आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? उद्धव ठाकरेंचा सामनातून भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 10:56 AM2019-11-19T10:56:35+5:302019-11-19T10:57:36+5:30

भाजपा आणि शिवसेनेतील युती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार शरसंधान सुरू आहे.

Who are you to get us out from the NDA? - Uddhav Thackeray | आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? उद्धव ठाकरेंचा सामनातून भाजपाला सवाल

आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? उद्धव ठाकरेंचा सामनातून भाजपाला सवाल

Next

मुंबई - भाजपा आणि शिवसेनेतील युती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार शरसंधान सुरू आहे. दरम्यान, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधील अग्रलेखामधून शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढण्याच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. आम्हाला एनडीएमधून बाहेर काढणारे तुम्ही कोण? अशी विचारणाही या अग्रलेखामधून भाजपाकडे करण्यात आली आहे.

सामनाच्या आजच्या अग्रलेखात उद्धव ठाकरे म्हणतात की, राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आता शिवसेना नसल्याचे परस्पर जाहीर करण्यात आले. भाजपाच्या धुरिणांनी कशाच्या आधारावर आणि कुणाच्या परवानगीने ही घोषणा केली? प्रवासातील अतिघाई अपघाताला आमंत्रण देई, तशी ही अतिघाई या मंडळींना नडणार आहे. नाही ती नडलीच आहे. शिवनेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी सूत जुळल्याने शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आल्याची घोषणा प्रल्हाद जोशींनी केली. मात्र ही घोषणा करणाऱ्याला शिवसेनेचे मर्म आणि एनडीएचे कर्म धर्म माहित नाहीत .एनडीएच्या बाळंतपणाच्या वेदना शिवसेने अनुभवल्या आहेत. जेव्हा भारतीय जनता पक्षाचा वाऱ्यालाही कुणी उभे राहायला तयार नव्हते. तसेच हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या शब्दांना देशाच्या राजकारणात फार महत्त्व नव्हते तेव्हा आणि त्याआधीही जनसंघाच्या पणतीत तेल घालण्याचे काम शिवसेनेने केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेला बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

एकेकाळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठका होत. साधकबाधक चर्चा करून निर्णय घेतले जात. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस एनडीएचे निमंत्रक होते. तर लालकृष्ण अडवाणी प्रमुख होते. मात्र आज एनडीएचे निमंत्रक आणि प्रमुख कोण आहेत, याचे उत्तर मिळेल काय?आता शिवसेनेला बाहेर काढण्याचा निर्णय़ कोणत्या बैठकीत घेतला गेला. ज्या एनडीएचे अस्तित्वच गेल्या पाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट करण्यात आले. त्या एनडीएमधून शिवसेनेला बाहेर काढण्यात आले आहे. ही अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची सुरुवात आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

यावेळी प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मोदींना खंबीर साथ दिली होती याची आठवण काढत बाळासाहेबांच्या स्मृतिदिनीच शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘’सारेजण विरोधात गेले असताना ‘मोदी’ यांचा बचाव करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या संघटनेस ‘एनडीए’तून बाहेर काढण्याचा मुहूर्त मिळाला तोदेखील शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीस. स्वतःस हरिश्चंद्राचा अवतार मानणाऱ्यांनी हरिश्चंद्रासारखे वर्तन केले नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि  संभाजी राजांचा आहे अशा मंबाजींना तो साथ देणार नाही. मंबाजींच्या राजकारणाची उलटी गिनती सुरू झाली आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, कडय़ाकपाऱयांत फक्त एकच गर्जना घुमेल, ‘शिवसेना झिंदाबाद!’ हिंमत असेल तर या अंगावर. आम्ही तयार आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: Who are you to get us out from the NDA? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.