Why Harshavardhan Jadhav criticise to Shiv Sena vidhansabha Election 2019 | हर्षवर्धन जाधव कशामुळं घेतायत शिवसेनेशी पंगा ?
हर्षवर्धन जाधव कशामुळं घेतायत शिवसेनेशी पंगा ?

मुंबई - आक्रमक आणि बंडखोर वृत्तीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांना परिचीत झालेले हर्षवर्धन जाधव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लोकसभेला शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर शिवसेना आमदार असताना आव्हान उभं करणाऱ्या हर्षवर्धन यांनी सेनेला पुन्हा एकदा शिंगावर घेतले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या शक्तीस्थानावरच हल्ला चढवला. त्यामुळे औरंगाबादेतील शिवसेना नेते आक्रमक झाले आहे.

आतापर्यंत राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना असा प्रवास करून आलेले हर्षवर्धन जाधव मराठा क्रांती मोर्चात राजीनामा देऊन चर्चेत आले होते. त्याच काळात त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला. त्यानंतर लोकसभा निवडणूकही लढवली. या निवडणुकीत त्यांनी लक्षवेधी मते घेतली. त्यामुळे खैरेंना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. तेव्हापासून शिवसेना आणि हर्षवर्धन जाधव आमने-सामने येण्यास सुरुवात झाली.

लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि सासरे रावसाहेब दानवे यांचं पाठबळ असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. परंतु, या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत दानवे यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना-हर्षवर्धन समोरासमोर आले आहेत.

प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना जागा दाखवा असे आदेश शिवसैनिकांना दिले होते. यावेळी त्यांचा रोख जाधव यांच्यावरच होता. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमधून उमेदवारी देण्याची खेळी केली. हाच धागा पकडत जाधव यांनी सत्तार तुमच्या ...... लागतो का ? असा प्रश्न उपस्थित केला.

अश्लील प्रश्नामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून शिवसेना नेत्यांकडून जाधव यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या प्रकरणावर जाधव दिलगिरी व्यक्त करून पडदा टाकतील, अस वाटत असताना हर्षवर्धन पुन्हा आक्रमक झाले आहे. तसेच शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत औरंगाबादमध्ये तरी शिवसेना-हर्षवर्धन जाधव यांच्यातील लढाई आरपारची होणार असं चित्र आहे.

दरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या पित्याला मारलं, असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. याला उत्तर देताना हर्षवर्धन यांनी सेनेवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीनंतर खैरेंकडून मी वडिलांना मारल्याचा आरोप केला गेला. त्यावेळी मी प्रतिकार केला नाही. परंतु, आता हे मला सतत मुसलमानाची औलाद म्हणत असतील तर मी गप्प बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले.

शिवसेनेला दे धक्का !
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी लक्षवेधी मते घेऊन सर्वांनाच धक्का दिला. किंबहुना वंचित फॅक्टर नसता तर जाधव यांचा विजय झाला असता असंही सांगण्यात येते. मात्र त्यांची ती संधी हुकली. विषेश म्हणजे भाजपचा त्यांना छुपा पाठिंबा असल्याचे आरोपही झाले होते. एकंदरीत खासदारांचा पाडाव झाल्यामुळे मराठवाड्यातील शिसेनेच्या गडाला धक्का बसला आहे. हाच जाधव यांच्यासह भाजपचा अजेंडा होता, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होती.

 

Web Title: Why Harshavardhan Jadhav criticise to Shiv Sena vidhansabha Election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.