Sai Paranjpe's Literature Academy's 'Translation Award' | सई परांजपे यांना साहित्य अकादमीचा ‘अनुवाद पुरस्कार’

सई परांजपे यांना साहित्य अकादमीचा ‘अनुवाद पुरस्कार’

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिका सई परांजपे यांना ‘साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार २०१९’ जाहीर झाला आहे. सोमवारी दिल्लीत साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. २३ भाषांमध्ये साहित्यिकांना विविध साहित्यकृतींसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले.

सई परांजपे यांच्या ‘आणि मग एक दिवस’ या साहित्यकृतीला अनुवाद पुरस्कार घोषित झाला असून याची पॉप्युलर प्रकाशनने निर्मिती केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे.

ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची आत्मकथा असलेल्या ‘अ‍ॅण्ड देन वन डे’ या साहित्यकृतीचा अनुवाद ‘आणि मग एक दिवस’ या साहित्यकृतीत करण्यात आला आहे. मराठी भाषेतील अनुवादित साहित्य पुरस्कारांसाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, जयंत पवार आणि निशिकांत ठाकर यांनी परीक्षकांची भूमिका बजावली.

सई परांजपे या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, पटकथा लेखिका आणि दिग्दर्शिका आहेत. त्यांनी मराठी, हिंदी, तसेच इंग्रजीत अनेक नाटक,
बालनाट्येदेखील केली आहेत. ‘जास्वंदी’, ‘सख्खे शेजारी’ आणि ‘अलबेल’ ही त्यांनी लिहिलेली व दिग्दर्शित केलेली सर्वात गाजलेली नाटके आहेत. नाटक आणि सिनेमातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. नाटक, सिनेमात अष्टपैलू कलाकार असण्याव्यतिरिक्त परांजपे या रेडिओ निवेदिका, माहितीपट दिग्दर्शिका, तसेच सामाजिक कार्यकर्त्याही आहेत.

आनंदाचा क्षण
साहित्य अकादमीच्या अनुवाद पुरस्काराच्या घोषणेने आत्यंतिक आनंद झाला आहे. अनुवादित साहित्यात रुळण्याचा स्वभाव नाही, पण नसिरुद्दीन शाह यांच्या विनंतीमुळे या पुस्तकाचा अनुवाद केला होता. नसिरुद्दीन शाह यांची आत्मकथा असलेल्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. हा गौरव म्हणजे साहित्य क्षेत्रातील योगदानाचा महत्त्वाचा टप्पा आहे.
- सई परांजपे, पुरस्कार विजेत्या

Web Title: Sai Paranjpe's Literature Academy's 'Translation Award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.