देशाच्या सुरक्षितता, सार्वभौमत्वाला सर्वोच्च प्राधान्य: राजनाथ सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 12:09 PM2019-11-30T12:09:23+5:302019-11-30T20:36:38+5:30

देशाच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या प्रत्येकाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल

Security of the country and sovereignty a top priority by government: Rajnath Singh | देशाच्या सुरक्षितता, सार्वभौमत्वाला सर्वोच्च प्राधान्य: राजनाथ सिंह 

देशाच्या सुरक्षितता, सार्वभौमत्वाला सर्वोच्च प्राधान्य: राजनाथ सिंह 

googlenewsNext
ठळक मुद्दे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा

पुणे :  भारताचे सर्व राष्ट्रांबरोबर संबंध नेहमी सौहार्दपूर्ण राहिले आहेत. देशाच्या सीमांच्या सुरक्षेसाठी, सार्वभौमत्व टिकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पारंपरिक युद्धात पाकिस्तानचा भारतापुढे टिकाव लागत नाही, त्यामुळे आता पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग पत्करून भारताविरोधात छुपे युद्ध सुरू केले आहे. मात्र, या युद्धातही भारत त्यांना कधीच जिंकू देणार नाही. आजपर्यंत भारताने कुठल्याही देशावर आक्रमण केले नाही, जर भारतावर आक्रमण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना सडेतोड उत्तर देऊ, असा सज्जड दम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला. 
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शनिवारी खेत्रपाल परेड मैदानावर पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी, प्रबोधिनीचे प्रमुख एअरमार्शल आय. पी. विपीन, उप-प्रमुख रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल उपस्थित होते.
राजनाथ सिंह म्हणाले, भारताने दहशतवादाबरोबर प्रदीर्घ लढा दिला आहे. आंतराष्ट्रीय व्यासपीठावर भारताने दहशतवादाचा नेहमीच विरोध केला आहे. जगाने ९/११ आणि २६/११ सारखे दहशतवादी हल्ले पाहिले आहेत. यामुळे आम्ही दहशतवाद्यांविरोधात लढण्यास सज्ज आहोत. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या  साडेपाच वर्षांत पाकव्याप्त काश्मिरात घुसून केलेली कारवाई आणि बालाकोट येथील हवाई हल्ल्याने दहशतवादाचा बिमोड आम्ही केला. जेव्हा एखादा देश त्याच्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देत असेल आणि त्यांचा वापर भारतविरोधी करत असेल तर त्यांना आम्ही चोख उत्तर देऊ. पाकिस्तानने १९४८, १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये थेट युद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. पारंपरिक आणि मर्यादित युद्धात भारताला हरवणे शक्य नसल्याने त्यांनी दहशतवाद या छुप्या युद्धाचा भारातविरोधात वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांना या युद्धातही अपयश येत आहे. लष्कराला बळकटी देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त विकास आणि कूटनीतीच्या माध्यमातूनदेखील लष्कराला बळकटी देण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या प्रयत्नांमुळेच पाकिस्तानची दहशवादी कारवाईमधील भूमिका उघड केल्याने पाकिस्तान एकाकी पडला आहे. 
दहशतवादाविरोधात लष्कर कायम लढत आले आहे. याचबरोबर अर्धसैनिक बल तसेच पोलीस यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक दहशतवादी हल्ले निकामी करण्यात आले आहे. युद्ध लढण्यासोबतच सैन्याला सेवा आणि शांततेचा संदेश घेऊन पुढे जावे लागणार आहे. भारतीय संविधानाची सुरक्षा आणि सन्मान राखण्यासाठी सैन्यदल आणि राजकीय शक्ती एकत्रित कार्यरत आहे. केवळ सैनिकांवर सुरक्षेची जबाबदारी नसून राजकीय व्यक्तींवर देखील त्याची बरोबरीने जबाबदारी आहे. त्यासाठी सैन्याला बळकटी देण्यासोबत देशाचा विकास आणि परराष्ट्र व्यवहार यावर ही भर दिला जात आहे.  
...........
सैनिकांच्या कुटुंबियांच्या संरक्षण मंत्रालय नेहमी पाठिशी
दहशतावादासोबतच सायबर गुन्हेगारी आणि तिरस्करी विचारधारा यांचेदेखील आव्हान सैन्यदलापुढे वाढत आहे. देशाच्या संविधानाची सुरक्षा आणि सन्मान राखणे हे सैन्यदल आणि राजकीय शक्ती यांचे एकत्रित कर्तव्य आहे. हे युद्ध लढताना, संरक्षण मंत्रालय नेहमीच आपल्या सैन्याशी पाठिशी आहे. तसेच युद्धभूमीवर लढणाºया सैन्यदलाच्या कुटुंबियांची जबाबदारी पार पाडण्यासाठी संरक्षण विभाग नेहमीच तत्पर असेल, अशी ग्वाहीदेखील सिंह यांनी दिली.  

..................
एनडीएतील विद्यार्थी फौलाद
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत येणारा कॅडेट हा सुरुवातीला सामान्य असतो. पालकांच्या प्रयत्नांमुळे या विद्यार्थ्यांना प्रबोधिनीत येण्याची प्रेरणा मिळते. येथे आल्यावर त्यांचा सुरुवातीचा काळ थोडा कठीण जातो. मात्र, येथील शिस्त, प्रशिक्षण आणि कठोर मेहनतीमुळे तुमची मुले ‘फौलाद’ होतात असे पालकांना उद्देशून राजनाथ सिंह म्हणाले. 

Web Title: Security of the country and sovereignty a top priority by government: Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.