कोरोनाला वेशीवरच रोखणारं कोकणातील गाव; एकीच्या जोरावर जिंकली लढाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 02:04 PM2021-04-04T14:04:43+5:302021-04-04T14:09:03+5:30

आतापर्यंत एकही रुग्ण नाही, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत गौरव

A village in Konkan blocking Corona at the gate; The battle won on the strength of unity! | कोरोनाला वेशीवरच रोखणारं कोकणातील गाव; एकीच्या जोरावर जिंकली लढाई!

कोरोनाला वेशीवरच रोखणारं कोकणातील गाव; एकीच्या जोरावर जिंकली लढाई!

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत एकही रुग्ण नाही‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत गौरव

संदीप बांद्रे

चिपळूण : गावोगावी कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना आगवे (ता. चिपळूण) गावाने मात्र कोरोनाला अजूनही वेशीवरच रोखले आहे. आजपर्यंत या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. म्हणूनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राबविलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील आगवे ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. एकीच्या जोरावर व जनजागृतीच्या आधारे संपूर्ण गाव कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यात यशस्वी ठरले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आणण्यासाठी नेहमीच्या सवयीत बदल करून नवीन जीवनशैली आत्मसात करावी लागली. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची फार मोठी मदत झाली.  या मोहिमेंतर्गत ग्रामपंचायतीने कोरोनाबाबत केलेले गावातील सर्वेक्षण, कोरोनाची चाचणी, गावासाठी विविध सेवाभावी संस्था, कंपन्यांचा सीएसआर फंड आदीतून मिळवलेला निधी वा साहित्य, कोरोनामुळे झालेला मृत्यू, सारीचे रुग्ण आदींवर आधारित प्रथम तीन ग्रामपंचायतींची निवड केली.

विधानसभा मतदार संघ स्तरावर शासनातर्फे हा गौरव करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील आगवे गावाने प्रथम क्रमांक मिळविला. संगमेश्‍वरमधील कोंडअसुर्डे द्वितीय, तर चिपळूणमधील वालोटी ग्रामपंचायत तृतीय क्रमांक पटकावला. या तिन्ही ग्रामपंचायतींना रोख बक्षिसे देऊन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आगवे गावात ग्रामपंचायतची कामं एकजुटीने केली जातात. या गावासाठी एकता ही मोठी ताकद ठरली असून, त्याचा फायदा कोरोनाच्या परिस्थितीत झाला आहे. कोरोनादूत घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक तापमान व ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजत प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य स्थितीची माहिती घेतली. आजही शासनाने दिलेल्या ॲपवर नोंदणी घेत आहेत. एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास अशा प्रकारचा त्रास होत आहे काय, याचीही माहिती घेतली जात आहे. कोणास मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, दमा अशा सहव्याधी आहेत काय, याची माहिती घेतली जात आहे.

तसेच प्रत्येकाला नियमित मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, आजार न लपवता आवश्यकता भासल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करणे, काही सहव्याधी असल्यास नियमित औषधोपचार घेणे, अशी विविध प्रकारची माहिती दिली जाते.

कामाची दखल

माझे कुटुंब माझी जबाबदारीमध्ये फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका सीमा हुमणे, वैशाली गावणंग, शशिकला लिबे, आशा सेविका अर्चना मोहिते, पूजा हुमणे, स्वयंसेवक रसिका लिबे, अभिषेक जाधव यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यामुळे गेल्या वर्षभरात एकही बाधित रूग्ण नाही.

चाकरमानी - ग्रामस्थांची एकमेकांना साथ

लॉकडाऊन कालावधीत व त्यानंतरही संबंधित चाकरमान्यांनी गावच्या एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत केली, तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’मध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच गावचे माजी सरपंच स्नेहा राणीम, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, तसेच विद्यमान सरपंच सोनाली चव्हाण व उपसरपंच अनिकेत भंडारी यांच्यासह ९ सदस्यांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संशयित रुग्णांना उपचार घेण्यासाठी किंवा त्यांना रुग्णालयात नेण्याकरिता ग्रामपंचायतला मोठी मदत झाली.

आगवे गावात आठ वाड्या असून, येथे नेहमी एकजुटीने काम केले जाते. अगदी ग्रामपंचायतची कामेही एकमताने केली जातात किंवा ग्रामपंचायतने राबवलेल्या प्रत्येक उपक्रमाला विश्वासाने साथ दिली जाते. त्यामुळेच कोरोनासारख्या परिस्थितीवर आतापर्यंत मात करता आली. तीन दिवसांपूर्वी मुंबईतून आलेला एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यापलीकडे आजपर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही.
- श्रीधर भागवत, ग्रामसेवक, आगवे
 

Web Title: A village in Konkan blocking Corona at the gate; The battle won on the strength of unity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.