Shiv sena BJP strong in Beed, NCP still disturb | बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच
बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच

मुंबई - एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झाली आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत बीडकरांनी राष्ट्रवादीला सपशेल बाजूला सारले असून भाजपला भरभरून मते दिली. बीड जिल्ह्यावर मजबूत पकड असणाऱ्या मुंडे कुटुंबियांपैकी धनंजय मुंडे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला कणखर नेता मिळाला असला तरी लोकसभा निवडणुकीत त्यांना स्वत:च्या मतदार संघात देखील पक्षाला आघाडी मिळवून देता आली नाही. त्यातच पक्षाचे दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी बसवण्याचे आव्हान धनंजय मुंडे यांच्यासमोर आहे.

लोकसभा निवडणुकीत मुंडे भगिनींनी राष्ट्रवादीला चांगलेच जेरीस आणले. बीड जिल्ह्यातील सहाच्या सहा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली. यामध्ये आष्टी मतदार संघातून मतदारांनी सर्वाधिक ७० हजारहून अधिक मते भाजपच्या झोळीत टाकली. भाजप-शिवसेना यांच्यात झालेली समेट आणि राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेनेत दाखल झाल्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीसोडून शिवसेनेचा बाण हाती घेतला. गेल्या वेळचे बीडमधील भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणारे विनायक मेटे यांनी लोकसभेला मुंडे भगिनींविरुद्ध भूमिका घेतली होती. तरी देखील क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातून भाजपला ६ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून दिली. तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या केजमधूनही भाजपला २८ हजारांचे मताधिक्य मिळाले. गेवराईतही शिवसेनेचे बदामराव पंडित आणि भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या एकीमुळे भाजला आघाडी मिळाली असून आष्टी आणि माजलगावमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

एकूणच लोकसभा निवडणुकीत सहाच्या सहा मतदार संघात भाजपने आघाडी मिळवली असली तरी, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यात मोठा फरक असतो. विधानसभेला उमेदवारांवर निवडणुकीचा निकाल बऱ्यात प्रमाणात अवलंबून असतो. तर लोकसभेला राष्ट्रीय नेतृत्व पाहिले जाते. मात्र क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशाने जिल्ह्यात युतीला फायदाच होणार आहे. तर यातून मार्ग काढत राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्याचं खडतर आव्हान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आहे.


Web Title: Shiv sena BJP strong in Beed, NCP still disturb
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.