rajya Bank will arrange the Sugar Council: inauguratation by Chief Minister | राज्य बँक घेणार साखर परिषद : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 
राज्य बँक घेणार साखर परिषद : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

ठळक मुद्देउद्योगांच्या अडचणींवर होणार मंथन चर्चासत्रात केंद्रीय मंत्री गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार सहभागी होणार

पुणे : कर्जदाराचे कर्ज बुडीत झाल्यानंतर बँका संबंधिताची मालमत्ता जप्त करुन उद्योगच बंद करते. मात्र, कारखान्यांची खाती अनुत्पादक (एनपीए) होऊ नये यासाठी बँकांनी देखील आपली भूमिका पार पाडली पाहीजे, या हेतूने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पुण्यात साखर परिषद बोलावली आहे. येत्या शनिवारी (दि. ६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. रविवारी (दि. ७) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचा समारोप होईल. 
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी ही माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागांवकर, संजय भेंडे आणि व्यवस्थापकीय संचालक ए. आर. देशमुख या वेळी उपस्थित होते. परिषदेच्या पूर्व संध्येला (दि. ५) आयोजित सहकार प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सहकार मंत्री सुभाष देशमुख, कामगार राज्यमंत्री संजय भेगडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि सहकार आयुक्त सतीश सोनी या वेळी उपस्थित राहतील.
इथेनॉलचे शाश्वत उत्पादन, कारखान्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर आणि खर्चावर नियंत्रण, इथेनॉल धोरण, सहवीज निर्मिती आणि वीज निर्मितीच्या धोरणावर शनिवारी चर्चा होईल. कानपूरच्या राष्ट्रीय ऊस संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन, प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी, महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार, मिटकॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील नातू यात सहभागी होतील. रविवारच्या चर्चासत्रात ऊस लागवड, उसावरील रोग व कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, साखरेचा दर्जा आणि वितरण व्यवस्थेवर चर्चा होईल. त्यात कृषी भूषण संजीव माने, जैन इरिगेशनचे अभय जैन, ब्रिटानियाचे उपाध्यक्ष मनोज बालगी यात सहभागी होतील. दुपारी ३ वाजता होणाऱ्या चर्चासत्रात केंद्रीय मंत्री गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार सहभागी होणार आहेत.  
कर्ज, त्याची परतफेड अथवा मालमत्ता विकून त्याची वसुली अशी बँकाची भूमिका मर्यादित नाही. बँकेचा पैसा संबंधित उद्योगात गुंतला असल्याने ती देखील एकप्रकारे त्या व्यवसायाची भागीदारच असते. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी मालमत्ता विकून संबंधित व्यवसाय बंद करण्याची भूमिका नसावी. उलट संबंधितांच्या अडचणी सोडविण्यासाठी काय करता येईल, याचा देखील विचार बँकांनी केला पाहीजे, त्यासाठी साखर परिषद आयोजित करण्यात आल्याचे अनास्कर यांनी सांगितले. 


Web Title: rajya Bank will arrange the Sugar Council: inauguratation by Chief Minister
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.