चांदमिया पाटील, तुम्ही छाती फाडण्याची गरज नाही; शिवसेनेचा 'राम'बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 07:44 AM2020-03-09T07:44:50+5:302020-03-09T07:47:17+5:30

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या भेटीवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांचा शिवसेनेकडून समाचार

shiv sena slams bjp leader chandrakant patil for criticizing cm uddhav thackerays ayodhya visit kkg | चांदमिया पाटील, तुम्ही छाती फाडण्याची गरज नाही; शिवसेनेचा 'राम'बाण

चांदमिया पाटील, तुम्ही छाती फाडण्याची गरज नाही; शिवसेनेचा 'राम'बाण

Next

मुंबई: मुख्यमंत्री अयोध्या भेटीवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांचा शिवसेनेनं सामनातून समाचार घेतला आहे. तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. माझी छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील, असं म्हणणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चांदमियां पाटील असा करण्यात आला आहे. चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी, असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे. 

चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच 'ठाकरे सरकार'च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत, अशी टीका शिवसेनेनं केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अयोध्या यात्रा यथासांग पार पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील उठवळ विरोधकांचे पोटविकार बळावल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या अयोध्या यात्रेवर फालतू टीका-टिपणी सुरू केली. त्यात त्यांचेच तोंडात लपवलेले राक्षसी सुळे जनतेला दिसत आहेत. उद्धव ठाकरे हे अयोध्येस गेले, ते तिथे प्रथम गेले काय? राज्यात फडणवीसांचे व केंद्रात मोदींचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा मोठा फौजफाटा घेऊन अयोध्येस जाऊन आले, दर्शन घेतले होते तसेच शरयूच्या तीरी त्यावेळी भव्य महाआरती केली होती. तोपर्यंत ठाकरे हे हिंदुत्ववादी होते. मात्र आता महाराष्ट्रातील भाजपवाल्यांना हे ढोंग वाटत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरं तर ढोंग आहे. तसे ढोंग राज्यातील भाजपवाले करीत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाचा समाचार घेतला आहे. 

उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहेत, काँग्रेसच्या सोबत राहूनही त्यांनी हिंदुत्वाच्या दुधात मिठाचा खडा पडू दिला नाही याच पोटदुखीने राज्यातील विरोधक बेजार झाले आहेत. दिल्लीप्रमाणे नागरिकता कायद्यावर महाराष्ट्रात हिंसा व्हावी असे राज्यातील ठाकरे विरोधकांना वाटत होते, पण उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या पोटदुखीवर असा इलाज केला की, राज्यात साधी ठिणगीही पडू दिली नाही. ही सर्व वाडवडिलांची पुण्याई, छत्रपतींचे आशीर्वाद आणि श्रीरामाचा प्रसाद आहे. त्याच भावनेतून मुख्यमंत्री ठाकरे हे अयोध्येत जाऊन श्रीरामचरणी नतमस्तक झाले. मुख्यमंत्री तिथे गेले व दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या खिशात हात घातला व राममंदिरासाठी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. अयोध्येत भव्य राममंदिर निर्माण कार्य सुरू होईल व पहिला धनादेश 'ठाकरे सरकार'ने दिला याची इतिहासात नोंद राहील. अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. यात राज्यातील विरोधकांच्या पोटात कळा याव्यात असे काय आहे? हे ऐकून त्यांनी खूश व्हायला हवे होते, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं आहे. 

चांदमियां पाटील वगैरेंच्या छातीत राम आहे. मग इतरांना काय छात्या नाहीत? पण बहकलेला, निराश झालेला विरोधी पक्ष काय बोलतो आणि कसा वागतो ते त्यांनाच माहीत! ''शिवसेनेने भाजपचा त्याग केलाय, हिंदुत्वाचा नाही.'' या एका ठोशाने उद्धव ठाकरे यांनी सगळय़ांचेच दात घशात घातले. हा ठोसा मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जागा निवडली ती अयोध्येची. अयोध्या म्हणजे कुणा एखाद्याची मक्तेदारी नाही. कुणी सरकार स्थापनेसाठी इकडे गेला काय, किंवा तिकडे गेला काय? रामावर ज्यांची श्रद्धा त्या सगळय़ांचीच अयोध्या. कैकयीमुळे श्रीराम वनवासात गेले, पण तिचा पुत्र भरत हा रामभक्त होता. तशी विचारधारा कुठलीही असली तरी ती रामभक्तीआड येऊ शकत नाही. पुन्हा फक्त वाल्याचे वाल्मीकी बनविण्याचे वॉशिंग मशीन राजकारणात आणले म्हणजे 'रामायण' समजले असे होत नाही, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
 

Web Title: shiv sena slams bjp leader chandrakant patil for criticizing cm uddhav thackerays ayodhya visit kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.