मंत्रिमंडळात औरंगाबादेतून सेनेच्या कोणत्या आमदाराची लागणार वर्णी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 02:54 PM2019-10-30T14:54:14+5:302019-10-30T15:50:04+5:30

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना किंगमेकर ठरली आहे.

Who will be elected from Aurangabad in the Cabinet | मंत्रिमंडळात औरंगाबादेतून सेनेच्या कोणत्या आमदाराची लागणार वर्णी ?

मंत्रिमंडळात औरंगाबादेतून सेनेच्या कोणत्या आमदाराची लागणार वर्णी ?

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातून शिवसेनेचे संपूर्ण ६ उमेदवार निवडून आली आहे. त्यामुळे यावेळी सेनेकडून जिल्ह्याला एकतरी मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेतून निवडून आलेल्या ६ आमदारांपैकी कुणाची वर्णी लागणार याबाबतीत जिल्ह्यात चर्चेला वेग आला आहे. तर अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ व प्रदीप जैस्वाल यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना किंगमेकर ठरली आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपकडे शिवसेना वेतेरिक्त दुसरा पर्याय नाही. तसेच भाजपसोबत आली नाही किंवा सेनेने दुसऱ्या पर्यायाचा उपयोग केला तरीही सत्तेत शिवसेनाचं असणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे. त्यामुळे शिवसेनेतून निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याची स्वप्न पडू लागली आहे. गेल्यावेळी अर्जुन खोतकरांच्या रूपाने जालना जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले होते. मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे यावेळी औरंगाबाद जिल्ह्याला शिवसेनेकडून मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबादचा विचार केला तर, जिल्ह्याचे खासदार राहिलेले आणि दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले प्रदीप जैस्वाल, काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, औरंगाबाद पश्चिममधून तिसऱ्यांदा निवडून आलेले संजय शिरसाठ व पैठण मतदारसंघातून पाचव्यांदा विजय मिळवणारे संदीपान भुमरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोण आहेत प्रदीप जैस्वाल

कट्टर शिवसैनिक आणि जिल्ह्यातील सेनेचे जेष्ठ नेते म्हणून प्रदीप जैस्वाल यांची ओळख आहे. १९९६ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनतर २००९ ला पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे राजकीय  अनुभवाचा विचार करता त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.

कोण आहेत अब्दुल सत्तार

सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून २००९ पासून सलग तिसऱ्यांदा आपला गड कायम ठेवत विजय मिळवणारे अब्दुल सत्तारांचे नाव विविध कारणाने राज्याच्या राजकरणात चर्चेत राहिलेले आहे. २०१६ मध्ये आघाडी सरकारच्या काळात सत्तार हे कॅबिनेट मंत्रीपदी राहिले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवत त्यांनी विजय सुद्धा मिळवला. त्यातच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आलेल्या आमदारांपैकी एकमेव मुस्लीम आमदार म्हणून सत्तार ठरले आहेत. त्यामुळे मंत्रीपद मिळण्याचा दावा सत्तार यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

कोण आहेत संजय शिरसाठ

औरंगाबाद जिल्ह्यातील पश्चिम मतदारसंघाचे नेतृत्व संजय शिरसाठ करतात. २००९ पासून त्यांची आपल्या मतदारसंघावर पकड असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी विजय मिळवत हॅटट्रिक साधली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

कोण आहेत संदीपान भुमरे

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पैठण विधानसभा मतदारसंघातून १९९५ साली पहिल्यांदा निवडून आलेले संदीपान भुमरेंनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजय मिळवला आहे. शिवसेनेकडून पाचवेळा निवडून येणारे ते सद्याच्या उमेदवारांमध्ये एकमेव आमदार आहेत. त्यामुळे मंत्रीपदावर त्यांचा नैसर्गिक अधिकार असल्याचा दावा भुमरे समर्थकांकडून करण्यात येत आहे.


 

Web Title: Who will be elected from Aurangabad in the Cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.