मी नगररचना अभ्यासक असले तरी ग्रामीण भागाचा विचारही अपरिहार्य ठरतो. माझ्या दृष्टीने शहरी-ग्रामीण अशी विभागणी करून विकासाचा विचार करणे कालबाह्य झालेले आणि चुकीचे परिप्रेक्ष्य आहे. शहरे आणि खेडी यांच्यात विकासाच्या संदर्भात आज खूप मोठी तफावत असली तरी खेड्यांनाही नागरी सुविधा, शिक्षणाच्या संधी आणि आरोग्य सेवा देऊन ती तफावत कमी करणे हे शहर नियोजनाचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे. शहरे-खेडी यांच्यातील जोडण्या अधिक सशक्त, वेगवान करून, त्यांचे सामाजिक-सांस्कृतिक नातेसंबंध बळकट करूनच खेड्यांची सुधारणा होऊ शकते. खेड्यातील तरुण, चुणचुणीत आणि खणखणीत लोक शहरामध्ये स्थलांतर करतात त्यामुळे शहरांचा विकास होतो आणि गावांमध्येही विकासासाठी आवश्यक ऊर्मी तयार होतात. 
सातत्याने शहरांकडे होणारे स्थलांतर, शहरांची वाढती संख्या आणि शहरी लोकसंख्येचे प्रमाण हे विकासाचे निदर्शक असते. पन्नास वर्षांपूर्वी हे ज्ञान आणि जाणीव नसल्यानेच मुंबईमध्ये स्थलांतराला विरोध होत असे. घरबांधणीवर बंधने घातली की स्थलांतर थांबेल अशीही भाबडी समजूत तेव्हा होती; पण त्यामुळेच झोपडपट्टय़ा वाढल्या हे आज समजले आहे. प्रत्यक्षात आजही तरुण शहरात स्थलांतर करतात आणि वृद्ध, महिला आणि लहान मुले खेड्यात राहातात. शहरातील आर्थिक उत्पन्नावर गावातील घरे-माणसे जगत आली आहेत. आज मात्न शहरातले हे स्थलांतरित गावाकडे गेल्यावर विषाणू नेतील या भीतीने तेथेही त्यांना आसरा मिळाला नाही तर ती मोठी आपत्तीच ठरेल. 

कोरोना विषाणूने प्रथम भारतामधील मोठय़ा शहरांमध्ये प्रवेश केला. विमानसेवेमुळे जगातील असंख्य शहरे जोडली गेली आहेत. गेली काही दशके भारतामधील आणि जगाच्या सर्वच देशातील लोक वेगवेगळ्या कारणांसाठी देशोदेशी प्रवास करीत आहेत. त्यांच्याच माध्यमातून कोरोनाचे अदृश्य विषाणू भारतामध्ये शिरले. विमानातून प्रवास करणारे सहसा र्शीमंत असतात, असाही एक समज प्रचलित आहे; पण तो सर्वस्वी खरा नाही. कारण भारतामधील लाखो बांधकाम मजूर, कामगार, नर्सेस, ड्रायव्हर हे अनेक देशामध्ये स्थलांतर करीत आले आहेत. कोरोना विषाणूला र्शीमंत-गरीब हा मानवी भेद समजत नाही. एकाच विमानातून प्रवास करणारे कोट्यधीश आणि थोडे उत्पन्न असणारे कष्टकरी; कोरोना रोगाचा फैलाव आपापल्या समाजवर्तुळात करू शकतात याची चुणूक सार्ससारख्या रोगाने काही वर्षांपूर्वी दाखवलेली होती. 
कोरोनाच्या या नव्या विषाणूने तर र्शीमंत-गरीब अशा जगातल्या सर्वच शहरांमध्ये इतकी मोठी दहशत निर्माण केली आहे की त्यामुळे कदाचित दहशतवादी अतिरेकीही आपल्या कारवाया थांबवतील. जगातील देशांचा सैन्यावरचा खर्च कमी होऊन आरोग्य सेवांवर वाढला तर कोरोनाला त्याचे र्शेय द्यावे लागेल! तसेच आपल्याकडेही राजधानीतील भव्यदिव्य वास्तुप्रकल्प, पुतळे, स्मारके यांच्यावरील वायफळ आणि अस्मिताबाजीवर होणारा खर्च कमी होऊन दूरगामी लोककल्याणाच्या कार्यक्रमांवर वळविला गेला तर कोरोना ही इष्टापत्तीच होती अशी इतिहासात नोंद होईल. आज सूक्ष्म विषाणू जगातील विकसित, र्शीमंत देशांच्या अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, स्वास्थ्य, राजकीय-प्रशासकीय यंत्नणांवर किती मोठा परिणाम करू शकतात हे आपण बघतो आहोत. कोरोनामुळे धार्मिकस्थळेही ओस पडली आहेत आणि कोणत्याही धर्माचे देव किंवा प्रेषित नव्हे तर आपलेच शहाणपण आणि वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न मानवजातीला यातून वाचवू शकतील; पण आज तरी त्यांच्याकडे कोरोनावरचे रामबाण उपाय नाहीत. या संकटातून केवळ मानवी वर्तनच आपले रक्षण करू शकेल.  
जगातील असंख्य माणसे घरात बंदिस्त झाली असताना, शहरातील कारखाने, यंत्ने आणि वाहने थंड झालेली असताना, निसर्गाने पहिल्यांदाच गेल्या दोनशे वर्षांत मोकळा श्वास घेतला आहे. गेले काही दिवस मी घरात बसून नानाविध पक्षी बघत आहे, शहरांच्या आवाजात दबलेले त्यांचे आवाज ऐकते आहे. हीच वेळ शहरांचा वेगळ्या पद्धतीने विचार करून शाश्वत विकास धोरणे समजून घेण्याची आहे. 
निसर्गसृष्टी आणि मानवसृष्टीमध्ये गेल्या पाचशे वर्षांत तीव्र झालेली, तसेच मानवांच्या देशोदेशी विखुरलेल्या समाजात सुरू असलेली आर्थिक स्पर्धा घातक टोकाला पोहोचलेली आहे. आजचे विकासाचे प्रयत्न चुकीच्या मार्गांनी चाललेले आहेत याचे भान आज लोकांनाच आहे. आता कोरोनाच्या अनुभवामुळे ही चूक इतराना समजेल. हीच वेळ शाश्वत जागतिक विकासाची उद्दिष्टे प्रत्येकाने समजून घेण्याची आणि मनापासून स्वीकारण्याची आहे. जगातील मानवी समाजात असलेली तीव्र विषमता, अवास्तव उपभोग कमी करून समावेशक आणि शाश्वत विकासाचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडताना मानवजात अधिक जबाबदार होईल, अशी मला आशा आहे. 

sulakshana.mahajan@gmail.com
(लेखिका प्रख्यात नगर नियोजनतज्ज्ञ आहेत.)

Web Title: closed in the homes and Homeless migrates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.