शिवसेना खासदाराला 'वर्षा'वर नो एंट्री? अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही; ताटकळून माघारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 03:44 PM2021-10-01T15:44:32+5:302021-10-01T15:47:39+5:30

अर्धा तास ताटकळत थांबूनही शिवसेना पक्षप्रमुखांची भेट नाही; खासदार वर्षावरून माघारी

shiv sena mp bhavana gawali not get chance to CM Uddhav Thackeray at varsha | शिवसेना खासदाराला 'वर्षा'वर नो एंट्री? अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही; ताटकळून माघारी

शिवसेना खासदाराला 'वर्षा'वर नो एंट्री? अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही; ताटकळून माघारी

googlenewsNext

मुंबई: सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असलेल्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांनी गवळींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ऑगस्टच्या अखेरीस ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या वाशिममधील संस्थांवर धाडी टाकल्या. गवळी लोकसभेत वाशिम-यवतमाळ मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.

ईडीच्या धाडींमुळे अडचणीत आलेल्या भावना गवळी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचल्या होत्या. मात्र त्यांना वर्षावर प्रवेश मिळाला नाही. गवळी जवळपास अर्धा तास मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रतीक्षा करत थांबल्या होत्या. मात्र त्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आली नाही. ठाकरेंकडून त्यांना कोणताही निरोपही दिला गेला नाही. त्यामुळे ताटकळलेल्या गवळी अखेर माघारी फिरल्या.

सोमय्यांचे आरोप, ईडीचे छापे
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याची माहिती २० ऑगस्ट रोजी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी दिली होती. पुढे १० दिवसांनंतर मुंबई येथील ईडीचे अधिकारी रिसोड तालुक्यात धडकले. काहीजण देगाव येथील बालाजी पार्टिकलला पोहोचले. काही अधिकारी रिसोड शहरातील दि रिसोड अर्बन कॉ. ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड येथे गेले. त्यांनी शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली.

शिवसेनेचे अनेक मोठे नेते अडचणीत
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. परिवहन मंत्री अनिल परब, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्यासह अनेकांना ईडीकडून समन्स बजावण्यात आली आहेत. 

Web Title: shiv sena mp bhavana gawali not get chance to CM Uddhav Thackeray at varsha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.