The unquestionable dominance of the alliance in Mumbai | मुंबईवर युतीचेच निर्विवाद वर्चस्व
मुंबईवर युतीचेच निर्विवाद वर्चस्व

- गौरीशंकर घाळे
 मुंबई : एकतर्फी कौल देण्याचा मागील दोन निवडणुकांचा शिरस्ता मुंबईकरांनी यंदाही राखला. मुंबईतील सहाही जागांवर भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजयाची नोंद केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती झाली. तरीही चार वर्षांतील कटुता बाजूला सारत एकदिलाने -युतीने मतदारांना सामोरे जाण्याचा आणि ही युती प्रचारातही प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दाखविलेला समन्वय युतीच्या विजयाचा शिल्पकार ठरल्याचे निकालांतून दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील समन्वयामुळे युतीचा मतदार ईव्हीएमपर्यंत आणण्यात यश आल्याचे निकालाने दाखवून दिले आहे.
मागील निवडणुकांप्रमाणे लाट नाही, युती झाली असली तरी बेबनाव आहेच, जोडीला मनसे फॅक्टरमुळे झालेली वातावरण निर्मिती यामुळे मुंबईत युतीच्या उमेदवारांची दमछाक होणार, असे आडाखे बांधले जात होते. या सर्व शक्यतांना मोडून काढत मुंबईत सहाही जागांवर युतीचे उमेदवार विजयी झाले. भाजपा आणि शिवसेना नेते, कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या उमेदवारांसाठी मेहनत घेतल्याचे हाती आलेल्या निकालातून स्पष्ट झाले आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अरविंद सावंत आणि काँग्रेस नेते मिलींद देवरा यांच्यातील लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. मुकेश अंबानीसह काही उद्योजकांनी देवरा यांना जाहीर पाठिंबा दिला होता. भाजपाची गुजराती, मारवाडी मते शिवसेनेच्या सावंतांकडे वळणार नाहीत, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा या भाजपा आमदारांच्या जोडगोळीने युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राहील याची खबरदारी घेतली.
दक्षिण मुंबईत शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासाठी भाजपाच्या प्रदेश पातळीवरून प्रयत्न झाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे शिवसेना उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे भाजपाच्या वाटेवरील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी जाहीर केले होते.
ईशान्य मुंबईतील शिवसैनिक भाजपाला साथ देणार नाहीत, मनसेच्या आक्रमक प्रचारामुळे मराठी मते राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांच्याकडे वळतील, अशी शंका व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र शिवसैनिकांनी भाजपाला साथ दिल्याने भांडुप, विक्रोळी आदी मराठी पट्टयातही कोटक यांना भरघोस मतदान झाल्याचे दिसून आले. तिकडे उत्तर पश्चिमेत शिवसेनेचे गजानन किर्तीकर आणि स्थानिक आमदारांमधील कुरबुरी निकालावर परिणाम करणार नाहीत, याची काळजी दोन्ही पक्षांनी घेतली. निकालानंतर स्वत: किर्तीकरांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या मेहनतीची दखल घेत आभार मानले.
प्रचारादरम्यान मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या नियमित समन्वय होता. स्वत: मुख्यमंत्री उमेदवारांच्या संपर्कात होते. उमेदवार शिवसेनेचा, भाजपाचा हा प्रश्नच नाही, मोदींना पंतप्रधान करायचे याच उद्देशाने मैदानात उतरा, असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह होता. युतीचा मतदार मतदान केंद्रांपर्यंत पोहचेल यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत होती. मुंबईतील निकाल म्हणजे या समन्वयाला मिळालेली पोच असल्याचे मानले जात आहे. राज ठाकरे यांच्या मोदीविरोधी आक्रमक प्रचाराची मतदानापुर्वी खुप चर्चा झाली. मात्र, निकालावर राज यांच्या प्रचाराचा प्रभाव जाणविला नाही. दादर, प्रभादेवीसारख्या भागातही मनसेच्या मोहिमेचा प्रभाव जाणविला नाही.
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय प्रयोगालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मुंबईत वंचितकडून म्हणावा तसा प्रचारही झाला नव्हता. तरीही ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील वंचितच्या उमेदवारांनी सत्तर हजारापर्यंत मते खेचली. सर्वच जागी वंचितला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने एकीकडे युतीची शिस्तबद्ध रचना तर दुसरीकडे विस्कळीत काँग्रेस अशीच लढत मुंबईत होती. निवडणुक जाहीर झाल्यावर अध्यक्ष बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली होती. गटबाजीमुळे निवडणुक लढवावी का, असा प्रश्न ज्यांना पडला होता त्या मिलींद देवरांना अध्यक्ष करण्यात आले. ऐनवेळी झालेल्या या बदलामुळे संघटनात्मक बांधणी आणखीच विस्कळीत झाली. उत्तर मुंबईतील उर्मिला मातोंडकरांचा अपवाद वगळता सर्वच जागांवर माजी खासदारांनाच आघाडीने संधी दिली होती.
मात्र, मधल्या पाच वर्षांत ही सर्वच मंडळी निष्क्रिीय असल्याचे चित्र होते. मुंबईकरांच्या प्रश्नांवर यातील कोणी सातत्याने लढत असल्याचे दिसले नाही.
अध्यक्षपदाची धुरा असल्याने संजय निरूपम लढत होते. मात्र पक्षातील अन्य सहकाऱ्यांना सोबत घेण्यात ते अपयशी ठरले. अध्यक्ष पद गेल्यावर उत्तर पश्चिमेत निरूपमांना त्याचा फटकाही बसला.
उत्तर मध्य मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन विरूद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त यांची लढत लक्षवेधी होती. मात्र, गटबाजीमुळे काही महिन्यांपुर्वीच राजकारणातुन निवृत्त होत असल्याचे दत्त यांनी जाहीर केले होते. पक्षाने कसेबसे त्यांना लढण्यासाठी तयार केले.

>गोपाळ शेट्टी यांनी मोडला स्वत:चाच रेकॉर्ड
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी (संध्याकाळी ७ .२० वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार) ६ लाख ८८ हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यावर ४ लाख ५३ हजार १९४ मतांनी आघाडी मिळवली आहे. शेट्टी यांनी २0१४ लोकसभा निवडणुकीवेळचा ६ लाख ६४ हजार ४ मतांचा स्वत: चा रेकॉर्ड तोडला आहे. २०१४ मध्ये गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा (२ लाख १७ हजार ४२२ मते) ४ लाख ४६ हजार ५८२ मतांनी पराभव केला होता.
दरम्यान, विजयाची कल्पना येताच भाजप उत्तर मुंबईच्या कार्यकर्त्यांनी कांदिवली पश्चिम येथील भाजप जिल्हा कार्यालयाबाहेर ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गात आनंद व्यक्त केला. या वेळी कार्यकर्त्यांनी पक्षाचे ध्वज उंचावत, फटाके फोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेस मिठाई भरवून जल्लोष केला. निकालाच्या एक दिवस आधीच गोपाळ शेट्टी यांच्या पोयसर येथील जनसंपर्क कार्यालयास विद्युत रोषणाई करण्यात आली होती. निकालाच्या दिवशी शेट्टी यांचे कार्यालय फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. सकाळपासूनच कार्यालय परिसरात पोलीस तैनात होते. कार्यालयात कार्यकर्त्यांची वर्दळ होती.

>ईव्हीएममध्ये घोळ झाल्याची ऊर्मिला मातोंडकर यांची तक्रार
मुंबई : उत्तर मुंबई येथून लोकसभेची निवडणूक लढवत असलेल्या कॉग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी ईव्हीएममधील आकडे आणि स्वाक्षरी यांमध्ये घोळ असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल केली. उत्तर मुंबई येथून भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी हे विजयी झाले आहेत़उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईमधील मागाठाणे येथील ईव्हीएम १७ सी फॉर्ममधील स्वाक्षरी आणि मशीनमधील क्रमांकांमध्ये फरक असल्याची तक्रार दाखल केली असून याबाबत ट्वीटरवरून ट्वीटही केले आहे. पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत असलेली उर्मिला यांनी यंदाच्या २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूका या निर्णायक असल्याचे स्पष्ट केले होते. या मतदार संघामध्ये मराठी टक्का जास्त असल्याने आणि उर्मिला या मराठी असल्याने त्याचा फायदा त्यांना होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र ही फोल ठरली. या मतदार संघातून २००४ साली अभिनेते गोविंदा यांनी कॉग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती.
>...अन् मतमोजणी केंद्राऐवजी ‘ते’ पोहोचले लग्नाला
दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना आपल्या विजयाची जणू खात्रीच होती. त्यामुळेच गुरुवारी इतका धावपळीचा आणि निर्णायक दिवस असूनही सावंत यांनी त्याला महत्त्व न देता सकाळी माटुंगा येथील खालसा सभागृहात आपल्या मित्रपरिवारातील एका सदस्याच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.

>देशाची सुरक्षितता हीच सरकारची प्राथमिकता
दक्षिण मुंबई : अरविंद सावंत मतदारांनी जो विश्वास दाखविला आहे; त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. देशाची सुरक्षा ही आमच्या सरकारची प्राथमिकता आहे. महायुतीच्या मेहनतीचे फळ आहे. त्यामुळे मी विजयी झालो आहे. राजकारणात व्यक्तिगत आरोप करणे योग्य नाही. जाती आणि धर्माचे राजकारण होता कामा नये. राजकारण सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
>हा विजय बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित
दक्षिण-मध्य : राहुल शेवाळेदक्षिण मध्य मुंबईवर भगवा फडकावा, ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती.  त्यामुळे हा विजय त्यांना समर्पित करतो. हा विजय मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा आहे. पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे जनतेने पुन्हा एकदा संधी दिली आहे. या विजयाने माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. दक्षिण- मध्य मुंबईला स्मार्ट मतदारसंघ बनविण्याचा माझा मानस आहे.
> माझ्या विजयाचे श्रेय ऊर्मिला यांना उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी
मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की मी मोठ्या मताधिक्याने विजयी होईन. मी ऊर्मिला मातोंडकर यांचे आभार मानतो; कारण मी २७ वर्षे काम करतो आहे. पण प्रसारमाध्यमे कधीच माझ्या एवढ्या जवळ आली.

भिवंडी जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांवर शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने अपेक्षेप्रमाणे आपले वर्चस्व कायम राखले आहे. भिवंडीतून भाजपाचे कपिल पाटील यांनी काँग्रेसच्या सुरेश टावरे यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. राज ठाकरे यांचा करिष्मा जिल्ह्यात कुठेच चालला नसल्याचे निवडणूक निकालावरून दिसत आहे. यावेळी जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत राहिली, ती भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक़ कारण, येथील खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी मिळते की नाही, येथूनच येथील निवडणुकीच्या चर्चेला सुरुवात झाली होती.
>अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे विजयी झाल्याने राष्ट्रवादी भवन, काँग्रेस भवन आणि शेतकरी भवन येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. याआधी एकमेकांचे कट्टर पारंपरिक विरोधक म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप लढले आहेत. मात्र, तटकरे यांच्या आजच्या विजयाने इतिहासात पहिल्यांदाच तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जिल्ह्यामध्ये एक प्रकारे दिवाळीच साजरी केल्याचे चित्र होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर तटकरे यांच्या प्रचारासाठी प्रमुख नेत्यांनी रान पेटवले होते. प्रचार करताना ज्या ठिकाणी शेकापची सभा होती. त्या ठिकाणी काँग्रेसने जाणे टाळले होते.

>पालघर : या लोकसभा मतदार संघातील भाजपचे विजयी उमेदवार राजेंद्र गावित यांचा विजय हा सेना-भाजपच्या झालेल्या युतीमुळे व श्रमजिवीने दिलेल्या पाठिंब्यामुळे, तसेच बविआच्या ऐन वेळी हरपलेल्या शिट्टीमुळे घडून आला. त्याचप्रमाणे, बविआच्या असलेल्या अंगभूत मर्यादा आणि ८६ हजार नवमतदारांचा हातभारही लागला. गेल्या पोटनिवडणुकीत सेना-भाजपची युती नव्हती, त्यावेळी सेना आणि भाजपला जेवढी मते पडली होती, त्यांच्या बेरजेच्या जवळपास पोहोचतील एवढी मते या वेळी महायुतीचे विजयी उमेदवार गावितांना मिळालेली आहेत. त्यामध्ये जो फरक दिसतो आहे, यावेळी नव्याने नोंदविले गेलेले ८६ हजार मतदार यांच्यामुळे दिसत आहे.


Web Title: The unquestionable dominance of the alliance in Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.