srpf jawans who are on election duty in bhandara gondia treated inhumanly by senior officers | मतदानाच्या बंदोबस्तासाठी आलेले जवान उपाशीच परतले; भंडारा-गोंदियातील धक्कादायक प्रकार
मतदानाच्या बंदोबस्तासाठी आलेले जवान उपाशीच परतले; भंडारा-गोंदियातील धक्कादायक प्रकार

गोंदिया: भंडारा-गोंदिया व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या बंदोबस्तासाठी गट १५ गोंदिया कॅम्प नागपूर येथील एसआरपीच्या जवांनाना सुरक्षेसाठी देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत नेमण्यात आले होते. परंतु मतदान झाल्यानंतर त्यांना जेवणही न देता त्यांना उपाशीपोटी लगेच परत पाठवण्यात आल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 

गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने जवानांनी मतदानाच्यावेळी चोख बंदोबस्त ठेवत कुठलीही चूक होऊ नये, यासाठी सतर्कतेने काम केले. त्यानंतर ११ एप्रिलला मतदान संपल्यानंतर लगेच ६ वाजताच पुणे येथील बंदोबस्तासाठी एसआरपीएफच्या जवानांना रवाना करण्यात आले. निवडणूक कार्य करून बोरगाव कँप येथे पोचताच ५ मिनिटाची विश्रांतीही घेऊ दिली नाही. लगेच पुणे ग्रामीण बंदोबस्ताकरीता निघण्याचे आदेश देण्यात आले. परिणामी या जवानांवर रात्रभर उपाशी प्रवास करण्याची वेळ आली. चिचगडवरून निघालेल्या या पोलिसांच्या गाड्या राष्ट्रीय महामार्गावरील कारंजा लाड येथे सकाळी ४ वाजताच्या सुमारास पोहोचताच थोडा वेळ जवांनानी तेथील एका पेट्रोल पंपावर विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला. 

सकाळच्या सुमारास प्रात:विधी करायला कंपनी नायकांनी वेळ न देताच ६ वाजताच्या सुमारास पुण्यासाठी पोलीस वाहन निघाले. ११ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता निघालेल्या या पोलीस जवानांना मात्र १३ तारखेच्या दुपारी १ वाजतापर्यंत नाश्ता किंवा जेवण उपलब्ध करून दिले गेले नाही. तसेच ३ दिवसांपासून झोप झाली नसल्याने आमची प्रकृती बिघडली असल्याची भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून या जवांनानी गोंदियाच्या पोलीस अधीक्षकांपर्यंत पोचिवण्याचा प्रयत्न केला. 

पोलीस जवांनाच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था न करताच या कंपनीचे नायक पोलीस उपनिरिक्षक विश्वास हे रजेवर निघून गेले. कंपनी नायक विश्वास यांना परिस्थितीची जाणीव करु न दिल्यानंतरही त्यांनी तुम्ही माझी तक्रार करा. मी कुणाला घाबरत नाही असे बोलून या कंपनीतील पोलीस जवांनाना वाईट वागणूक दिली, असा उल्लेख सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. ही कंपनी गुरूवारी (दि.११) रात्रीला ८ वाजता गोंदिया जिल्ह्यातून बुलढाण्याकरीता रवाना झाल्याची माहिती आहे. 

एसआरपीएफ कंपनीचे रेशन गेले कुठे?
कुठेही बंदोबस्तासाठी गेल्यावर एसआरपी कंपनीचे स्वत:चे जेवण असते. त्यांचा स्वतंत्र स्वयंपाकी असतो. गोंदिया जिल्ह्यात निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी एसआरपीच्या ११ कंपन्या आल्या होत्या. परंतु एकाही कंपनीची तक्रार गोंदियाच्या पोलीस अधीक्षकांकडे आली नाही. केवळ एकाच कंपनीच्या जवानांची तक्रारी फक्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या कंपनीचे कमांडर विश्वास त्यांना सोडून रजेवर गेल्यामुळे हा प्रकार घडू शकतो. 

सर्व जवांनाना आम्ही फूड पॅकेट दिले होते. जेवण दिले नाही अशी कुणाचीही तक्रार माझ्याकडे आली नाही. परंतु सोशल मीडियावरून चाललेल्या प्रकारावरून त्या कंपनीचे कमांडट जावेद अन्वर यांच्याशी चर्चा केल्यावर अशा प्रकारची कसलीही तक्रार नसून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 
- विनीता शाहू, पोलीस अधीक्षक गोंदिया.
 


Web Title: srpf jawans who are on election duty in bhandara gondia treated inhumanly by senior officers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.