शिक्षण एक दृष्टिकोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:42 PM2020-03-21T18:42:38+5:302020-03-21T18:42:43+5:30

भारताचा पूर्वेतिहास बघितला तर प्रामुख्याने लक्षात येईल की भारतात शिक्षणाची थोर परंपरा होती.

 An approach to education | शिक्षण एक दृष्टिकोन

शिक्षण एक दृष्टिकोन

Next

जगात कुठल्याही देशाची प्रगती अथवा अवनती ही दिल्या गेलेल्या शिक्षणाचा परिणाम असतो म्हणजे शिक्षण हे श्रेष्ठ दर्जाचे असले तर प्रगती ही होणारच. दुसऱ्या बाजूला शिक्षण व्यवस्था ही आजारी वा पक्षपाती धोरणाची असेल तर अवनतीच बघायला मिळणार. शिक्षणामुळेच आज मानव प्रगतीची शिखरे पादाक्रांत करू शकला.
या दृष्टिकोनातून भारताचा पूर्वेतिहास बघितला तर प्रामुख्याने लक्षात येईल की भारतात शिक्षणाची थोर परंपरा होती. तक्षशिला आणि नालंदा विश्वविद्यालये याची फार मोठी साक्ष होती. मध्ययुगीन कालखंडात ब्रिटिशांनी सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. ब्रिटिशांच्या काळातही साामजिक क्षेत्रावर परंपरावाद्यांचीच अघोरी बंधने होती. स्त्रियांना गुलाम बनविणारी मानसिकता अबाधित होतीच, शिवाय सर्वच स्त्रिया शिक्षणाच्या बाबतीतही दुर्लक्षित ठेवल्या गेल्या होत्या.
दरम्यान, म. फुले आणि त्यांचाच क्रांतिकारी हात धरून सावित्रीबाई फुले या रस्त्यावर उतरल्या. त्यांनी थेट जाचक व्यवस्थेलाच आवाहन दिले. स्त्रीशिक्षणाला प्रारंभ करून यांनी इतिहासाची दिशाच बदलून टाकली. म. फुलेंना संपविण्यासाठी तयारीनिशी मारेकरी धाडले; पण त्या मारेकऱ्यांचे मनपरिवर्तन झाल्याने त्या समाजद्रोह्यांचा हेतू सफल होऊ शकला नाही. तरीही त्यांनी माघार घ्यावी म्हणून सावित्रीबाईचा नानाप्रकारे छळ करणे सुरूच ठेवले. त्याही आपल्या ध्येयापासून दुरावल्या नाहीत. याचा परिणाम असा झाला की जाचक अशा जाचातून स्त्री कायमची मुक्तहोऊन ती प्रगतीकडे जिद्दीने वाटचाल करायला लागली म. फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे उपकार कुठल्याच भारतीय स्त्रीला दुर्लक्षित करता योणारच नाहीत.
म. फुले यांनी शिक्षणाची दारे खुली केल्यानंतर तो प्रवाह खंडित न होता अधिकच वेगवान होत गेला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तेजस्वी उदय झाला आणि त्यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा ऊर्जापूर्ण संदेशच दिला आणि देशाच्या संविधानात स्त्रियांच्या स्वातंत्र्य अन् सर्व प्रकारच्या प्रगतीला अभूतपूर्व असे स्थान दिले, संरक्षण आणि आधार दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच जाचक प्रकारांना सुरुंग लावला. व्यवस्थेने माणूस म्हणून नाकारलेल्यांना माणूस म्हणून प्रतिष्ठित केले. त्यांना संविधानाच्या माध्यमातून समानतेसह त्यांच्या हक्काची तरतूद केली. त्यांचा सर्वाधिक जोर हा शिक्षणावरच होता. त्याशिवाय कुणाचाच उद्धर होणार नाही हे ते निक्षून सांगायचे. ते असेही सांगायचे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणामुळे मनुष्य हा परावलंबित्व झुगारतो, हे त्यांनी अचूकपणे हेरले होते. त्यांच्या प्रयत्नामुळेच शिक्षण हे त्या काळच्या अस्पृश्य, बहुजन आणि डोंगरदºयातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आजच्या काळात जी काही आंदोलने दिसताहेत ती लोकांपर्यंत शिक्षण पोहोचले याचाच परिणाम आहे. म. फुले यांच्या पूर्वी बहिष्कृतांचा प्रचंड छळ होत असूनही त्या काळी कुठे बंडखोरीची भाषा कुणाच्या ओठावर येत नव्हती, कारण हेच की लोक जाणीवपूर्वक शिक्षणापासून वंचित ठेवले गेलेले होते, हे लक्षात घ्यावे लागते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूणच कार्याचा परिणाम म्हणून प्रथम:च १९६० नंतर दलित साहित्याची निर्मिती झाली. पूर्वकाळात आपल्या हक्कासाठी बोलण्याचा अधिकार नसलेल्याच्या हातांमध्ये लेखण्या आल्या आणि त्या त्यांच्या संवैधानिक अधिकारासाठी अन्याय, अत्याचाराच्या विरोधात कार्यरत झाल्या. त्या लेखण्या संशोधन क्षेत्राकडेही वळल्या. त्यांनी इतिहासाबरोबरच साहित्याची विविध क्षेत्रे आपल्या अधिकारात आणली. हा असा सगळा परिणाम बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक क्रांतीचा परिणाम होय. हे पदोपदी ध्यानात घ्यावे लागते.
तत्पूर्वी विशिष्ट लोकांचीच साहित्य क्षेत्रात असलेली मक्तेदारी संपुष्टात आली. साहित्याच्या कक्षा रुंदावल्या. दलित साहित्याच्या प्रेरणास्थानीच डॉ. बाबासाहेब होते, असे सर्वार्थाने सत्य नसून, स्त्रीवादी साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य आणि इतरही प्रकार हे त्यांच्याच प्रेरणेतून ऊर्जासंपन्नतेकडे आगेकूच करीत राहिले यावरून मानवी उत्कर्षासाठी शिक्षण किती महत्त्वाचे हे अधोरेखित होते.
मानवी विकासामध्ये दर्जेदार शिक्षण हे निर्विवादपणे महत्त्वाचे आहे; पण हा मुद्दा गंभीरपणे लक्षात घेतला जातो का हा मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. काही वर्षांपूर्वी दहावी-बारावीचे निकाल फार कमी लागायचे. कारण घेतल्या जाणाºया परीक्षांमध्ये पारदर्शकता होती. नंतरच्या काळामध्ये फार मोठा फरक पडला. शहरातही परीक्षा केंद्रे सोडली तर ग्रामीण भागातले चित्र निराशजनक आहे. त्या ठिकाणी कॉप्यांचा सुळसुळाट असल्याचे निदर्शनास येत आहे. नैतिकतेला काळिमा लागल्याचा हा परिणाम म्हणावा लागेल. दुसरीकडे शिक्षण हे दर्जामुक्त झालेले आहे आणि ही चिंतेची बाब आहे. शिक्षणातले गांभीर्य हे लोप पावत जाणे हे विकासाला बाधक ठरत आहे. शिवाय शासनाचा आदेश असा आहे की आठवीपर्यंत कुणालाही नापास करता येत नाही, त्यामुळे अभ्यासाचे महत्त्व कमी होते आणि विद्यार्थ्यांमध्ये परिपक्वता येणे कठीण होऊन जाते. विद्यार्थ्यांच्या सकस अशा प्रकारच्या जडणघडणीमध्ये प्रारंभचा काळ हा फारच महत्त्वाचा असतो आणि नेमक्या त्याच सुमारास अभ्यासवृत्ती लोप पावत चाललीय. इंग्रजी शाळांची अवस्था मात्र वेगळी आहे. तिथे प्रत्येक प्रकरणावर स्पर्धा आहे. विद्यार्थी अभ्यासू प्रवृत्तीचे बनतात. ते प्रगतशील असतात. या तुलनेत बहुतांश जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था बिकट आहे. विद्यार्थी आणि शिक्षणामध्येही मोठ्या प्रमाणात औदासीन्य दिसते, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे.
विद्यापीठीय स्तराचा विचार केल्यास ध्यानात येते की बी.ए., बी.कॉम., डी.सी.ए. या पदव्यांकडे ग्रामीण भागातले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वळतात; पण उपयोग काय? पदवीनंतर या मुलांना कुठेही रोजगार उपलब्ध होत नाही. कारण ते अभ्याससूत्र आणि रोजगाराचा कुठेही संबंधच जुळत नाही. त्यामुळे अशी मुले नैराश्यग्रस्त होऊन जीवनात अपयशी होतात. या पृष्ठभूमीवर प्रश्न निर्माण होतो की स्पर्धा परीक्षेशिवाय नोकरीच मिळत नसेल तर तसे उपयुक्त अभ्याससूत्र हा निर्माण केला जात नाही.
गेल्या पाच वर्षांपासून तर सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. यामुळे नोकरभरती बंद आहे. मला वाटते की पुतळ्यावर वारेमाप खर्च केल्यापेक्षा, मंदिरे उभारण्यापेक्षा, उद्योगपतींची कर्जे माफ केल्यापेक्षा त्या पैशातून गोरगरिबांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. असे झाले तर देश प्रगतिपथावर असेल.
आणखी चिंतेची गोष्ट म्हणजे, रोजगार मिळत नसल्यामुळे शिकलेले तरुण हे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत. कारण त्यांना मानवी मूल्याचे शिक्षणच दिले जात नाही. लक्षात येते की ज्या विचाराचे सरकार असते त्याच विचाराचे अभ्यासक्रम तयार केले जातात. विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षणाबरोबराच स्वावलंबी होता येईल असे शिक्षण दिले जावे. शिक्षणानंतर बेरोजगार म्हणून यातना भोागव्या लागू नयेत यासाठी विद्यार्थ्यांनी सतर्क असायला हवे. आयटीआय, पॉलिटेक्निक, कृषी डिप्लोमा, फार्मसी, व्यक्ति मत्त्व विकास अशा आणि इतरही उपयुक्त ठरतील अशाच विषयांकडे वळण्याची अत्यावश्यकता आहे. सोबतच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलींनीही निराश न होता व्यावसायिक दृष्टिकोन अंगीकारावा त्यासाठी त्यांनी ब्युटीपार्लर, शिलाई मशीन यासारख्या प्रशिक्षणाकडे वळावे.
माणसाला वीतभर पोट आहे; परंतु ते आभाळाएवढे प्रश्न निर्माण करते. त्यापाठोपाठ मूलभूत गरजाही पाठलाग करत राहतात. प्रश्नामागून प्रश्नांचा मारा सुरूहोतो आणि माणसाचे अख्खे आयुष्य चिंतांनी ग्रासले जाते. विविध आव्हाने उभी राहतात. जीवन नकोसे होऊन जाते. हे टाळायचे असेल तर माणसाला सक्षम बनवू शकेल असेच शिक्षण घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. रोजगारप्राप्ती व्हावी यासाठीच शिक्षण पुरेसे नसते तर मानुष्याला मनुष्य म्हणून ताठ मानेने जगता यावे यासाठी नैतिकतेचे संस्कार घडविणारेही शिक्षण महत्त्वाचे आहे म्हणून आयुष्यभर माणसाने आपल्या मनाला सुसंस्कारित करण्यासाठी वृत्तपत्रे, मासिके,ग्रंथ वाचायला हवीत. रोजगाराने जगण्याचे प्रश्न सुटतात, तर वाचनाने मने घडतात. म्हणून मनुष्य म्हणून वावरता यावे यासाठी शिक्षणाच्या वैविध्यपूर्ण बाबींचा गंभीरपणे विचार हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. कारण शेवटी आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागणार आहेत, ही जाणीव प्रत्येकाला असावी.


प्रा.डॉ. विजय जाधव
राजस्थान महाविद्यालय,
वाशिम
९८८१५२७६६०

Web Title:  An approach to education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.