Sharad Pawar will meet CM Devendra Fadanvis on Drought issue of State | शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी; शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी; शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 

मुंबई - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्यात आली आहे. दोन दिवसात वेळ मिळेल त्यावेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी का द्यायला हवी हे मुख्यमंत्र्यांना समजवून सांगण्यात येईल. यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. 

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी वरील माहिती दिली. महाराष्ट्रात मोठया प्रमाणात दुष्काळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सतत दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

चारा छावण्या असतील किंवा जनावरांना पाण्याची व्यवस्था असेल याकडे सरकारने पाहिजे तसं लक्ष दिलेलं नाही. शेतकऱ्यांच्या बागा सुकल्या आहेत. या बागा सुकल्यामुळे येणार्‍या काळात त्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे असं मलिक यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार यांनी पराभवाने खचून न जाता दुष्काळी भागाचे दौरे करा असा सल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला होता. स्वत: शरद पवार राज्यातील दुष्काळ भागाचा दौरा करत आहेत. संकट आलं म्हणजे काय नाउमेद व्हायचं नसतं, संकटाने खचून जायचं नसतं असं पवार दुष्काळग्रस्त भागातील लोकांना भेटल्यानंतर म्हणत आहेत. 

दुष्काळाला सर्वजण मिळून सामोरे जाऊ; शरद पवारांची दुष्काळग्रस्तांना साद

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या चिलेवाडी व नागेवाडी या गावात जाऊन तेथील दुष्काळी भागाची परिस्थिती जाणून घेतली होती. आज सबंध महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. आज काळ कठिण आहे. मात्र आपण हरायचं नाही. दुष्काळासंबंधी राज्य सरकारकडून मदत घेऊ आणि आपण सर्व मिळून पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून प्रयत्न करू  असं पवार म्हणाले होते.

पाऊस उशिरा येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे, नंतर पाऊस चांगला पडेल असं म्हटलं जात आहे. पाऊस चांगला पडो पण आपण त्यासाठी तयार रहायला हवं. पावसाचा थेंब न थेंब वाचवून पाण्याचे योग्य ते नियोजन करायला हवे. पाणी फाऊंडेशन सध्या राज्यभरात चांगले काम करत आहे. त्यांना गावकरी मदत करतात हे पाहून समाधान वाटत आहे. हे सुरूच ठेवलं पाहिजे किंबाहुना आपण हे वाढवलं पाहिजे, असं आवाहन शरद पवारांनी लोकांना केलं होतं. 
 


Web Title: Sharad Pawar will meet CM Devendra Fadanvis on Drought issue of State
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.