"अध्यादेशावेळी मदतीसाठी धन्यवाद, आता जरा दिल्लीत जनजागरण करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 09:07 AM2021-10-20T09:07:44+5:302021-10-20T09:08:07+5:30

ओबीसी आरक्षणासाठी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे फडणवीसांना आवाहन

Thanks for the help during the ordinance, now raise awareness in Delhi chhagan bhujbal to devendra fadnavis | "अध्यादेशावेळी मदतीसाठी धन्यवाद, आता जरा दिल्लीत जनजागरण करा"

"अध्यादेशावेळी मदतीसाठी धन्यवाद, आता जरा दिल्लीत जनजागरण करा"

googlenewsNext

नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची मदत केली. त्यासाठी त्यांचे धन्यवाद. आता ओबीसी प्रश्नावर राज्यात जनजागरण करण्याऐवजी देेवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन जनजागरण करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे इम्पिरिकल डाटा उपलब्ध करून देण्याची मागणी करावी. केंद्राकडे असलेला तयार डाटा उपलब्ध झाल्यास समस्या दूर होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.  

नागपूर दौऱ्यावर असलेले भुजबळ यांनी मंगळवारी ‘लोकमत’ भवनला सदिच्छा भेट देत ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा आणि निदेशक (परिचालन) अशोक जैन यावेळी उपस्थित होते. ओबीसी आरक्षणासोबतच मनपा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.   

ओबीसी आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजपला ओबीसींची इतकीच चिंता होती, तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे व एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय का केला? अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येताहेत. त्यामुळेच २०२१ च्या जनगणनेचे काम थांबले 
आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना ओबीसींचा डाटा मिळविण्यासाठी घरोघरी पाठवणे योग्य होणार नाही.  परंतु तेव्हापर्यंत केंद्राकडे उपलब्ध असलेल्या डाटाचा उपयोग करता येऊ शकतो. भाजप नेत्यांनी या दिशेने पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  

‘आयोगाने काम सांगितले तर सरकार पैसे देईल’
सर्वोच्च न्यायालयाद्वारे ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने गठित केलेल्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची दिलेल्या राजीनाम्याबद्दल ते म्हणाले, राजीनामा देणारे लोक फारसे महत्त्वपूर्ण नाहीत. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करीत आयोगाची स्थापना केली. आता आयोगाला ४५० कोटी रुपये दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यात तथ्य नाही, असे त्यांनी सांगितले. 

मोदींची नक्कल करून पुन्हा तुरुंगात जायचे नाही!
भुजबळ हे मिमिक्री सुद्धा चांगले करतात. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाची रणनीती काय राहील, याचे उत्तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टाईलमध्ये द्यावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. यावर भुजबळ केवळ इतकेच म्हणाले की, ‘मोदींची नक्कल करून त्यांना पुन्हा तुरुंगात जायचे नाही’.

Web Title: Thanks for the help during the ordinance, now raise awareness in Delhi chhagan bhujbal to devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.