सातारा लोकसभेची जागा शिवसेनेचीच - नरेंद्र पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:52 AM2019-09-23T03:52:00+5:302019-09-23T03:52:49+5:30

पक्षांतरानंतरही उदयनराजे भोसले यांच्यापुढील आव्हान कायम

Shiv Sena is the seat of Satara Lok Sabha - Narendra Patil | सातारा लोकसभेची जागा शिवसेनेचीच - नरेंद्र पाटील

सातारा लोकसभेची जागा शिवसेनेचीच - नरेंद्र पाटील

Next

नवी मुंबई : युतीच्या जागावाटपानुसार सातारा लोकसभेची जागा ही शिवसेनेचीच असल्याचा दावा नरेंद्र पाटील यांनी केला आहे. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीतून भाजपत डेरेदाखल झालेल्या उदयनराजे भोसले यांच्यासमोर पुन्हा पेच निर्माण झाला आहे.

लोकसभेला भाजप-शिवसेना युतीतर्फे माथाडी नेते तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या उदयनराजेंनी त्यांचा १ लाख २६ हजार ५२८ मतांनी पराभव केला होता. मात्र, आता राजे भाजपवासी झाले आहेत. पक्षप्रवेशाआधी राजेंना सातारा लोकसभेची जागा देण्याचे आश्वासन भाजपने दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. असे असताना शिवसेनेच्या पाटील यांनी युतीच्या जागा वाटपाचा आधार घेत, सातारच्या जागेवर दावा ठोकला आहे. मात्र, येथून उमेदवारी कोणाला द्यावी, याचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेतली जाईल, अशी आशा राजे आणि त्यांच्या समर्थकांना होती. मात्र, निवडणूक आयोगाने सातारची पोटनिवडणूक लांबणीवर टाकली. त्यामुळे भाजपने राजेंना ‘दगा’ दिल्याची भावना कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे. त्यात आता शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांनी जागेसाठी दावा ठोकल्याने राजेंसमोरील पेच वाढला आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी कोणत्या गनिमी काव्याचा
वापर करतील, याकडे कार्यकर्त्यांसहीत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दिवंगत माथाडी नेते आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८६व्या जयंती निमित्ताने एपीएमसीमध्ये २५ सप्टेंबरला माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोल्लेखित माहिती दिली.

पवारांना निमंत्रण नाही
एपीएमसीतील कांदा-बटाटा मार्केटमध्ये २५ सप्टेंबरला होणाऱ्या माथाडी कामगार मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. पण राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले नसल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी या वेळी दिली.

Web Title: Shiv Sena is the seat of Satara Lok Sabha - Narendra Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.