a tumor about 15 inch in her stomach with a habit of eating hair and plastic | अबब! प्लास्टिक...केस...धातुचे पदार्थ खाण्याच्या सवयीने तिच्या पोटात १५ इंचचा टयूमर
अबब! प्लास्टिक...केस...धातुचे पदार्थ खाण्याच्या सवयीने तिच्या पोटात १५ इंचचा टयूमर

ठळक मुद्दे डॉ. महेंद्र कवेडियांनी दिले जीवनदान

पुणे : तिशा डिसुझा... वय वर्ष १६... सोलापुरात लहानाची मोठी झालेल्या तिशाला अचानक पोटात दुखायला लागले, ताप यायला लागला, उलटया व्हायला लागल्या... आपल्या लाडक्या मुलीच्या या दुखण्याने तिचे आई-बाबा हवालदिल झाले. सोलापुरातल्या अनेक डॉक्टरांना दाखवून झाले. परंतु तेवढयापुरता आराम पडायचा नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या व्हायचे. तिशा पुन्हा तापाने फणफणायची, पोटातील वेदनांमुळे गडबडा लोळायची, उलट्या करायची. तिशाच्या या अगम्य आजाराने हादरलेले तिचे वडील डेनिस डिसुझांनी अखेरीस तिला पुण्याला नेण्याचे ठरवले.  फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र कवेडिया तिच्यासाठी देवदूतच ठरले!
    जहांगीर रूग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. कवेडियांनी तिशाची प्राथमिक तपासणी केली. त्यात त्यांना तिच्या पोटात काहीतरी जड वस्तू असल्याचे जाणवले. त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली. परंतु तिशाचा सोनोग्राफी अहवाल सामान्य आला. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे मग डॉ. कवेडियांनी तिशाचे सीटी स्कॅन करायला सांगितले.  तिशाच्या पोटात एक मोठा गोळा तयार झाला असून त्याचा आकार चेंडूसारखा असल्याचे सीटी स्कॅनमध्ये निष्पन्न झाले. या गोळ्याच्या हालचालीमुळे तिशाला पोटात तीव्र वेदना होण्याबरोबरच इतरही त्रास होत होते. लहानपणी तिशाला प्लास्टिक, भिंतींना लावलेल्या रंगाचे निघालेले पोपडे, धातूचे पदार्थ, केस इत्यादी खाण्याची सवय होती. वयाच्या पाचव्या वषार्पासून तिला ही सवय लागली ही गोष्ट समोर आली. लेप्रोस्कोपिक सर्जन असलेल्या डॉ. गोरी सिंह यांनी तिशावर शस्त्रक्रिया केली. तिशाच्या पोटात केसांचा आणि इतरही साहित्याचा गुंता तयार होऊन त्याने मोठा आकार धारण केला होता. तिच्या पोटात आकाराला आलेला हा ट्युमर १५ इंच लांब आणि ६०० ग्रॅम वजनाचा होता. त्याच्या हालचालीमुळेच तिशाला उलट्या होणे, ताप येणे, वजन घटणे इत्यादी त्रास होत होता. तिच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तिशा आता रुग्णालयातून घरी जाण्यास सज्ज झाली आहे. सोलापूरच्या बिशप शाळेत वॉचमनची नोकरी करणा-या डेनिस डिसुझांच्या तिशाला डॉक्टरांच्या टीमने मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. 
---------------------------------------------------
 

Web Title: a tumor about 15 inch in her stomach with a habit of eating hair and plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.