‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतलीच नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 05:46 AM2020-02-11T05:46:05+5:302020-02-11T06:45:54+5:30

नेहमीप्रमाणे ‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतून आलीच नाही.

'she' went ...hinganghat victim funeral | ‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतलीच नाही...

‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतलीच नाही...

Next

‘ती’ गेली...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/ नागपूर : नेहमीप्रमाणे ‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतून आलीच नाही... नराधमाने तिला मृत्यूच्या दाढेत लोटले असतानाही मृत्यूशी झुंजत राहिली... ज्वाळांनी अंगअंग भाजलेल्या अवस्थेत जगण्यासाठी झुंजत राहिली. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अन् सर्वांची प्रार्थना नियतीच्या कानावर गेलीच नाही. अखेर आठ दिवसांची झुंज थांबली अन् तिने जगाचा निरोप घेतला. आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर दारी आलेले तिचे पार्थिव पाहून मातापित्यांसह समस्त पंचक्रोशीला हंबरडा फुटला. तिच्या निधनाने स्तब्ध झालेल्या महाराष्ट्रातून मागणी झाली -‘त्या नराधमाला फाशीवर लटकवा!’ 

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट
येथे विकेश ऊर्फ विकी नगराळे या माथेफिरू नराधमाने प्राध्यापिका असलेल्या या तरुणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटविले. ३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ झाला. ४० टक्के भाजलेल्या पीडितेवर नागपूरच्या हॉस्पिटलात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी सकाळी ६.५५ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूची दु:खद वार्ता मिळताच समाजमन पेटून उठले. ठिकठिकाणी संताप व्यक्त झाला. संध्याकाळी मूळ गावी तिच्या पार्थिवाला वडिलांनी सायंकाळी ५.०८ वाजता मुखाग्नी दिला.

तिला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर नागपूर-हैदराबाद मार्गावरील हिंगणघाट तालुक्यातील पीडितेच्या मूळ गावात उसळेल याची कल्पना येताच पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला. सकाळी ७.३० वाजतापासूनच नागपूर-हैदराबाद मार्गावरील जाम, हिंगणघाट, वडनेर यासह पीडितेच्या मूळ गावात ठिकठिकाणी सीआरपीएफचे जवान, दंगल नियंत्रण पथक, वाहतूक पोलीस आदींना तैनात करण्यात आले होते. तर ११ वाजताच्या सुमारास पीडितेवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येईल, याचीही वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसल्याने पीडितेला अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांचे लोंढे तिच्या गावात सकाळपासूनच दाखल होण्यास सुरुवात झाली होती. अशातच सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास अंत्यविधीचे साहित्य गावात आणण्यात आले. त्यामुळे वर्धा-हैदराबाद मार्गावर नागरिकांचीही एकच गर्दी झाली होती.


आरोपीला दहा मिनिटांसाठी द्या
मेडिकलच्या शवविच्छेदन गृहासमोर जळीत पीडिताच्या कुटुंबीयांनी तोंडी नको, लेखी आश्वासन देण्याची मागणी करीत ठिय्या मांडला. यावेळी पीडितेचे मामा यांनी, मुलगी ज्या वेदनेतून गेली त्याच वेदनेतून आरोपीनेही जायला हवे असे म्हणत, केवळ दहा मिनिटांसाठी आरोपीला माझ्या हवाली करा, त्यालाही पेट्रोल टाकून जाळतो. नंतर मला तुम्ही पकडून नेले तरी चालेल, असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी उपस्थित नातेवाइकांनी नारेबाजी केली.

कठोर कायदा करणार
माता-भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून महाराष्टÑाची ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या गोष्टींना खपवून घेणार नाही. हिंगणघाटची घटना राज्यासाठी लांछनास्पद आहे. पीडिताच्या कुटुंबीयांची व गावकऱ्यांची अवस्था मी समजू शकतो. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे यासाठी तपास यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे निर्देश दिले आहेत. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री


खटला फास्ट ट्रॅक कोर्टात
हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेला वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीने प्रयत्न करूनही आपण तिला वाचवू शकलो नाही. पीडितेच्या कुटुंबीयांच्या दु:खात सरकार सहभागी आहे. या प्रकरणाचा जलद तपास करुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम देखरेख करत आहेत. - अनिल देशमुख, गृहमंत्री

रुग्णवाहिका अडवली
मेडिकलमध्ये शवविच्छेदनानंतर मृतदेह घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेला पीडितेच्या नातेवाइकांनी व तिच्या गावातील लोकांनी शवविच्छेदन गृहासमोरच अडविले. आरोपीला कठोर शिक्षा द्या, कुटुंबाला आर्थिक मदत द्या, आदी बाबी स्थानिक लिहूनच मागत होते. अडून बसलेल्या लोकांची अखेर पालकमंत्री सुनील केदार यांनी समजूत काढली.

 

Web Title: 'she' went ...hinganghat victim funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.