'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:46 IST2025-06-09T09:44:39+5:302025-06-09T09:46:29+5:30
Aaditya Thackeray On Shiv Sena UBT and MNS Alliance: ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा आणि त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चेवर आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत आम्ही एकत्र येण्यास तयार आहेत", असे ते म्हणाले. तसेच सत्ताधारी भाजपकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असून ते मुंबईसह राज्याला गिळवून टाकतील, असाही त्यांनी आरोप केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याची सर्वात जास्त चर्चा आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी काम करण्यास तयार असलेल्या कोणत्याही पक्षासोबत, आम्ही काम करण्यास तयार आहोत, हे आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत. बदल घडवून आणण्याची आमची जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या कोणत्याही पक्षाने एकत्र येऊन लढले पाहिजे."
युतीबाबत अद्याप उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही. नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्याआधी ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. परंतु, राज ठाकरेंनी एका मुलाखतीत युतीसंदर्भात सुचक वक्तव्य केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र येण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.