जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक लाल रंगाचे दिसण्यापाठीमागे ' हे ' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 05:07 PM2020-06-11T17:07:34+5:302020-06-11T17:44:27+5:30

लोणार सरोवराचे पाणी ९ जूनपासून ठळकपणे लाल रंगाचे दिसत आहे.

'This' reason is behind the world famous Lonar Lake water suddenly turns into red | जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक लाल रंगाचे दिसण्यापाठीमागे ' हे ' आहे कारण

जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक लाल रंगाचे दिसण्यापाठीमागे ' हे ' आहे कारण

googlenewsNext
ठळक मुद्देलोणार सरोवरातील अ‍ँटीकॅन्सर व अँटीव्हायरल गुणधर्म असणारेउपयुक्त लाल क्षारप्रेमी सूक्ष्मजीव व शेवाळे : डॉ. प्रज्ञा काणेकर

विवेक भुसे - 

पुणे : जगप्रसिद्ध लोणार सरोवराचेपाणी ९ जूनपासून ठळकपणे लाल रंगाचे दिसत आहे. याचे प्रमुख कारण त्यामध्ये वाढणारे लाल रंगाचे क्षारप्रेमी (हॅलोफिलीक) सूक्ष्मजीव व शेवाळे असावे. उन्हाळ्यात बाष्पीभवनाने सरोवराचे पाणी कमी झाले असावे व क्षारांचे प्रमाण वाढल्याने तांबड्या हॅलोबॅक्टेरिया, हॅलोआर्किया व शेवाळाचे प्रमाण वाढले असावे. हे तांबडे शेवाळे  ड्युनालेला सलीना सारख्या कॅरेटिनॉइड तयार करणाऱ्या शेवाळ्यासारखे असु शकते.
हे कॅरेटिनॉइड अँटीकन्सर आणि अँटीव्हायरल म्हणून उपयुक्त आहे. परदेशात त्याचा व्यावसायिकदृष्ट्या उपयोग केला जात असल्याची माहिती आघारकर रिसर्च इन्स्टिट्युटच्या निवृत्त सूक्ष्मजीवविभाग प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा काणेकर यांनी दिली.

आघारकर रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये कार्यरत असताना डॉ. प्रज्ञा काणेकर यांनी लोणार सरोवरातील सुक्ष्मजीवांवर १९९४ मध्ये प्रथम संशोधन सुरू केले. त्यावर त्यांनी अनेक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. याबाबत डॉ. प्रज्ञा काणेकर यांनी सांगितले की, लोणारमध्ये १९९४ मध्ये संशोधन केले असता त्यामध्ये हिरवे, निळे आणि तांबड्या रंगाची शेवाळे आढळली होती. परंतू २००३-०४ मध्ये तांबडे शेवाळे आढळले नाही. त्यावेळी क्षाराचे प्रमाणही खुप कमी झालेले निदर्शनास आले. याचे कारण सरोवराजवळ असणाऱ्या पाण्याच्या टाकीतून पाण्याची गळती होत असल्याने सरोवराच्या पाण्याची पातळी वाढली होती व रंगही निळा, हिरवा झाला होता. या संशोधनात यातील काही सुक्ष्मजीव हे विघटनशील प्लॉस्टिक तयार करणारे आहेत असे आढळून आले होते.

आता लॉकडाऊनच्या काळात तेथील आजूबाजूच्या गावातून सरोवराला मिळणारे सांडपाणी बंद झाले असेल. तसेच पाण्याच्या टाकीची गळतीही कमी झाली असल्यास क्षारांचे प्रमाण वाढून ह्या क्षारप्रेमी सूक्ष्मजीवांची वाढ झाली असावी. हे तांबडे शेवाळ मानवासाठी उपयुक्त आहे. परदेशात हे शेवाळे वाढवून त्याचा उपयोग व्यावसायिक तत्वावर तसेच वैद्यकीय कारणासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मात्र, आपल्याकडे अजून त्याचा तसा वापर केला जात नाही. क्षारप्रेमी सूक्ष्मजीव (हॅलोआर्किया) मधे सुध्दा हे कॅरेटिनॉइड आढळते व त्यामुळे पाण्याला लाल रंग येतो. परंतू लोणार सरोवरातील तांबड्या क्षारप्रेमी सूक्ष्मजीव व शेवाळ्यावर संशोधन करणे गरजेचे आहे.

डॉ. सागर काणेकर यांनी सांगितले की, २००९ मध्ये केलेल्या अभ्यासात लोणार सरोवरातून क्षारप्रेमी सूक्ष्मजीवांच्या अभ्यासात हॅलोबॅक्टेरिया असल्याचे आढळून आले होते. ह्या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी खूप प्रमाणात (५-२०%) क्षार लागतात. त्यावेळीही क्षारांचे प्रमाण कमी होते व तांबडे शेवाळे आढळून आले नाही. 

सध्या कदाचित सरोवराच्या पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढल्यामुळे क्षारप्रेमी सूक्ष्मजीव वाढले असावेत व त्यामुळे पाण्याला लाल रंग आला असावा. निसर्गत: लाभलेल्या या संधीचा फायदा घेऊन शास्त्रज्ञांनी लोणार सरोवरातील तांबडे क्षारप्रेमी सूक्ष्मजीव व शेवाळे यावर संशोधन करावे.

Web Title: 'This' reason is behind the world famous Lonar Lake water suddenly turns into red

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.