साहित्य संमेलनात राष्ट्रपती, पंतप्रधानांची दोनदा हजेरी; १९५४ साली पंतप्रधान पं. नेहरूंकडून उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 08:16 AM2022-04-21T08:16:44+5:302022-04-21T08:20:14+5:30

१८७८ मध्ये पहिले साहित्य संमेलन पुण्यात आयोजित केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते.

Twice attendance of President, Prime Minister at Sahitya Sammelan; In 1954, Inauguration by PM Pandit Nehru | साहित्य संमेलनात राष्ट्रपती, पंतप्रधानांची दोनदा हजेरी; १९५४ साली पंतप्रधान पं. नेहरूंकडून उद्घाटन

साहित्य संमेलनात राष्ट्रपती, पंतप्रधानांची दोनदा हजेरी; १९५४ साली पंतप्रधान पं. नेहरूंकडून उद्घाटन

googlenewsNext

राम शिनगारे -

औरंगाबाद : उदगीर येथे होत असलेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यापूर्वी सांगलीच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी हजेरी लावली होती. या दोन अपवादांशिवाय आजी-माजी पंतप्रधान एकवेळा साहित्य संमेलनात सहभागी झाले आहेत. 

१८७८ मध्ये पहिले साहित्य संमेलन पुण्यात आयोजित केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते. तेव्हापासून सुरू झालेली साहित्य संमेलनाची परंपरा कायम आहे. संमेलनात साहित्यिकांसह राज्यातील मोठमोठ्या राजकारण्यांनीही वेळोवेळी हजेरी लावलेली आहे. मात्र, देशपातळीवरील सर्वोच्च व्यक्तींनी क्वचित प्रसंगीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावली आहे. 

दिल्ली येथे १९५४ मद्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मणशास्त्री जोशी होते, तर स्वागताध्यक्ष केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ होते. यानंतर २००३ मध्ये कऱ्हाड येथे झालेल्या ७६व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष भेंडे होते; तर उद्घाटक म्हणून माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची उपस्थिती होती. हे दोन आजी-माजी पंतप्रधान साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून लाभले आहेत. 

२००८ मध्ये सांगली येथे ८१वे साहित्य संमेलन मधुकर हातकणंगलेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. 

२००८ नंतर आता ९५व्या साहित्य संमेलनात उदगीर येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहभागी होणार आहेत. याच साहित्य संमेलनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेसुद्धा सहभागी होणार आहेत.

कौतिकराव आणि दिग्गज
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या कार्यकाळातच २००८ मध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील संमेलनाला उपस्थित होत्या. आताही ठाले पाटील यांच्याच दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या साहित्य संमेलनात विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. संमेलनातील दिग्गजांची मांदियाळी पाहता कौतिकराव आणि दिग्गज यांचे समीकरण आता उदगीरमध्येही पाहायला मिळणार आहे.

Web Title: Twice attendance of President, Prime Minister at Sahitya Sammelan; In 1954, Inauguration by PM Pandit Nehru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.