अतिरेकी मुंबईत करणार होते ‘गॅस अटॅक’? जोगेश्वरीतून संशयित दहशतवाद्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 06:51 AM2021-09-19T06:51:42+5:302021-09-19T06:56:34+5:30

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांशी संबंधित झाकीर हुसेन शेख या तरुणाला मुंबई एटीएसच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली आहे. मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या मदतीने जोगेश्वरी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

Terrorists were going to carry out 'gas attack' in Mumbai? Suspected terrorist arrested from Jogeshwari | अतिरेकी मुंबईत करणार होते ‘गॅस अटॅक’? जोगेश्वरीतून संशयित दहशतवाद्याला अटक 

अतिरेकी मुंबईत करणार होते ‘गॅस अटॅक’? जोगेश्वरीतून संशयित दहशतवाद्याला अटक 

Next

मुंबई: दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या संशयित अतिरेक्यांचा मुंबईत गर्दीच्या ठिकाणी विषारी वायूद्वारे (गॅस अटॅक) घातपात करण्याचा कट होता. त्यासाठी महत्त्वाची रेल्वे स्टेशन तसेच गजबजलेल्या ठिकाणांची रेकी करण्यात येणार होती, असे सांगण्यात आले. (Terrorists were going to carry out 'gas attack' in Mumbai? Suspected terrorist arrested from Jogeshwari)

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांशी संबंधित झाकीर हुसेन शेख या तरुणाला मुंबई एटीएसच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली आहे. मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या मदतीने जोगेश्वरी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. झाकीर हा धारावीतील जान मोहम्मदचा साथीदार असून तो घातपात घडविण्यासाठी शस्त्रास्त्रे पुरविणार होता, असे सांगण्यात येते.

जान मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई एटीएस झाकीर शेखच्या मागावर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी तो पसार होण्याच्या प्रयत्नात त्याने पत्नीला वांद्रे येथील नातेवाइकाकडे पाठविले होते. त्याची माहिती मिळताच एटीएसने क्राइम ब्रँचच्या मदतीने सापळा रचला. त्याच्या पत्नीच्या मदतीने  झाकिरला फोन करून जोगेश्वरी परिसरात बोलावून अटक केली. 

त्यानंतर नागपाडा एटीएस कार्यालयात चौकशी केल्यानंतर त्याला अज्ञातस्थळी हलवण्यात आल्याचे समजते. जान मोहम्मद आणि त्याच्या संबंधाबाबत माहिती घेण्यात येत आहे.

महाराष्ट्र एटीएसने झाकीर शेखला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात न देता त्याच्यावर स्वतःहून स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांची कोठडी मिळाल्याने काही दिवस तो मुंबई एटीएसच्या ताब्यात राहील. या कारवाईमुळे दिल्ली पोलीसबरोबर त्यांचा वाद झाल्याचे सांगण्यात येते. वास्तविक हा कट दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणला होता, तसेच झाकीरला पकडण्यासाठी मंगळवारी त्यांचे पथक मुंबईत आले होते. मात्र, त्यांच्या तो हाती लागला नाही. एटीएसची कोठडी संपल्यानंतर त्यांना झाकीरचा ताबा मिळू शकतो. तोपर्यंत एटीएसच्या माहितीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कारवाई
-  चार दिवसांपूर्वी जान मोहम्मद शेखसह इतर पाच दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. एकाच वेळेस महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ही कारवाई करण्यात आली होती. जान मोहम्मद हा गेल्या २० वर्षांपासून दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित होता. सध्या तो अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. 
-  मुंबईसह उत्तर प्रदेश व दिल्लीत हल्ला करण्यासाठी त्यांना अहमदकडून शस्त्रास्त्रे पुरविली जाणार होती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. 
-  दिल्ली पोलिसांच्या तपासात ही बाब उघडकीस आल्याने त्याची महाराष्ट्र एटीएसने गंभीर दखल घेत त्याचा स्वतंत्र तपास सुरू केला होता. त्यामध्येच आता आणखी एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे.
 

Web Title: Terrorists were going to carry out 'gas attack' in Mumbai? Suspected terrorist arrested from Jogeshwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.