अतिवादाच्या भिंती पाडा, पुन्हा उधाण येईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 10:51 AM2021-11-28T10:51:15+5:302021-11-28T10:54:57+5:30

१९६०-७० चा काळ चळवळीने रसरसलेला होता. दलित पॅँथर आणि नामांतराची चळवळ यामुळे आंबेडकरी समाजात मानसिक ऐक्य वाढले होते. अनेक नियतकालिके आणि अनियतकालिके निघत. हे वातावरण एकजातीय नव्हते.

Break down the walls of extremism, it will flood again! | अतिवादाच्या भिंती पाडा, पुन्हा उधाण येईल!

अतिवादाच्या भिंती पाडा, पुन्हा उधाण येईल!

Next

- शरणकुमार लिंबाळे
(सरस्वती सन्मान प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक)

जच्या एकूण मराठी साहित्याविषयी विचार करताना मला माझे उमेदवारीचे दिवस आठवतात. ‘दलित पॅँथर’च्या उदयाचा काळ. स्वातंत्र्यानंतर जन्मलेली तरुण पिढी आणि  स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेली स्वातंत्र्य चळवळ पाहिली-अनुभवलेली ज्येष्ठ पिढी; ह्या दोन पिढ्यांमधल्या संवादातूनच नवीन समाजिक रसायन तयार होत होते. 
१९६०-७० चा काळ चळवळीने रसरसलेला होता. दलित पॅँथर आणि नामांतराची चळवळ यामुळे आंबेडकरी समाजात मानसिक ऐक्य वाढले होते. अनेक नियतकालिके आणि अनियतकालिके निघत. हे वातावरण एकजातीय नव्हते. दलित पॅँथर आणि दलित साहित्याच्या उदयाचे स्वागत करणारा मोठा पुरोगामी वर्ग होता. पुढल्या काळात दलित चळवळीतल्या   वाढलेल्या महत्त्वाकांक्षांचे दूरगामी परिणाम आले. पुरोगामी समाज दलित चळवळीपासून चार हात दूर गेला आणि  दलित चळवळीत गटबाजी वाढली. दलित पॅँथर आणि ‘दलित साहित्या’ची चळवळ उभी राहिली. ‘दलित’ या शब्दाला विरोध करून या दोन चळवळी मोडीत काढण्याचे डाव रचले गेले. म्हणूनच ‘दलित चळवळ’ आणि ‘दलित साहित्य’ याला मरगळ आली आहे का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले.
दलित साहित्याच्या झंझावातमुळे मराठी साहित्याला भरती आली. अनेक सामाजिक स्तर जागे झाले.  मराठीत दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, कामगार साहित्य असे अनेक प्रवाह रसरसून आले. त्यातले दलित, ग्रामीण आणि स्त्रीवादी साहित्य हे प्रवाह स्थिर झाले. या प्रवाहांमुळे पांढरपेशी मराठी साहित्याचा चेहरामोहरा बदलून गेला, अनेक सामाजिक स्तरांतून लेखक निर्माण झाले. मराठी साहित्यात नवीन अनुभव, नवीन नायक, नवीन भाषा आणि विचारांची भर पडली, जे दलित चळवळ आणि दलित साहित्याचे झाले तेच ग्रामीण साहित्य आणि स्त्रीवादी साहित्याचे झाले.
 दलित साहित्यातील ‘बलुतं’चे दिवस, ग्रामीण साहित्यातील ‘झोंबी’चे दिवस आणि स्त्रीवादी साहित्यातील ‘मुलगी झाली हो’चे दिवस हे भारावलेले होते. या तीन प्रवाहांनी मराठी साहित्य समृद्ध केले, पण या तीन प्रवाहात परस्पर-संवाद नव्हता. स्त्रीवादी साहित्य मध्यमवर्गीय स्त्रीच्या प्रश्नांपलीकडे पोहोचू शकले नाही. ग्रामीण साहित्य चळवळीतील   लेखकांनी दलित साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य चळवळीशी कधी जुळवून घेतले नाही. या तीन वाङ्मय प्रवाहातील मुखंडांना आपापल्या प्रवाहाचीच काळजी होती. त्यामुळे प्रत्येकाचे लक्ष आपले प्रश्न आणि आपले विषय या परिघातच सीमित झाले. ग्रामीण लेखकांनी शेतकरी, शेती, जनावरे आणि ग्राम संस्कृती याला महत्त्व देत फुले आंबेडकरांपासून दूर राहाणे पसंद केले. शेती शिवाराचे प्रश्न साहित्यात आणले, पण ग्रामीण माणसाच्या अस्मितेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वास्तव ग्रामीण लेखकांना वेळीच ओळखता आले नाही. खरेतर हे लेखक  बहुसंख्येने बहुजन समाजातले होते. मराठा लेखकांची संख्या अधिक होती.  त्यांनी जाती व्यवस्थेविषयी मौन बाळगले. ग्रामीण लेखकांना ‘एक मराठा लाख मराठा’ची साधी चाहूलसुद्धा लागू नये याचे आश्चर्य वाटते. 
दलित, ग्रामीण आणि स्त्रीवादी चळवळीतील अलगता आणि संवादहीनता यामुळे या चळवळी वेगळ्या पडल्या. बाबरी विध्वंसापर्यंतचा काळ धर्मनिरपेक्षता, समाजवाद, पुरोगामी आणि डावी चळवळ याच्या प्रभावाने विकसित होत होता. बाबरी आणि मंडल आयोगाची चळवळ एकाच वेळेला आमने-सामने उभ्या राहिल्या. मला वाटते, पुरोगामी चळवळीला पहिला गतिरोधक इथं तयार झाला. पुढल्या काळात उजव्या शक्ती सत्तेवर आल्या आणि पुरोगामी चळवळींचे पानिपत झाले. 
त्यात भर पडली एकविसाव्या शतकाची. अनेक क्षेत्रांत बदल झाले. हे बदल मराठी लेखकाला नीटपणे समजून घेता आले नाहीत. विज्ञान- माहिती तंत्रज्ञान, क्लायमेट चेंज, मोबाईल क्रांती,  लव्ह इन रिलेशनशिप, सिंगल मदर, सरोगेट मदर, समलिंगी समाजाचे प्रश्न, समाजात वाढलेले धृवीकरण, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, स्थलांतरितांचे प्रश्न हे आमचे जणू प्रश्नच नाहीत, असे मराठी लेखकांना वाटत असावे, अशी मराठी साहित्याची अवस्था आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेले वाङ्मय प्रवाह आता लोप पावत असून मुख्य प्रवाहच टिकून राहिला नाही असे हल्ली म्हणतात.  मला वाटते, आजचा मुख्य प्रवाह हा पांढरपेशी साहित्याचा नाही. अनेक वाङ्मय प्रवाहातल्या मराठी लेखकांनी मुख्य प्रवाहाचे स्वरूप बदलून टाकले आहे. वाङ्मय प्रवाहांचे अवशेष लेखकांचे गट-तट आणि पंथ स्वरूपात शिल्लक आहेत. हे मराठी साहित्याच्या वर्तमानासाठी हिताचे नाही. अशा वाङ्मयीन वातावरणात नवीन लेखकांची पिढी कशी निर्माण होईल? 
नवीन लेखकांपुढे हे गंभीर आव्हान आहे. पुन्हा एकदा शिबिरे, कार्यशाळा, संमेलने, चर्चा यांचे उधाण आले पाहिजे आणि एकमेकांतील वेगळ्या अतिवादाच्या भिंती पाडण्यासाठी समंजस संवाद सुरू झाला पाहिजे.

Web Title: Break down the walls of extremism, it will flood again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.