रोहित पवारांकडून असुरक्षित मतदार संघाची निवड !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 04:50 PM2019-07-13T16:50:51+5:302019-07-13T16:53:53+5:30

रोहित पवार यांनी उमेदवारी निश्चित नसताना देखील कर्जत-जामखेड मतदार संघात काम सुरू केले आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनाच रोहित पवारांनी आव्हान दिले आहे.

Rohit Pawar select unsecured constituency karjat Jamkhed for Vidhan Sabha | रोहित पवारांकडून असुरक्षित मतदार संघाची निवड !

रोहित पवारांकडून असुरक्षित मतदार संघाची निवड !

googlenewsNext

मुंबई - भारतात लोकशाही अस्तित्वात असली तरी भारतीय राजकारणावर स्वातंत्र्यापासूनच घराणेशाहीचा प्रभाव आहे. राष्ट्रीय पक्षापासून स्थानिक पातळीवर असलेले छोटे-छोटे पक्षही यातून सुटले नाहीत. परंतु, २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उदयापासून घराणेशाहीच्या मुळावर हल्ला झाल्याचे दिसत असले तरी तो विरोधी पक्षातील घराणेशाहीवर झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे सत्ताधारी देखील त्याच मार्गाने मार्गक्रमण करत आहेत, ज्या मार्गाने आताचे विरोधक आले आहेत. परंतु, घराणेशाहीतून आलेली नेत्यांची वारसदार देखील ग्राउंड लेव्हलवर जाऊन काम करण्यावर भर देताना दिसत आहे. यामध्ये शरद पवारांचे नातू रोहित पवार यांच नाव सामील झालं आहे. मात्र रोहित पवार यांनी निवडतानाच खडतर मतदार संघ निवडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

प्रस्थापित नेत्यांच्या वारसदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यापूर्वी प्रामुख्याने सुरक्षित मतदार संघांचा पाठपुरावा करण्यात येतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांनी सुरक्षित मतदार संघाचा शोधही सुरू केला आहे. अर्थात नेत्यांच्या वारसदारांना लढण्यासाठी नव्हे तर जिंकविण्यासाठीच, निवडणुकीत उतरविले जाते, हे स्पष्टच आहे.

याउलट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या वारसदारांना वेगळ्या पद्धतीने लॉन्च केले. लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना सुरक्षित मतदारसंघ न देता, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मावळ मतदार संघातून उमेदवारी दिली. ऐनवेळी पार्थ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे त्यांना तयारीसाठी फरच कमी वेळ मिळाला. यातून त्यांना पराभव पत्करावा लागला. आता पार्थ यांना मतदार संघात जनसंपर्क वाढविण्याची संधी आहे. त्यासाठी त्यांना पाच वर्षांचा कालावधी मिळाला आहे.

शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी मात्र आपला वेगळा मार्ग निवडला. रोहित यांनी उमेदवारी निश्चित नसताना देखील कर्जत-जामखेड मतदार संघात काम सुरू केले आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनाच रोहित पवारांनी आव्हान दिले आहे. सुरक्षित मतदार संघ निवडण्यापेक्षा आव्हानात्मक मतदार संघात काम करण्यावर रोहित पवारांचा भर दिसतोय.

कर्जत जामखेड मतदार संघात २०१४ मध्ये प्रत्यक्ष लढत शिवसेना आणि भाजपमध्येच झाली होती. शिवसेनेचे रमेश खाडे यांना ४६ हजारांहून अधिक मते मिळाली होती. तर राम शिंदे यांना त्याच्या दुप्पटीने मते मिळाली होती. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४६ हजार मते मिळाली होती. या मतदार संघात काँग्रेसची ताकत फारच कमी असून काँग्रेसला अवघे ९ हजार ४७७ मते होती. एकूणच येथील इतिहास पाहिल्यास, रोहित पवारांसाठी हा मतदार संघ अत्यंत खडतर असून भाजपचा बालेकिल्ला पाडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

Web Title: Rohit Pawar select unsecured constituency karjat Jamkhed for Vidhan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.