Unlikely to postpone of natya sammelan due to lack of planning? | नियोजनाअभावी नाट्य संंमेलन पुढे ढकलण्याची नामुष्की ?
नियोजनाअभावी नाट्य संंमेलन पुढे ढकलण्याची नामुष्की ?

ठळक मुद्देराज्य शासनाकडून नाट्य संमेलनाला मिळणारे ५० लाख रुपयांचे अनुदान काहीसे अडकले पुणे आणि कोथरूड नाट्य शाखांनी ३१ ऑगस्टपर्यंत मध्यवर्तीकडे प्रस्ताव सादर

पुणे : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पुण्यात आयोजित करण्याची इच्छा नाट्य परिषदेच्या पुणे, कोथरूड शाखांसह जिल्ह्यातील अन्य तीन शाखांनी प्रदर्शित केलेली असतानाही, संमेलन सांगली-मुंबई व्हाया तंजावरला नेण्याच्या मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या अध्यक्षांच्या मनसुब्यामुळे संमेलनाचे संपूर्ण नियोजनच फसल्याचे सांगण्यात येत आहे. ना तारखा... ना स्थळ.. ना संमेलनाध्यक्ष जाहीर करण्यात आले. त्यामुळे राज्य शासनाकडून नाट्य संमेलनाला मिळणारे ५० लाख रुपयांचे अनुदान काहीसे अडकले आहे. आता राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यात सत्ता कुणाच्या हातात जाणार, याची माहिती नाही. मग, संमेलन कुणाच्या जिवावर करणार? अशा पेचात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अडकली आहे. त्यामुळे हे संमेलन पुढे ढकलण्याचीच एकप्रकारे नामुष्की ओढवली आहे.
शंभराव्या नाट्य संंमेलनाच्या आयोजनासाठी पुणे आणि कोथरूड नाट्य शाखांनी ३१ ऑगस्टपर्यंत मध्यवर्तीकडे प्रस्ताव सादर केले होते. या दोन शाखांसह जिल्ह्यातील दौंड, शिरूर आणि बारामती या तीन शाखांनीही संमेलन घेण्यासाठी सकारात्मकता दर्शविली होती. नियमानुसार पुणे आणि कोथरूड शाखांच्या प्रस्तावांच्या विचार होणे अपेक्षित होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे संमेलन शंभरावे असल्याने ते वेगळ्या पद्धतीने करण्याची मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या अध्यक्षांची इच्छा होती; मात्र तेही नियोजन फसले. 
......
ही तत्परता नाट्य परिषदेला जमली नाही
१ राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उस्मानाबाद शाखेने १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे स्थळ आणि तारखा निश्चित करून, सरकारचे संंमेलनासाठीचे ५० लाख रुपयांचे अनुदान पदरात पाडून घेतले; मात्र ही तत्परता मध्यवर्ती नाट्य परिषदेला दाखविता आली नाही. स्थळ आणि तारखाच जाहीर झाल्या नसल्याने सरकारकडे अनुदानाचा प्रस्तावच पाठविता आला नाही. 
२ या सर्व घडामोडी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्येच होणे अपेक्षित होते; मात्र तसे घडले नाही. आता राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्ता स्थापनेचं घोंगडं भिजत पडलं आहे. त्यामुळे नाट्य संंमेलनाच्या आयोजनासाठी पैसा आणायचा कुठून? मग संमेलन कुणाच्या जिवावर करणार, अशी गोची झाली आहे. त्यामुळे तूर्तास तरी हे संमेलन पुढे ढकलण्याशिवाय गत्यंतरच नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

नाट्य संमेलनाच्या तारखा अद्याप निश्चितच नाहीत. संमेलनाध्यक्ष अजून ठरलेला नाही; मग राष्ट्रपती राजवटीमुळे नाट्य संमेलन पुढे ढकलले, असे कसे म्हटले जाऊ शकते? - प्रसाद कांबळी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 
 

Web Title: Unlikely to postpone of natya sammelan due to lack of planning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.