"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:14 IST2025-11-12T11:10:43+5:302025-11-12T11:14:26+5:30
तुळजापुरातील एका पक्षप्रवेशावरुन सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे.

"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
Supriya Sule Letter to CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रात गाजलेल्या 'तुळजापूर ड्रग्ज प्रकरणा'तील जामिनावर बाहेर असलेल्या आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याच्या भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तुळजापूरचे नगराध्यक्षपद भूषवलेल्या परमेश्वर याच्या पक्षप्रवेशामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नेमकी कोणती भूमिका घेतली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पक्षप्रवेशावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या गंभीर विषयाची तातडीने दखल घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
भाजपने 'मिशन लोटस' अंतर्गत सोलापूरचे दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांचा मोठा पक्षप्रवेश करून आपली ताकद वाढवत असताना, दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला पक्षात स्थान दिल्याबद्दल भाजपवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संतोष परमेश्वरच्या पक्षप्रवेशामुळे आगामी तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात 'ड्रग्ज'चा मुद्दा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये भाजपची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच, या निर्णयावर विरोधी पक्ष आक्रमक होऊ शकतो.
ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय- सुप्रिया सुळे
"तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीने कारवाई करणेबाबत..तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते, याबाबत आपणही सहमत असाल, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
यापूर्वीही पत्राद्वारे कळवले होते
"आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते. तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.