The same leaders in Mumbai, the same principles and results! | मुंबईमध्ये तेच नेते, तीच नीती अन् तोच निकाल!
मुंबईमध्ये तेच नेते, तीच नीती अन् तोच निकाल!


-  गौरीशंकर घाळे, मिलिंद बेल्हे, मनोज मुळ्ये

मुंबईतील काँग्रेस नेत्यांची ताकद अंतर्गत राजकारणातच खर्ची पडते. गुरूवारी जाहीर झालेल्या निकालाने याच गृहितकाला पुन्हा एकदा बळकटी दिली आहे. एकजुटीने लढणारी युती आणि विस्कळीत काँग्रेसजन अशा विषम लढाईत मुंबईतील सहाही जागांवर भाजप - शिवसेनेचे उमेदवार दणक्यात विजयी झाले आहेत.


मिलिंद देवरा, प्रिया दत्त, संजय निरूपम, एकनाथ गायकवाड आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, असे पाच उमेदवार काँग्रेसने उभे केले होते. या सर्वांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे संजय दिना पाटीलसुद्धा मोठ्या फरकाने पराभूत झाले. गेली किमान पंधरा वर्षे मुंबईतील काँग्रेस आघाडीचे नेतृत्व आणि समस्या कायम आहेत. मधल्या काळात संजय निरूपम मुंबईचे अध्यक्ष होते. युतीविरोधात आक्रमक पवित्रा घेताना पक्षातील अन्य नेत्यांना सोबत घ्यायची त्यांची तयारी नव्हती. कार्यकर्त्यांची नवी फळी, नवे नेतृत्व उभे करण्यापेक्षा देवरा, दत्त आणि गायकवाड घराण्याभोवतीच मुंबई काँग्रेसचे राजकारण घुटमळत राहिले. प्रिया दत्त यांनी तर सहा महिन्यांपूर्वी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. नंतर देवरांनीही तसेच संकेत दिले होते. शेवटी नाइलाजने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालावी लागली.


पक्ष संघटना नसेल तर एखादा फिल्मी सिताराही भविष्य बदलू शकत नाही, हे उत्तर मुंबईतील उर्मिलाच्या पराभवाने अधोरेखित केले. आघाडीच्या जागावाटपात मुंबईतील सहापैकी ईशान्य मुंबईची एकमेव जागा राष्ट्रवादीकडे आहे. संजय दिना पाटील तिथे राष्ट्रवादीचे उमेदवार. नववर्षानिमित्त १ जानेवारीला ‘मी येतोय’ या मथळ्याने त्यांचे काही बॅनर झळकले. इतकी वर्षे कुठे गेले होते, येणार म्हणजे भाजपात की आणखी कुठे? अशी चर्चाही तेंव्हा रंगली होती. पुढे, मनसे आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढत गेली तशी ईशान्यमधून इंजिनाला वाट मोकळी करून देण्याची चर्चाही रंगल्या. अखेर इंजिनाच्या शिट्टीने घड्याळ चालू ठेवण्याचा प्रयत्नही मतदारसंघात पार फसला. गेली दहा वर्षे आघाडीने तेचे ते चेहरे मुंबईकरांच्या माथी मारले. केवळ निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळतो. संघटनेच्या माध्यमातून पक्षाच्या धेयधोरणांसाठी झटणारी, जनआंदोलनांच्या माध्यमातून मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी ‘सतत’ संघर्षरत राहण्याची तयारी असलेले नेतृत्व निर्माण करण्याचे कष्ट जोवर काँग्रेस आघाडी घेणार नाही तोवर २०१४ आणि २०१९ सारखेच निकाल आघाडीच्या वाट्याला येत राहतील.


ठाणे, कल्याण, भिवंडीवर युतीचेच वर्चस्व
उमेदवाराबद्दल नाराजी असूनही अन्य कोणताही पर्याय नसल्याने शिवसेनेने ठाण्यात थोडी अडखळत सुरूवात केली, पण घसघशीत विजय मिळवत ठाणे शिवसेनेचेच असल्याचे दाखवून दिले. नवी मुंबईतील राष्ट्रवादीची ताकद तोकडी पडली. आयत्यावेळी रिंगणात उतरविलेल्या आनंद परांजपे यांची सुसंस्कृत जादू चालली नाही. मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण मतदारसंघात मुलाच्या विजयासाठी खूप अगोदरपासून केलेले प्रयत्न फळाला येणार, याची कल्पना निवडणुकीपूर्वीच आली होती. तरीही राष्ट्रवादीने तेथे तगडा उमेदवार दिला नाही. परिणामी आगरी कार्डाचा मुद्दा तापवूनही तेथे एकतर्फी सामना झाला. भिवंडीतील भाजपचे कपिल पाटील यांना आमदारकीत रस असल्याची चर्चा होती. पण पुढे शिवसेनेतील बंडामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर केलेली मात, कुणबी सेनेची साथ आणि काँग्रेसमधील बंडाळीचा फायदा पाटील यांना झाला. कल्याण पश्चिमेतून संघाच्या कार्यकर्त्यांनी अखेरच्या काळात त्यांना हात दिला. परिणामी ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व राखण्यात युतीच्या नेत्यांना यश आले. उपमुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढल्याने त्याचाही फायदा मिळाला.

कोकणात राणेंच्या वर्चस्वाला धक्का
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खा. नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. नारायण राणे यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला, पण ही जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांची मागणी मान्य झाली नाही. आता तळ कोकणातील प्रत्येक फेरीत राऊत यांना मिळालेल्या मताधिक्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे.
रायगडमध्ये शिवसेनेच्या अनंत गीतेंना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी पक्षांतर्गत कलह मिटवत, नवे मित्र जोडत जोरदार तयारी केली. त्याचा परिणाम दिसून आला. गीतेंविरूद्धच्या नाराजीचा फायदा आणि फक्त रायगड जिल्ह्याच्या बळावर लढतीचे त्यांचे प्रयत्न फळाला आले.

पालघरची जागा जरी शिवसेनेने जिंकली असली, तरी राजेंद्र गावित यांच्यामुळे उमेदवार मात्र भाजपचा जिंकून आला. मतदार नोंदणी, तंत्राचा अचूक वापर करत भाजपने शिवसेनेला बळ दिल्याचा बहुजन विकास आघाडीला फटका बसला.


Web Title: The same leaders in Mumbai, the same principles and results!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.