Shiv Bhakt outraged over Nawab Malik's video; MNS also asked question to NCP | नवाब मलिकांच्या 'त्या' व्हिडिओवरुन शिवप्रेमींमध्ये संताप; मनसेनेही विचारला राष्ट्रवादीला सवाल 

नवाब मलिकांच्या 'त्या' व्हिडिओवरुन शिवप्रेमींमध्ये संताप; मनसेनेही विचारला राष्ट्रवादीला सवाल 

ठळक मुद्देरायगड किल्ल्यावरील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा व्हिडिओ व्हायरल महाराजांचा जयजयकार करण्यात कमीपणा वाटतो का? - मनसेवारिस पठाण यांच्यानंतर मंत्री नवाब मलिक अडचणीत

मुंबई - वारिस पठाण यांच्या विधानावरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना तर असा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदावर राहणं योग्य आहे का? असा सवाल मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी विचारला आहे. 

रायगड किल्ल्यावरील या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे. अजित पवारांसह अन्य जण शिवरायांच्या नावाने जय म्हणताना दिसत आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी या व्हिडिओ पोस्ट करुन नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

याबाबत मनसेचे अमेय खोपकर यांनी ट्विट केलं आहे की, आमचे असंख्य मुस्लीम बांधव आहेत, ज्यांच्यासमोर कुणी छत्रपती शिवाजी महाराज की, असं ओरडलं तरी ते आनंदाने जय अशी गर्जना करतात. मग या नवाब मलिकांना इतकी मग्रुरी का? महाराजांचा जयजयकार करण्यात कमीपणा वाटतो का? असा सवाल उपस्थित करण्यात केला आहे. तसेच अशा प्रवृत्तीच्या माणसाने राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदावर राहावं हे तुम्हाला पटतं का? या पक्षाचे अध्यक्ष आहेत ज्यांना त्यांचे समर्थक डायरेक्ट 'जाणता राजा' संबोधतात, त्या शरद पवारांना तरी असा माणूस कसा चालतो? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसला विचारण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणावर राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. 

दरम्यान, मागील महिन्यातही नवाब मलिक यांचा भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी मराठी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये विनापरवाना रस्त्याचं काम सुरु केल्याने कप्तान मलिक यांनी कामगारांना हात पाय कापून टाकण्याची धमकी दिली होती. त्यावेळीही नवाब मलिक अडचणीत आले होते. 
 

 

English summary :
Minister Nawab Malik Video on Chhatrapati Shivaji Maharaj viral in Social media, MNS Asked questions to NCP & Sharad Pawar

Web Title: Shiv Bhakt outraged over Nawab Malik's video; MNS also asked question to NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.