Reductions in electricity rates for the next five years; big relief to Best, Tata and Adani customers pnm | पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात; महावितरणसह बेस्ट, टाटा, अदानीच्या ग्राहकांना मोठा दिलासा

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात; महावितरणसह बेस्ट, टाटा, अदानीच्या ग्राहकांना मोठा दिलासा

ठळक मुद्देमुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर 7 ते 8 टक्क्यांनी कमी होणारटाटा, अदानीच्या ग्राहकांना मिळणार फायदा घरगुती विजेकरिता १० ते ११ टक्के दर कमी करण्यात येणार

मुंबई : वारंवार वाढणाऱ्या वीजबिलामुळे अनेक नागरिक त्रास सहन करत असतात. या लोकांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारकडून केलं जात आहे. महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी 7 ते 8 टक्के कपात सुचविली आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी सोमवारी ही कपात जाहीर केली.

गेल्या 10 ते 15 वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची दर कपात होत असून यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळण्यास प्रोत्साहन मिळेल असा विश्वास आनंद कुलकर्णी यांनी व्यक्त केला. आयोगाच्या निर्णयानुसार, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल 10 ते 12 टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती विजेकरिताचे दर 5 ते 7 टक्क्यांनी कमी होणार आहेत तर शेतीसाठीचे वीज दर 1 टक्क्यांनी कमी होणार आहेत.

मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर 7 ते 8 टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर 8 ते 9 टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर 1 ते 2 टक्क्यांनी कमी होतील. मुंबईत बऱ्याच मोठ्या भागात टाटा आणि अदानी या कंपन्या वीज वितरण करतात. त्यांच्यासाठीही आयोगाने वीज दर कपात सुचविली आहे. त्यानुसार या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर 18 ते 20 टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर 19 ते 20 टक्क्यांनी आणि घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल 10 ते 11 टक्क्यांनी कमी होणार आहेत.

या दरांची निश्चिती करताना सर्व संबंधितांशी प्रदीर्घ चर्चा करून आणि तपशिलवार अभ्यासाअंती आयोगाने हा निर्णय घेतल्याचे आनंद कुलकर्णी यांनी सांगितले. या दर कपातीमुळे उद्योग- व्यवसाय यांना मोठा दिलासा मिळेल, ते पुन्हा नव्याने उभारी घेण्यास सज्ज होतील, ही दर कपात केवळ पुढच्या वर्षापुरती लागू राहणार नाही तर आयोगाने अशा प्रकारे इनबिल्ट पद्धत तयार केली आहे की त्यानुसार ते दर येत्या 5 वर्षापर्यंत लागू राहतील. या निर्णयामुळे शासनाला कोणताही आर्थिक भार पडणार नाही. वीज वितरण कंपन्या अधिक व्यावसायिक पद्धतीने चालवून कमी दरामध्ये ग्राहकांना वीज पुरवण्यास सक्षम असतील. म्हणून ग्राहकांनी विजेचा अनावश्यक वापर न करता गरजेपुरता वापर करावा असं आवाहनही आनंद कुलकर्णी यांनी केले आहे.

Web Title: Reductions in electricity rates for the next five years; big relief to Best, Tata and Adani customers pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.