Video: उद्धवसेनेनंतर आता मनसेनेही टाकला 'कॅश बॉम्ब'; PWD खात्यात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 10:20 IST2025-12-09T10:17:23+5:302025-12-09T10:20:21+5:30
सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचाराची पातळी भयावह वाढत चालली आहे. याआधी कामाची फिक्स रक्कम असायची, त्यातून टक्केवारी घेतली जात होती मात्र आता वेगवेगळ्या कामांसाठी पैसे घेतले जातात असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.

Video: उद्धवसेनेनंतर आता मनसेनेही टाकला 'कॅश बॉम्ब'; PWD खात्यात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
मुंबई - उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदाराचा पैशांच्या गड्ड्यांसह व्हिडिओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर आता मनसेनेही कॅश बॉम्ब टाकला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत सार्वजनिक बांधकाम खात्यातील कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यातील हाफकिन शाखेतील हा व्हिडिओ असून शाखा अभियंता कंत्राटदाराकडून पैसे घेताना दिसतो.
या व्हिडिओबाबत संदीप देशपांडे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खात्यातील शाखा अभियंता लेटर ऑफ क्रेडिटच्या नावाखाली पैसे घेतानाचा हा व्हिडिओ आहे. या खात्यासाठी जो शासनाकडून निधी आणला जातो, त्या निधीची टक्केवारी आधीच कंत्राटदारांकडून गोळा केली जाते. LOC ची जी टक्केवारी आहे त्यातील २ लाख ८० हजार कंत्राटदार देताना दिसतो. हे फक्त एका कंत्राटदारांकडून घेतल्याचे समोर आले आहे परंतु अशा अनेक कंत्राटदारांकडून हे पैसे घेतले जातात. ही रक्कम केवळ निधी आणायचे आहेत. त्यात कार्यकारी अभियंत्यांचा हिस्सा वेगळा आहे. माझ्याकडे उपअभियंत्यापासून सगळे व्हिडिओ आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचाराची पातळी भयावह वाढत चालली आहे. याआधी कामाची फिक्स रक्कम असायची, त्यातून टक्केवारी घेतली जात होती. मात्र आता शासनाकडून पैसे आणायचे पैसे, वर्क ऑर्डरचे पैसे वेगळे त्यानंतर विभागाकडून काम पूर्ण झाल्यावर जे बिल निघते त्याचेही वेगळे पैसे मागितले जातात असं कंत्राटदाराने सांगितले. हा उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच शासनाकडून जर १ कोटी निधी आला तर त्यातून सर्वांची बिले भागली जात नाहीत त्यात कंत्राटदारांची बोली लागते. माझे बिल पेमेंट करा तुम्हाला एवढी रक्कम देईन अशाप्रकारे कंत्राटदारांची बिले भागवण्यासाठी बोली लावली जाते. अनेक कंत्राटदारांनी कामे न करता फक्त बिलाचे पैसे उचलतात. ज्या कंत्राटदारांनी काही काम केले नाही अशांची बोली जास्त लागते कारण त्यांनी काम केलेले नसते. १० कंत्राटदारांची मिळून ५ कोटी बिले भागवली गेली. या कंत्राटदारांची यादी आहे. हा जो शाखा अभियंता पैसे गोळा करतोय, त्यात कुणाकुणाचे वाटे आहेत. निधी वाटप करण्यात कुणाचा सहभाग आहे. कोण कोण अधिकारी, मंत्री आणि आमदार हा निधी मंजूर करण्यासाठी सहभागी आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.
दरम्यान, हा एक व्हिडिओ आज पोस्ट केलाय, उद्या दुसरा करू, परवा तिसरा करू..जोपर्यंत शासन या प्रकाराची दखल घेत नाही आणि आरोपांना उत्तर देत नाही तोवर आम्ही ही प्रकरणे बाहेर काढत राहू आणि सरकारला जाब विचारू असा इशाराही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.