मदत केव्हा भेटनजी? उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्याला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 03:03 AM2019-11-06T03:03:53+5:302019-11-06T03:04:21+5:30

राज्यात अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

When to visit Help? Farmer tears in front of Uddhav Thackeray | मदत केव्हा भेटनजी? उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्याला अश्रू अनावर

मदत केव्हा भेटनजी? उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्याला अश्रू अनावर

Next

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : पावसाने दिवाळीत दिवाळ काढलं. उभा धान आडवा झाला. कडप्याले अंकुर फुटले. आता साहेब लोक बांधावर येतात. काही तरी लिहून नेतात. पण आम्हा कास्तकऱ्याले मदत केव्हा भेटनजी, असा आर्त सवाल लाखनी तालुक्यातील मांगली येथील महिला शेतकरी शिला मासुरकर यांनी केला.
दिवाळीच्या पर्वात परतीच्या पावसाने धान पीक मातीमोल केले. शेतात उभा धान आडवा पडला. कापणी झालेला कडपा पावसात ओला होवून त्याला अंकुर फुटत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात धानापासून फुटकी कवडीही येण्याची आशा नाही. सर्वांच्या नजरा लागल्या आहे त्या शासनाच्या मदतीकडे. सर्वाधिक नुकसान लाखनी तालुक्यात झाले. संपूर्ण भात पीक उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी ओला झालेला कडपा वाळविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे.

परंतु जोरदार पावसात कडपा सडला असून त्याला दुर्गंधी सुटली आहे. जमिनीवर झोपलेल्या धानाला अंकुर फुटत आहे. बाजारात या काळ्या धानाला कोणतीही किंमत येणार नाही. संपूर्ण हंगामच शेतकºयांच्या हातून गेला. लाखनी तालुक्यातीलच पालांदूर येथील भोजराम भेदे सांगतात, मोठ्या आशेने बारा एकरात धान लावला. परंतु या पावसाने चार एकर शेत उद्ध्वस्त झाले असून उर्वरित पिकातूनही काही हाती येण्याची आशा नाही. आता आम्ही जगावं कस. शासनाने तात्काळ मदत देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शेताच्या बांधावर
आता राजकीय पुढाºयासह विविध विभागाचे अधिकारी येत आहेत. धीर देत आहेत. परंतु नेमकी मदत केव्हा मिळेल हे कुणीही सांगत नसल्याने शेतकºयांमध्ये संताप दिसत आहे.

मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे!

संजय वाघ 

नाशिक : भात लागवडीसाठी व्यापाºयाकडून घेतलेली उचल, पीक जगविण्यासाठी घेतलेली महागडी खते आणि मशागतीसाठी मजुरीवर केलेला खर्च निसर्ग कोपल्यामुळे डोळ्यादेखत मातीमोल झाला. कापणी होऊन पाण्यात भिजत पडलेला भात आता केवळ कचरा बनून शेतात उरल्याने सावकाराचे कर्ज आणि नऊ जणांच्या कुटूंबाच्या गुजराणीचा मेळ कसा घालावा हा एकच सवाल आडवण गावातील शेतकरी वामन नारायण शेलार यांना अस्वस्थ करीत आहे.
मुंबई-आग्रा महामार्गापासून पाच ते साडेपाच किमी अंतरावर आडवण हे इगतपुरी तालुक्यातील गाव. सर्वाधिक भात उत्पादनात तालुक्यात दुसºया क्रमांकाचे आणि प्रयोगशील म्हणून या गावाचा लौकीक आहे. चिखल तुडवित शेलार यांचे शेत गाठले. शेतात कुजत पडलेल्या भाताची पेंडी हातात उचलून तिच्याकडे खिन्नपणे पाहत शेलार हे त्यांच्या कोमेजलेल्या स्वप्नाची कहाणी ऐकवित होते. अडीच एकर शेतात इंद्रायणी भातलागवडीसाठी व्यापाºयाकडून २५ हजारांची उचल घेतली. त्याच्या जीवावर काबाडकष्ट करून भात शेतात डौलदारपणे उभा केला. एक तारखेला भाताची कापणी केली आणि त्याच रात्री झालेल्या धुवॉँधार पावसाने पाणी फिरविले. भाताचे दाणे तर घराच्या उंबºयापर्यंत पोहचलेच नाहीत, उलट कापणी झालेला भात आता केवळ कचरा बनून शेतात भिजत पडला आहे. तो साफ करण्यासाठी त्यावर दहा ते बारा हजार रूपयांचा खर्च करावा लागणार आहे. कर्ज आणि उदरनिर्वाह याचे गणित कसे जुळवायचे असे म्हणत आभाळाकडे हताशपणे पाहणाºया शेलार यांची अवस्था पाहून गझलकार आबेद शेख यांच्या ओळी आठवल्या...
समजू नको ढगा रे
साधेसुदे बियाणे,
मी पेरले पिलांच्या
चोचीमधील दाणे...

राज्यात अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातून सावरण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियम, शर्थींचा घोळ न घाला बांधावर जाऊन तातडीने मदत देणे गरजेचे असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आले आहे.

Web Title: When to visit Help? Farmer tears in front of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.