मांजरांकडून माणसाने शिकावेत असे १० धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 06:00 AM2021-09-26T06:00:00+5:302021-09-26T06:00:03+5:30

निसर्गाकडून आपण बरंच काही शिकत असतो. निसर्गातले प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पतीही आपल्याला काही ना काही शिकवत असतात. मांजरांचंच उदाहरण घ्या. आपल्या कृतीतून अनेक गोष्टी ती आपल्याला शिकवत असतात. त्यांच्याकडून घेण्यासारखे खूप धडे आहेत.

10 Lessons Man Should Learn From Cats | मांजरांकडून माणसाने शिकावेत असे १० धडे

मांजरांकडून माणसाने शिकावेत असे १० धडे

googlenewsNext
ठळक मुद्देसतर्क राहा, चौकस राहा, संधीची वाट पाहा, ‘उंदीर’ तुमच्या पंज्यात येईलच!

लोकमत न्यूज नेटवर्क

निसर्गाकडून आपण बरंच काही शिकत असतो. निसर्गातले प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पतीही आपल्याला काही ना काही शिकवत असतात.

मांजरांचंच उदाहरण घ्या. आपल्या कृतीतून अनेक गोष्टी ती आपल्याला शिकवत असतात. त्यांच्याकडून घेण्यासारखे खूप धडे आहेत.

१- लक्ष्य मोठ्या गोष्टींकडे ठेवा. त्यासाठी उंच उडी मारा. समजा, ‘पडलात’, तरी किमान ‘स्वत:च्या पायावर‘ उभं राहण्याची हिंमत तर येईल!

२- प्रयत्न सोडू नका. एकदा अपयश येईल, दोनदा येईल, पण प्रयत्न करीत राहा. केव्हा ना केव्हा यश मिळेलच. नाहीच काही, तर तुमची झेप तरी मोठी होईल!

३- दोऱ्याच्या रीळपासून तर छोट्या चेंडूपर्यंत कशाशीही मांजरं खेळत असतात. लहान लहान गोष्टींतूनही आनंद मिळवतात, तो असा!

४- आधी स्वत:ची काळजी घ्या. ‘पडलात’, तरी तुम्हाला दुखापत नाही झाली पाहिजे. स्वत:ची काळजी जर तुम्हाला घेता आली नाही, तर दुसऱ्यांना मदत तुम्ही कशी करणार?

५- सतर्क राहा, चौकस राहा, संधीची वाट पाहा, ‘उंदीर’ तुमच्या पंज्यात येईलच!

६- कुत्रा अनेकदा मांजरीच्या मागे लागतो. मांजर जीव खाऊन पळते. शेवटी कुत्रा मांजरीला अशा कुठल्या तरी कोपऱ्यात गाठतो, जिथून पुढे जायला काहीच जागा नसते. आता काय करायचं? मांजर मागे वळते. रुद्रावतार धारण करते. आता ‘स्वत:साठी’ उभी राहते. जो कुत्रा इतका वेळ तिच्या मागे धावत होता आणि त्याला घाबरून ती पळत होती, त्याच्याच अंगावर इतक्या त्वेषानं ती धावून जाते की, तो कुत्राही घाबरतो, हादरतो, आपलं काही खरं नाही, हे ओळखून मागे सरकतो..

 

७- मांजरांच्या बाबतीत ‘चट्टामट्टा’ असा शब्द हमखास वापरला जातो. जे काही मिळेल, त्याचा ती चट्टामट्टा करतात. आपणही आपल्या जवळच्या गोष्टींचा पूर्ण उपयोग केला, पुरेपूर उपभोग घेतला, तर त्या गोष्टींचं मूल्य वाढतंच.

८- मांजराचं पिलू थोडं मोठं झालं तरी ते लगेच ‘स्वतंत्र’ होतं, आईच्या छायेपासून आणि मायेपासून दूर जातं, स्वत:च्या पायावर उभं राहतं..या पिलांकडूनही शिकण्यासारखं बरंच काही आहे आणि अर्थातच त्याला दूर जाऊ देणाऱ्या त्याच्या आईकडूनही!

९- वेळेचं महत्त्व मांजरानं नेहमी ओळखलेलं असतं. स्वत:साठी वेळ द्यायला हवा, त्या वेळात मौज, मस्ती, ऐश करायला हवी, याचं त्यांना सतत भान असतं. मांजरांना असं स्वत:च्याच मस्तीत कधी पाहिलंय? जगाला फाट्यावर मारून ती मस्त डुलक्या काढत असतात. त्याच त्या कॅट नॅप्स!

१०- डॉक्टर तुम्हाला किती वेळा सांगतात, सकाळच्या कोवळ्या उन्हात बसत चला, त्या उन्हात थोडं चाला.. सकाळची उन्हं खात ऐटीत बसलेली मनीमाऊ आपण सगळ्यांनीच पाहिली असेल. त्यामुळेच ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता तिला कधीच जाणवत नाही!..

Web Title: 10 Lessons Man Should Learn From Cats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.