१७५ आमदारांच्या पाठिंब्याचा शिवसेनेचा दावा; महायुतीतील तणाव कायमच!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 05:52 AM2019-11-04T05:52:05+5:302019-11-04T05:58:29+5:30

सत्तेचा तिढा सुटेना : गुंडांकडून आमदारांवर दबाव, संजय राऊत यांचा आरोप

Shiv Sena claims support of MLAs, Stress in Mahayuti in maharashtra | १७५ आमदारांच्या पाठिंब्याचा शिवसेनेचा दावा; महायुतीतील तणाव कायमच!

१७५ आमदारांच्या पाठिंब्याचा शिवसेनेचा दावा; महायुतीतील तणाव कायमच!

Next

मुंबई : शिवसेनेकडे १७५ आमदारांचे संख्याबळ असून सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल आणि शिवतिर्थावर शपथविधी होईल, असा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. त्यामुळे महायुतीतील तणाव कायमच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

भाजपने शपथविधीसाठी वानखेडे स्टेडीयमवर तयारी चालविल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे राऊत म्हणाले. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या १७५ पर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील इच्छा आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि शिवाजी पार्कात शपथविधी पार पडेल, असे राऊत म्हणाले.
शिवसेना कोणाच्या पाठिंब्यावर सरकार बनवणार असा प्रश्न विचारला असता, सत्तेचे गणित जमले की लवकरच आम्ही ते माध्यमांसमोर मांडू, असे सांगत याबाबत अधिक बोलणे त्यांनी टाळले. मात्र, सत्तेच्या वाटपाबाबत माध्यमात ज्या बातम्या येत आहेत त्या खोट्या आहेत.
अमित शाह यांच्यासोबतचे संबंध मधुरच

देशाचे गृहमंत्री अमित शाह हे काळाची पावले ओळखणारे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्र्वी परिस्थिती ओळखूनच त्यांनी युती केली. राज्यातील सत्तेच्या वाटाघाटी त्यांच्यासमोर झाल्या आहेत. मात्र, सध्या शाह यांचे मौन रहस्यमय आहे. हरियाणासारख्या छोट्या राज्यातील तिढा सोडवण्यासाठी शाह यांनी पुढाकार घेतला. मात्र, महाराष्ट्राबाबतची त्यांची भूमिका रहस्यमय असल्याचे सांगतानाच शाह आणि शिवसेनेचे संबंध मधुर असल्याचेही राऊत म्हणाले. सरकार बनवण्यासाठी ज्या-ज्या सरकारने ईडीचा वापर केला आहे, त्यावर हा निर्णय बूमरँग झाला आहे. सध्या तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदांवर बसले आहेत. त्यांचा वापर करून आमदारांवर दबाव आणला जात आहे. कोण, कुठे भेटत आहे, कसा दबाव आणत आहेत याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. या गुंडागर्दीचा लवकरच गौप्यस्फोट करू. भाजपचे राजकारण हे गुंडांच्या टोळ््यांपेक्षाही घाणेरडे बनले आहे, अशी टीकासुद्धा राऊत यांनी केली.

‘शरद पवार राज्यात येणार नाहीत’
शरद पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच पवार भेटीबाबत राऊत म्हणाले की, पवार मोठे नेते आहेत. ते मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठे आहेत. ते राज्याच्या राजकारणात येणार नाहीत. जेव्हा अशाप्रकारची राजकीय परिस्थिती उद्भवते त्यावेळी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही पवारांचे मार्गदर्शन घेतात. आम्ही घेतले तर काय चुकले?

चर्चा होईल ती फक्त मुख्यमंत्रिपदावरच
शिवसेना आणि भाजपमध्ये फक्त मुख्यमंत्रिपदावरच चर्चा होईल. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. महाराष्ट्रात खोट्याचं राजकारण चालत नाही.
- खा. संजय राऊत

भूमिकांवर दोघेही ठाम
भाजपला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवे आहे आणि शिवसेनेला ते अडीच -अडीच वर्षे विभागून हवे आहे. दोघेही आपल्या भूमिकेवर एकदम ठाम असल्याने सत्ता वाटपाचा तिढा सुटता सुटेना असे चित्र रविवारीदेखील कायम राहिले.

‘मी पुन्हा येईन’ म्हटले की, भीती वाटते - उद्धव ठाकरे
परतीचा पाऊस ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले की, भीती वाटते, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत लगावला. विधानसभा रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता. ठाकरे यांनी परतीचा पाऊस आणि फडणवीस यांच्या त्या शब्दांवर एकप्रकारे राजकीय कोटी केली.
 

 

Web Title: Shiv Sena claims support of MLAs, Stress in Mahayuti in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.