मावळ तालुक्यात महिलांची डेअरी लिटरला देते ७० रुपये दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 01:30 PM2019-12-17T13:30:06+5:302019-12-17T13:31:49+5:30

अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि सभासद असा ‘सबकुछ स्त्री’ मामला

A women's dairy gives 70 rupees for one liter milk In Maval taluka | मावळ तालुक्यात महिलांची डेअरी लिटरला देते ७० रुपये दर

मावळ तालुक्यात महिलांची डेअरी लिटरला देते ७० रुपये दर

Next
ठळक मुद्देदेशातील दुसरीच, महाराष्ट्रातील पहिली डेअरी ; कौतुकाचा विषय

मावळ : सहकार चळवळ आणि दूधधंद्याबद्दलची नकारात्मकता असल्याच्या वातावरणात शंभर टक्के महिला सभासद असलेल्या कंपनीने मावळ तालुक्यात चालू केलेली डेअरी कौतुकाचा विषय बनला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि सभासद असा ‘सबकुछ स्त्री’ मामला असलेली या पद्धतीची ही महाराष्ट्रातली पहिलीच आणि देशातली दुसरी डेअरी आहे. विशेष म्हणजे, दूध दर देण्याच्या बाबतीतही ही डेअरी विक्रमी कामगिरी करीत आहे. फॅटनुसार म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ४६ ते ७० रुपये आणि गाईच्या दुधाला ३२ ते ४० रुपये प्रतिलिटर, असा दर येथे दिला जात आहे. 
चार वर्षांपूर्वी कागदावर ‘मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनी लिमिटेड’ची स्थापना झाली. मुलकनूर (तेलंगणा) येथे याच पद्धतीची पूर्णत: महिला दूध उत्पादकांनी एकत्र येऊन चालवलेली महिलांची देशातली पहिली डेअरी यशस्वीरीत्या कार्यरत आहे. तो आदर्श घेत मावळातल्या महिला एकत्र आल्या. कंपनी स्थापन केल्यानंतर त्यांनी तालुक्यातल्या गावागावांत जाऊन दूध उत्पादक महिलांशी संपर्क साधायला सुरुवात केली. महिलांना प्रशिक्षणासाठी तयार केले. चार वर्षांच्या या प्रयत्नांचे फळ म्हणून यंदाच्या डिसेंबरमध्ये अखेरीस अत्याधुनिक डेअरीचे उद्घाटन करण्यात या कंपनीला यश आले आहे. 
मावळ डेअरी कंपनीच्या १,२३१ महिला सध्या भागीदार आहेत. बारा महिलांचे संचालक मंडळ असून भारती शिंदे यांच्याकडे अध्यक्षपदाची व राधा जगताप यांच्याकडे उपाध्यक्षपदाची धुरा आहे. मावळ तालुक्यातले साडेसहाशे शेतकरी डेअरीला दूध घालत असून दैनंदिन दूध संकलन साडेसहा हजार लिटरवर पोहोचले आहे. उलाढाल दोन कोटींवर गेली आहे. येत्या काही दिवसांत दैनंदिन दूधसंकलन एक लाख लिटरवर नेण्याचा संकल्प सोडला आहे. 
मावळ डेअरीने आॅनलाईन अ‍ॅपद्वारे आणि रिटेल पद्धतीने उत्पादनांची विक्री सुरू केली आहे. मध्यस्थ काढून थेट उत्पादक आणि ग्राहकांना जोडण्याची संकल्पना यामागे आहे. यामुळे दूध उत्पादकांना जास्त दर देणे तसेच ग्राहकांना किफायतशीर किमतीत उत्पादने पुरवणे शक्य होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. दुधाचे पैसे १५ दिवसांत बँक खात्यावर जमा केले जातात. विशेष म्हणजे, सगळी खाती महिलांच्याच नावावर आहेत. 
‘टाटा पॉवर’ने या प्रकल्पाला सुरुवातीपासून मदत केली आहे. ‘टाटा पॉवर’चे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, की मावळातील महिलांच्या या डेअरीच्या उभारणीसाठी तसेच महिलांच्या प्रशिक्षणासाठी सीएसआरमधून टप्प्याटप्प्याने २० कोटी रुपये देण्याचे ठरविले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या डेअरीच्या उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी आम्ही मदत करणार आहोत. घाऊक स्वरूपात विक्री होण्यासाठी पुण्या-मुंंबईतल्या बड्या कंपन्यांशी करार करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. सध्या या प्रकल्पाची क्षमता ३० हजार लिटरची आहे. ती एक लाख लिटरवर नेण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत.
.....
सध्या आमच्याकडे दीड हजार लिटर गाईचे आणि साडेचार हजार लिटर म्हशीचे दूध रोज जमा होते. फॅटनुसार आम्ही राज्यातला सर्वोच्च दर दूध उत्पादकांना देतो. हे सगळे दूध उत्पादक आमच्याच कंपनीचे भागीदार आहेत. आमच्या कंपनीच्या महिलाच घरोघरी गाई-म्हशीपालन करून दुधाचा व्यवसाय करतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून येणारा ७५ टक्के नफा थेट दूध उत्पादकांपर्यंत आम्ही पोहोचवितो.- भारती ंिश्ांदे, अध्यक्ष.
........
कंपनीच्या भागीदार महिलाच कंपनीला दूध देत असल्याने दुधाचा दर्जा उत्कृष्ट आहे. भेसळीच्या कारणावरून दूध नाकारण्याची वेळ आमच्यावर एकदाही आलेली नाही. डेअरी सुरू झाल्यापासून घरटी एक-दोन असणाºया दुधाळ जनावरांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. डेअरीच्या कामासाठी तसेच दूध संकलन, वितरण आदींसाठी कंपनीच्या भागीदार महिलांच्या घरातील तरुणांनाच आम्ही नोकरी देतो. त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तीन हजारांहून अधिक कुटुंबांना डेअरीमुळे रोजगार मिळाला आहे.- राधा जगताप, उपाध्यक्ष

Web Title: A women's dairy gives 70 rupees for one liter milk In Maval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.