Senior RPI leader Avinash Mahatekar to take oath as minister in maharashtra government | Breaking: रामदास आठवलेंचे 'खास' मित्र होणार मंत्री; शिवसेनेची दोन नावंही ठरली?
Breaking: रामदास आठवलेंचे 'खास' मित्र होणार मंत्री; शिवसेनेची दोन नावंही ठरली?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जोरदार चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अचानक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यात मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा केल्याचं ट्विटद्वारे सांगितलं होतं. आज फडणवीस भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. या बैठकीनंतर विस्ताराबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. या पार्श्वभूमीवर, अनेक नेत्यांच्या नावांबाबत तर्क लढवले जात आहेत. परंतु, एक नाव एकदम पक्कं झाल्याचं समजतं. 


रामदास आठवले यांच्या रिपाइंला या मंत्रिमंडळ विस्तारात 'लॉटरी' लागणार असल्याचं वृत्त 'लोकमत'ने शुक्रवारीच दिलं होतं. त्यानंतर आता, आठवलेंचे खास मित्र आणि जुने विश्वासू सहकारी अविनाश महातेकर उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील, असं ट्विट एएनआयनं केलं आहे . अविनाथ महातेकर हे रिपाइं आठवले गटाचे सरचिटणीस आहेत. त्यांचं नाव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आल्याची माहिती खुद्द रामदास आठवले यांनीच दिली आहे. दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानलेत.


शिवसेनेकडून तानाजी सावंत?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा केली. शिवसेना दोन मंत्रिपदांबाबत आग्रही आहे. त्यापैकी एक, राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना दिलं जाऊ शकतं, तर दुसरं तानाजी सावंत यांना मिळण्याची शक्यता आहे. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. त्यांचं गाव माढा तालुक्यात आहे. त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालून शिवसेना राष्ट्रवादीला शह देऊ इच्छिते. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.


दरम्यान, काँग्रेसचा हात सोडून भाजपाचा झेंडा हाती घेतलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलार यांचं मंत्रिपद निश्चित असल्याचं समजतं. विखेंना भाजपामधून थोडा विरोध असला, तरी त्यांच्या नावं पक्कंच मालं जातंय.


Web Title: Senior RPI leader Avinash Mahatekar to take oath as minister in maharashtra government
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.