Three year imprisonment for minor girl molestation case | अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस तीन वर्षे कारावास
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस तीन वर्षे कारावास

खामगाव : एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या अपमानास्पद अत्याचाराची तक्रार ३ फेब्रुवारी २०१५ रोजी शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली होती. त्यावरुन आरोपी दुर्योधन माणिक भोजने, माणिक सोनाजी भोजने, राणा माणिक भोजने व रमाबाई माणिक भोजने सर्व रा.तिंत्रव या चौघांविरुध्द भादंवि कलम ३५४, ५०४ व पास्को कायदा कलम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाअंती पोलिसांनी येथील जिल्हा सत्र न्यायालय क्र.१ मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे ५ साक्षी पुरावे तपासण्यात आले. यामध्ये आरोपी दुर्योधन माणिक भोजने याचेवर गुन्हा सिध्द झाल्याने त्याला वि.जिल्हा व सत्र न्यायालय क्र.१ चे न्यायाधीश आर.डी. देशपांडे यांनी भादंवि कलम ३५४ मध्ये १ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने कारावास तसेच पास्को कायदा कलम ८ नुसार ३ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने कारावास अशी शिक्षा आज २२ आॅगस्ट रोजी सुनावली.

या दोन्ही शिक्ष आरोपीला एकाचवेळी भोगावयाच्या आहेत तर इतर ३ आरोपींविरुध्द गुन्हा सिध्द होवू न शकल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सहाय्यक सरकारी वकिल अ‍ॅड.उदय आपटे यांनी काम पाहिले. सन २०१९ मध्ये सरकारी वकील म्हणून काम करतांना अ‍ॅड.आपटे यांच्या युक्तीवादाने आतापर्यंत ७ फौजदारी प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली आहे.


Web Title: Three year imprisonment for minor girl molestation case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.