तोट्यातील एसटी फायद्यात येणार? मालवाहतुकीनंतर आता कुरिअर सेवा देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 09:15 AM2021-06-14T09:15:48+5:302021-06-14T09:16:14+5:30

वर्षाला ५०० कोटींचे उत्पन्न मिळवणार; आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या राज्य परिवहन महामंडळाने अडचणींनाच संधी मानून काम करण्याचे ठरवले आहे. 

ST's now start courier service after freight | तोट्यातील एसटी फायद्यात येणार? मालवाहतुकीनंतर आता कुरिअर सेवा देणार

तोट्यातील एसटी फायद्यात येणार? मालवाहतुकीनंतर आता कुरिअर सेवा देणार

Next

- प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : मालवाहतुकीच्या यशस्वी प्रयोगानंतर राज्य परिवहन महामंडळ नवा व्यवसाय सुरू करीत आहे. एसटी आता कुरिअर सेवा सुरू करणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या एसटी गाड्यांच्या माध्यमातून पार्सल व कुरिअर पोहोचवले जाईल. कुरिअर सेवा ही केवळ गावखेड्यापर्यंतच असेल की, ती डोअर टू डोअर असेल, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पार्सल व कुरिअरच्या माध्यमातून एसटीने वर्षाला ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या राज्य परिवहन महामंडळाने अडचणींनाच संधी मानून काम करण्याचे ठरवले आहे. 
कोरोना महामारीत विपरीत परिस्थितीतदेखील मालवाहतुकीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. त्यामुळे आता व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक पार्सल व कुरिअर सेवेचा अभ्यास करीत आहे. त्यासाठी अन्य राज्यांतीलदेखील महामंडळाच्या कामाचा आधार घेतला जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भाग खेड्यापाड्यांत मिळून ६०० जागा स्वतःच्या मालकीच्या आहेत. पार्सल व कुरिअरसाठी या जागेचा वापर केला जाणार आहे.

युपीचा फॉर्म्युला लागू करणार 
देशात उत्तर प्रदेशचे एसटी महामंडळ सर्वांत जास्त नफ्यात आहे. याचे कारण म्हणजे ७० टक्के प्रवासी वाहतूक व ३० टक्के अन्य माध्यमांतून  उत्पन्न मिळविणे. त्याचाच आधार घेत राज्य परिवहन महामंडळदेखील केवळ प्रवासी वाहतुकीतूनच नाही, तर अन्य माध्यमांतूनदेखील उत्पन्न मिळविणार आहे. 

पार्सल व कुरिअरची आमची योजना अंतिम टप्प्यात आहे. कुरिअर सेवा डोअर टू डोअर देण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. येत्या काही दिवसांत तो निर्णय होईल. लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
    - शेखर चन्ने, व्यवस्थापकीय 
    संचालक, परिवहन महामंडळ

एसटी फायद्यात राहण्यासाठी त्यांना उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधून त्याची अंमलबजावणी करावीच लागेल. कुरिअर सेवेतून एसटीला चांगले उत्पन्न मिळेल. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.            
    -श्रीरंग बर्गे, सरचिटणीस, महाराष्ट्र 
    एसटी कर्मचारी काँग्रेस, मुंबई

Web Title: ST's now start courier service after freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.