"समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असंच बहुतेक पुढाऱ्यांना वाटू लागलंय"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 07:54 AM2021-04-06T07:54:26+5:302021-04-06T07:57:07+5:30

पंढरपूर, पश्चिम बंगाल निवडणुकांच्या प्रचारातील गर्दीवरून शिवसेनेचा टोला

shiv sena saamna agralekh slams ncp jayant patil west bengal election on crowd coronavirus | "समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असंच बहुतेक पुढाऱ्यांना वाटू लागलंय"

"समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असंच बहुतेक पुढाऱ्यांना वाटू लागलंय"

Next
ठळक मुद्देपंढरपूर, पश्चिम बंगाल निवडणुकांच्या प्रचारातील गर्दीवरून शिवसेनेने लगावला टोलामुंबई-पुण्यासारख्या शहरांनी वेळीच निर्बंध स्वीकारले असते तर नक्कीच आकड्यांची घसरण दिसली असती : शिवसेना

गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थिती राज्यात काही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे देशातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू आहेत. परंतु सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या प्रचारसभेत होणाऱ्या गर्दीवरून शिवसेनेनं टोला लगावला आहे. 

 "पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाही समोरची विनामुखपट्टय़ांची अतिउत्साही गर्दी पाहून स्वतःच्या नाकातोंडावरील ‘पट्टी’ काढून भाषण करण्याचा मोह आवरला नाही. समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असेच बहुतेक पुढाऱ्यांना वाटू लागले आहे. तिकडे पश्चिम बंगालातही निवडणूक प्रचाराची रणधुमाळी पाहता तेथेही त्यात कोरोना चिरडला गेला आहे का, अशी शंका येते," असं म्हणत शिवसेनेनं निशाणा साधला. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून यावर जोरदार टीका केली. 

काय म्हटलंय अग्रलेखात?

दुसऱ्या लाटेत ८ हजार ५७९ या फेब्रुवारी २१ मधील निचांकी रुग्णसंख्येवरून एक लाखाचा आकडा फक्त ६२ दिवसांत गाठला गेला आहे. त्यावरूनही कोरोनाच्या दुसऱया लाटेचा वेग किती भयंकर आहे याचा अंदाज येतो. एवढेच नव्हे तर पुढील १५ दिवसांत या लाटेचा कहर खऱ्या अर्थाने दिसेल, असा धोक्याचा इशाराच तज्ज्ञ मंडळी देत आहेत. या सर्व भयंकर शक्यतेचा विचार करून कोरोनाशी लढा देण्यासाठी नागरिकांनाच सज्ज व्हावे लागेल. ‘माझे प्राण माझीच जबाबदारी’ या भूमिकेत शिरावे लागेल. आरोग्य व्यवस्थेवरील ताण हा चिंताजनक आहे. एखाद्या युद्धप्रसंगी शेवटी जनतेलाच सैनिक बनून शत्रूशी लढावे लागते तसे हे ‘युद्ध’ सुरू झाले आहे. राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्वच विरोधी पक्षांशी चर्चा केली.  

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाही समोरची विनामुखपट्टय़ांची अतिउत्साही गर्दी पाहून स्वतःच्या नाकातोंडावरील ‘पट्टी’ काढून भाषण करण्याचा मोह आवरला नाही. समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असेच बहुतेक पुढाऱयांना वाटू लागले आहे. तिकडे पश्चिम बंगालातही निवडणूक प्रचाराची रणधुमाळी पाहता तेथेही त्यात कोरोना चिरडला गेला आहे का, अशी शंका येते. ‘‘पंतप्रधान मोदी, तुम्ही परमेश्वराचे अवतार आहात काय? कोण आहात तुम्ही?’’ असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी त्राग्याने विचारला तो खराच आहे. मोदी हे नक्कीच परमेश्वराचे अवतार नाहीत. तसे असते तर त्यांनीही जादूच्या छडीने छुमंतर करून कोरोनाचा पराभव केला असता, पण आपण सत्तेवर विराजमान झालेले एक साधारण मनुष्यप्राणीच आहोत याचे भान ठेवून मोदी यांनीही कोरोनाच्या दुसऱया लाटेशी लढण्यासाठी पाच कलमी कार्यक्रम जाहीर केला.

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत याबद्दल ज्यांना राष्ट्रीय पातळीवर राजकीय चिंता वाटते त्यांनी महाराष्ट्राने लसीकरणाबाबत केलेल्या विक्रमाचीही नोंद घ्यायला नको काय? शनिवारी एकाच दिवशी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली याबद्दल महाराष्ट्राची पाठ दिल्लीश्वरांना थोपटावीच लागेल. कोरोनाचा कहर फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात आहे. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांनीही ‘टेस्टिंग’ आणि ‘ट्रेसिंग’चा पाठपुरावा केला तर अनेक राज्यांत कोरोना आकडय़ांचा कडेलोट होईल, पण जेथे निवडणुका आहेत तेथे मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कोविड-कोरोनाचे नाव काढायचे नाही असे जणू आदेशच सरकारी यंत्रणांना मिळालेले दिसतात. 

मुंबई-पुण्यासारख्या शहरांनी वेळीच निर्बंध स्वीकारले असते तर नक्कीच आकड्यांची घसरण दिसली असती. येथे सरकार कमी पडते आहे, असे नाही. उलट कोरोनाग्रस्तांचे वाढते आकडे लक्षात घेऊन मुंबईसह राज्यभरात ‘जम्बो’ आरोग्य व्यवस्था उभी केली जात आहे. या महामारीला रोखण्यासाठीच सरकार हे सगळे करीत आहे. राज्यात आता लागू केलेले कडक निर्बंध आणि सप्ताहाअखेरचे लॉकडाऊन त्याचाच भाग आहे. 

Web Title: shiv sena saamna agralekh slams ncp jayant patil west bengal election on crowd coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.