Palghar: रक्षकच बनले भक्षक! तक्रार घेऊन आलेल्या तरुणीवर अत्याचार, पोलीस कॉन्स्टेबल अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:48 IST2025-12-09T13:46:20+5:302025-12-09T13:48:34+5:30
Palghar Rape News: तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली.

Palghar: रक्षकच बनले भक्षक! तक्रार घेऊन आलेल्या तरुणीवर अत्याचार, पोलीस कॉन्स्टेबल अटकेत
पालघर जिल्ह्यातून अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली. कासा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या २१ वर्षीय तरुणीशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबलला अटक झाली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात आणि पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला, एक पुरुष मित्र आणि त्याच्या पत्नीसह २६ नोव्हेंबर रोजी कासा पोलीस ठाण्यात गेले. मित्राची पत्नी पीडित महिला यांच्यात जोरदार भांडण झाल्यानंतर ते तिघेही पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यावेळी पीडिताची आणि पोलीस कॉन्स्टेबल शरद भोगडे यांची भेट झाली. कॉन्स्टेबल शरद भोगडे याने हस्तक्षेप करत दोन्ही महिलांच्या तक्रारी नोंदवल्या. याच तक्रार प्रक्रियेदरम्यान शरदने पीडिताशी जवळीक वाढवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेला पोलीस ठाण्याच्या आवारातील पाठीमागील बाजूस असलेल्या कॉन्स्टेबलच्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे.
पीडिताने बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आणि कठोर कारवाई केली. कॉन्स्टेबल शरद भोगडे याला तात्काळ अटक करण्यात आली. कासा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अविनाश मंडाले यांची तातडीने मुख्यालयात बदली करण्यात आली.