wants to create a new Maharashtra by combating the problems - Aditya thackrey | समस्यांच्या रावणाचे दहन करून नवा महाराष्ट्र घडवायचाय - आदित्य
समस्यांच्या रावणाचे दहन करून नवा महाराष्ट्र घडवायचाय - आदित्य

मुंबई : महायुतीसमोर कोणत्याच पक्षाचे आव्हान नाही; मात्र सर्वांत मोठे आव्हान हे समस्यांचे आहे. सत्तेत आल्यावर समस्यांच्या १० तोंडी रावणाचे दहन करून मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असे मत आदित्य ठाकरे यांनी मांडले. भांडुप येथे शिवसेना उमेदवार रमेश कोरगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.


आदित्य ठाकरे म्हणाले, वरळीतून मी उभा असलो तरी ही निवडणूक मी स्वत:साठी नाही, तर नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढवत आहे. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाराष्ट्रातले २०० मतदारसंघ फिरलो. जिथून माझा ताफा जायचा तिथे विविध निवेदने लोक मला देत. त्या निवेदनांमध्ये लोक विविध समस्या घेऊन येत होते. अनेक निवेदनांमधून टीकादेखील होत असे. माझ्याकडून लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत म्हणून लोक मला निवेदने देत होते. या दौऱ्यादरम्यान मला काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद कुठेच दिसली नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.


शिवसेना व भाजप यांनी एकत्र वचननामा काढला असता तर तो मोठा ग्रंथ झाला असता म्हणूनच दोघांनी वेगळे वचननामे काढले. मागची पाच वर्षे ही काँग्रेस, राष्ट्रवादीची पापे पुसण्यात गेली. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असून महाराष्ट्र बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त व भ्रष्टाचारमुक्त करायचा आहे, त्यासाठीच महायुतीचे सगळे आमदार निवडून येणे गरजेचे आहे. महानगरपालिका, विधानसभा व लोकसभा यांमध्ये एकाच पक्षाची सत्ता असल्यावर काम करणे सोपे होते, असे ते म्हणाले.


बेस्टच्या भाडेकपातीमुळे १० लाख प्रवासी वाढले. यामुळे पुढील ३ वर्षांत ३ हजार बस वाढवणार असल्याचे ते म्हणाले. मुंबईत प्रतिदिन १० हजार मेट्रिक टन कचरा उचलला जायचा; परंतु सुका कचरा व ओला कचरा यांच्या वर्गीकरणास मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आज प्रतिदिन कचºयाचे प्रमाण साडेसहा हजार मेट्रिक टन एवढे कमी झाले आहे. मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांत एकूण १७,४५६ खाटा आहेत. मुंबईसारखी आरोग्य सेवा देशात कुठेच उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.


महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये व्हर्चुअल क्लासरूम
बनवून सगळीकडे शिक्षणाचा दर्जा समान करायचा आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गट निर्माण करून १० रुपयांत थाळी या योजनेंतर्गत त्या महिलांच्या हाती काम देणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले. बर्गरच्या
दुकानात आॅफर असल्यावर महागडा बर्गर २० रुपयांना विकला जातो; मग आम्ही गरजू लोकांना १० रुपयांत थाळी दिल्यावर विरोधकांच्या पोटात का दुखते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वेळी अयोध्येत राम मंदिर होणारच, अशी घोषणाही आदित्य यांनी केली.


Web Title: wants to create a new Maharashtra by combating the problems - Aditya thackrey
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.