'झेब्रु' शुभंकरामुळे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम प्रभावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 21:01 IST2025-12-09T21:00:19+5:302025-12-09T21:01:44+5:30
Zebru Mascot Road safety awareness campaign : रस्ता सुरक्षा जन जागृतीसाठी 'झेब्रु' शुभंकराचा (mascot) अनावरण सोहळा

'झेब्रु' शुभंकरामुळे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम प्रभावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Zebru Mascot Road safety awareness campaign : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने 'झेब्रु' शुभंकराचा अनावरण परिवहन विभागाचे महत्त्वाचे पाऊल आहे. या शुभंकरामुळे अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी झेब्रु शुभंकराचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथील मंत्री परिषद सभागृहात आयोजित सोहळ्यात करण्यात आले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाढत्या नागरीकरणामुळे वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. अपघात रोखण्यासाठी राज्य शासन रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेतून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जागरूक करण्यात येत आहे. अपघात होणारच नाहीत, यासाठी नागरिकांना ' वाहतूक साक्षर' करण्याचा शासनाचा मानस आहे. या मोहिमेची ही फलश्रुती असून विविध विभागांच्या माध्यमांतून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून रस्ता सुरक्षा मोहिमेत सहभाग घ्यावा. ' रस्ता सुरक्षा जीवन रक्षा' हा मूलमंत्र अंगीकारावा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, झेब्रु शुभंकर हा रस्ता सुरक्षेचा संदेश वाहक आहे. पहिला हक्क पादचाऱ्यांचा या जाणिवेतून रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येणार आहे. ' झेब्रु' ला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात येणार आहे. झेब्रु रस्ता सुरक्षेचा जिवंत आत्मा ठरेल, या पद्धतीने मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येईल. पदपथांवर असलेले अतिक्रमण काढून तेथील रेलिंग न काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून नियमावली बनविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल. कार्यक्रमात झेब्रु शुभंकरचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांना झेब्रु असलेले सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.